९६ .भिकारी व्यापारी झाला
असे म्हणतात बीज बोये बबूल का! आम का फल कहा से आये?, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. जीवनात तुम्ही जे वाचाल, जे बोलाल, जे ऐकाल आणि जे तुम्ही दुसऱ्यांना द्याल तेच तुम्हाला परत मिळत असते. हा सिद्धांत आहे. नेपोलियन हिलच्या ‘लॉ ऑफ सक्सेस’ या सुप्रसिद्ध पुस्तकातील मला आवडलेला सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे Habit of doing more than paid for. मागण्यापेक्षा जास्त देण्याची सवय लावा आणि जीवनात यशस्वी व्हा. दुर्दैवाने मराठी माणसांना छटाक भर देऊन किलोभराची अपेक्षा असते. आणि असे कधीच घडत नसते.
तुम्हाला एखाद्याकडून १०० रुपये हवे असतील तर, त्या बदल्यात तुम्हाला १०० पेक्षा जास्त किमतीची सेवा, प्रॉडक्ट, ज्ञान, अनुभव, प्रामाणिकपणा, विश्वास किंवा वेळ हा द्यावाच लागेल. ते तुम्ही दिल्यास तुम्हाला हवे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्व अनुभव आहे.
एक भिकारी रेल्वेत दररोज भीक मागत असे. एके दिवशी त्याने एका श्रीमंत व्यापाऱ्याला भीक मागितली. त्यावर व्यापारी म्हणाला, तू रोज लोकांकडे भीक मागतोस पण तू कधी कोणाला काही दिलेस का? आश्चर्यान भिकारी म्हणाला, मी तर साधा भिकारी आहे. मी लोकांना काय देऊ शकतो? तेवढी माझी लायकी नाही. मी तुमच्यासारखा श्रीमंत असतो तर नक्कीच दिले असते. त्यावर व्यापारी म्हणाला तुला जर श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल, तर आधी तू द्यायला शिक. मी देण्या घेण्याचा व्यापार करतो म्हणूनच मी श्रीमंत आहे. तू जेव्हा मला काही देशील ना! तेव्हाच मी तुला भीक देईल. त्यानंतर भिकारी विचार करतच रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडला. आपण काहीतरी दिले पाहिजे, पण काय द्यावे? असा विचार करू लागला. शोधा म्हणजे सापडेल. असे म्हणतात गरज ही शोधाची जननी असते. ही म्हण खरी ठरली. त्याला समोर एका फुलाचे झाड दिसले. त्याने काही फुले तोडली आणि ठरविले की आता भीक मागण्याअगोदर एक सुंदर फूल द्यायचे आणि नंतर भीक मागायची. त्याप्रमाणे त्याने भीक मागण्याअगोदर एक फूल देऊन त्यानंतर भीक मागितली.
समोरची व्यक्ती खुश होऊन त्याला पाच रुपयांऐवजी दहा रुपयाची भीक देऊ लागली. भिकारी खूपच आनंदित झाला. त्यांनतर तो प्रत्येकाला फूल देऊन भीक मागू लागला. त्यामुळे त्याला दुप्पट भीक मिळू लागली. एके दिवशी तोच श्रीमंत व्यापारी त्याला दिसला. भिकारी त्याच्याकडे जाऊन त्याने एक फुलाचा गुच्छ दिला. व्यापारी आनंदीत होऊन त्याने त्याला २० रुपयांची भीक दिली. भिकारी म्हणाला शेठजी, मी तोच भिकारी आहे. ज्याला तुम्ही भीक न देता, मागण्याआधी द्यायला शिकवलं. त्यावर व्यापारी म्हणाला. अरे तू तर आता भिकारी न राहता माझ्यासारखा व्यापारी झालास. असे बोलून व्यापारी निघून गेला. तू तर आता व्यापारी झालास, हेच शब्द भिकाऱ्याच्या मनात घोळत होते. मी सुद्धा व्यापारी झालो का? असा प्रश्न मनाला विचारून तो आणखीन आनंदी झाला. त्याने ठरवले की आपण आता फुलाचाच व्यापार करायचा.
तो फुकटच्या फुलाबरोबर विकतची फुलं आणून व्यापार करू लागला. या व्यवसायातून त्याला चांगले यशही मिळाले. दोन-तीन वर्षांत त्याच्यामध्ये सर्वार्थाने कायापालट झाला. आता हा भिकारी न राहता सुटाबुटातील व्यापारी झाला होता. पुन्हा एके दिवशी तोच श्रीमंत व्यापारी त्याला भेटला. भिकाऱ्याने शेठजीला आदराने नमस्कार करून विचारले, शेठजी मला ओळखलं का? मी तोच भिकारी आहे. ज्याला तुम्ही भीक न देता, निसर्गाचा व यशस्वितेचा मंत्र दिला होता, की मागण्याआधी द्यायला शीक. त्याप्रमाणे मी वागलो म्हणून मी आज भिकाऱ्याचा व्यापारी झालो.
जगात दोन प्रकारच्या वनस्पती असतात. एक आपली फळे स्वतःहून देत असतात. जसे आंबा, फणस, सफरचंद इत्यादी. दुसऱ्या प्रकारच्या वनस्पती ज्या आपली फळे लपवून ठेवतात. जसे कांदा, गाजर, लसूण, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी. ज्या वनस्पती आपली फळे उघडे ठेवून देतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे असते. तर ज्या आपली फळे मातीत लपून ठेवतात त्यांना उपटून फेकून दिले जाते. आणि ते स्वतःच स्वतःचा अंत करून घेतात.
जे लोक आपले ज्ञान, अनुभव, धन, शक्ती, रक्त हे समाजसेवेसाठी देतात. त्यांना पुन्हा जास्त प्रमाणात ते परत मिळत असते. समाज त्यांनाच मानसन्मान, प्रतिष्ठा देतो. त्यांची कीर्ती त्यांच्यानंतरही शिल्लक राहते. याउलट जे लोक आपले ज्ञान, अनुभव, धन, विद्या, शक्ती स्वार्थासाठी लपवून ठेवतात ते लयास जातात. म्हणून संत म्हणतात जे जे आपणाशी ठावे ! ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन ! याप्रमाणे वागून आपण जीवनात यशस्वी व्हावे.
मी २० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. माझा शेती, स्टेट बँकेतील तेरा वर्षांची नोकरी, त्यानंतर वीस वर्षे उद्योग व्यवसायातील अनुभवाचे ज्ञान. मी मागील ४० वर्षापासून समाजाला देत आहे. त्याचाच भाग म्हणून मी ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक लिहून ते राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले आहे. त्यासोबत मी यशाचे १११ मंत्र हे N. B. Dhumal या यू ट्यूब, फेसबुक चॅनलवर देत आहे. तसेच २०१८ पासून माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अन्नछत्र ही चालवीत आहे. कोविड काळात पन्नास हजार टिफिन मोफत वाटले. तसेच माझ्या N. B. Dhumal चॅरिटेबल फाउंडेशन मधून गरीब, हुशार व होतकरू मुलांना दत्तक घेऊन, त्यांना आर्थिक मदत देऊन उद्योजक बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
