९५.बुकेऐवजी बुक किंवा झाडे द्या

९५.बुकेऐवजी बुक किंवा झाडे द्या

जगात दोन प्रकारची लोक जीवन जगत असतात. एक यशस्वी आणि जश्रीमंत तर दुसरे गरीब. दोघांचेही हार्डवेअर सारखेच असते. म्हणजेच देवाने दोघांनाही सारखेच हात, पाय, नाक, कान, डोळे दिलेले असतात. फरक असतो तो सॉफ्टवेअरचा. यशस्वी आणि श्रीमंत लोक स्मार्ट वर्क करून त्यांच्या मानेच्या वरच्या भागाचा ८० टक्के वापार करतात, म्हणून ते श्रीमंत आणि यशस्वी असतात. तर गरीब लोक हार्ड वर्क करून त्यांच्या मानेच्या खालच्या भागाचा ८० टक्के वापर करतात ते म्हणून ते गरीब असतात.

मी तुम्हाला विनंती करणार आहे की यापुढे आपल्या स्नेहीजनांच्या कार्यक्रमाला जाताना उपयोगात येतील अशाच वस्तू भेट द्या. तुम्ही बुके देण्याच्या ऐवजी बुक किंवा झाडाची रोपे द्या. हे सांगण्याचं कारण असं घडलं की आमच्या सुवर्णम् भोज या थाळी रेस्टॉरंटचे उद्घाटन थाटामाटात झालं. कार्यक्रम मोठा झाला, खूप लोक शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यापैकी अनेकांनी पुष्पगुच्छ म्हणजे फुलाचे बुके दिले तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी पुस्तके आणि झाडाची रोपे दिली. साधारण शंभर दीडशे बुके आले. त्या पुष्पगुच्छची किंमत २०० रुपये पासून २ हजार रुपये इतकी होती. ते सर्व ४० ते ५० हजार रुपयाची बुके दुसऱ्या दिवशी फेकून द्यावी लागली.

स्नेहीजनांच्या प्रेमाची किंमत पैशात कधीच करता येत नाही. तरीही मला दुःख वाटलं की या मंडळींनी बुके ऐवजी पुस्तक दिली असती तर त्यामधून एखाद्या गावचे वाचनालय सुरू झाले असते. त्यामधून ग्रामीण भागात वाचन चळवळ उभी करून, ज्ञानदानाचे पुण्य अनेकांना लाभलं असतं.

बशस्विता, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिकता या विषयांवरील ५ लाख रुपयांची पुस्तके मी तरुणांना आणि योग्य व्यक्तींना भेट दिली आहेत. तसेच मी लिहिलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ मी बीड आणि नगर जिल्ह्यातील अ, ब, क वर्ग वाचनालयांना, तसेच काही तरुणांना, काही शाळा, महाविद्यालयातील वाचनालयांना ५ लाख रुपयांच्या प्रती मोफत भेट दिल्या आहेत.

आपल्या देशात आणि जगात माझ्यासह ज्या व्यक्ती तुफान यशस्वी झाल्या आहेत त्यांच्या यशाचे रहस्य हे ज्ञानात आणि पुस्तकात असल्याचं सर्वच यशस्वी लोक सांगतात. कारण ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र असल्याने आपण सर्वांनी ज्ञानाचे आणि पुस्तकाचे महत्व जाणा. पुस्तकाबरोबरच, झाडांची रोपे आपण स्नेहीजनांना, तसेच झाडे लावणाऱ्या संस्थांना भेट दिली. तर त्या रोपांची वृक्ष लागवड करता येईल.

मित्रानो आपण मागील ४०-५० वर्षांत वृक्षतोड करून जंगले कमी झाल्याने पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे उष्णतामान वाढून पाण्याची पातळी आणि पाणी साठेही कमी होत चालले आहेत. पाणी हे जीवन असताना अनेकांना पिण्याचे पाणीही आपण पुरवू शकत नाही. म्हणून पाणी आडवा पाणी जिरवा बरोबरच, झाडे लावा, झाडे जगवा. आणि निसर्गाबरोबरच आपलेही जीवनही वाचवा, असा फक्त संदेश न देता. ते कृतीमध्ये आणून आपले आणि पुढील पिढीचे जीवन सुखकर, आनंदी आणि यशस्वी करू या.

पूर्वी लग्नकार्यात रोख रुपयांचे आहेर देण्याची पद्धत होती आणि ती खरोखरच योग्य होती. कारण त्यामुळे यजमानाचा लग्नकार्यात झालेला खर्च काही प्रमाणात भरून निघत होता. अलीकडे काही लग्नात वापरता न येणाऱ्या साड्या भेट दिल्या जातात. त्या कोणीही वापरत नाहीत. त्या फक्त इकडून तिकडे फिरत असतात. काही लोकांना फेटे बांधतात. आजकाल फेट्या ऐवजी टोप्या आल्या, त्याही घालणे बंद होत चालले आहे. लग्नकार्यात बांधलेले फेटे लग्न संपताना इकडे तिकडे पडलेले असतात, त्याचा कोणालाच उपयोग होत नाही. म्हणून अतिथींचा सन्मानच करायचा असेल, भेटच द्यायची असेल तर मला वाटते की उपयोगात येतील अशा वस्तू भेट देणे योग्य ठरेल.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!