५. संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करा.

५. संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करा.

राजे जर तुम्हाला आपलं राज्य वेगाने वाढवायचे असेल आणि तसेच ते टिकवून ठेवायचे असेल तर त्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करणे. आता संभ्रमित माणसांमुळे काय होते आणि समर्पित माणसांमुळे काय होते याचे प्रत्येकी एक एक उदाहरण मी तुम्हाला रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यातील प्रसंगातून समजावून सांगते. रामायण आणि महाभारत या केवळ वाचण्याचा किंवा पाठांतराच्या गोष्टी नाहीत. यातील गोष्टीतून अर्थबोध काय घ्यायचा तो खूप महत्त्वाचा असतो. शब्दांमागील कृती, विचारामागील मानसिकता आणि कथेचा भावार्थ कळण्यासाठी मन शांत लागते आणि बुद्धी स्थिर. अशा गोष्टीपासून आपण योग्य तो धडा घ्यायचा असतो. तर रामायणातील एक शिष्य आणि महाभारतातील एक शिष्य अशा दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे एक हनुमानाची आणि एक आहे अर्जुनाची.

जगात सगळीकडे रामाची जशी मंदिरे आहेत तशी हनुमानाचीसुद्धा आहेत. किंबहुना रामाची कमी आणि हनुमानाचीच जास्त आहेत. याचे कारण काय आहे तुम्हाला माहित आहे का? हनुमान हा रामासारखाच पराक्रमी बुद्धीमान असूनही एक निष्ठावंत अनुयायी शिष्य आणि आज्ञाधारक शिष्य होता. प्रभूरामचंद्रांनी कोणतेही काम सांगितले की त्यातील किंतु परंतु असे प्रश्न न करता प्रश्न नक्की काय आहे तो नीट समजून तो काम करून ते कार्य संपन्नच करून येत असे. श्रीरामचंद्रांना त्याला उपसुचना किंवा शंकांचे निरसन करत बसण्याची गरज पडत नसे. स्वतःची बुद्धी वापरून चातुर्य वापरून प्रसंगाला अनुसरून तो आपला पराक्रम सिद्ध करे. त्यामुळे अशा पराक्रमी आज्ञाधारक आणि कार्यपूर्तता करणाऱ्या शिष्याची प्रेरणा घेऊन लोकांनी
गावागावात हनुमान मंदिरे बांधलीना ! यात नवल ते काय ? सीतामातेचा शोध असेल, सुग्रीव आणि राम यांची भेट घालून मैत्री घडवून आणणे असेल किंवा लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा सुषेण वैद्य लंकेतून तर संजीवनी जडीबुटी हिमालयातून आणणे असेल अशा अनेक पराक्रमासह श्रीराम आणि लक्ष्मणाला अहिरावणाच्या बंदिवासातून मुक्त करण्याचे काम हनुमानाने स्वतःची बुद्धी आणि चातुर्य वापरत पूर्ण केली आणि श्रीराम रामायणाचे युद्ध जिंकू शकले. शिष्यामुळे गुरूला विजय मिळाल्याचे हे जगातील एक अत्यंत दुर्मिळ असे उदाहरण होय.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!