व्यवस्थापनाची चौदा रत्ने – ४. Unity of command आदेशाची एकवाक्यता

४. Unity of command आदेशाची एकवाक्यता

व्यवस्थापनाचे चौथे महत्वाचे सूत्र म्हणजे आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एक वाक्यता म्हणजे काय तर सहकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला जेव्हा आदेश दिला जातो तेव्हा तो एकाच अधिकाऱ्याकडून दिला जावा आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तो रिपोर्ट किंवा अहवाल सुद्धा एकाच अधिकाऱ्याकडे सुपुर्द केला जावा. एकाच व्यक्तीला अनेक वरीष्ठाकडून एकाच कामाबाबतीत आदेश दिले गेले तर सगळा सावळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था होत असते. आदेशाची एक वाक्यता नसेल तर काम नक्कीच बिघडतं.

छत्रपतींच्या स्वराज्यात आदेश फक्त महाराजांकडूनच दिला जाई. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या त्याच्या खात्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. परंतु त्याने तो आदेश काढण्यापूर्वी महाराजांची परवानगी घेतली जाई आणि मग तो आदेश महाराजांच्या सही शिक्क्यानिशी पुढे कार्यवाही करण्यासाठी पाठवला जाई. इतर कोणी कितीही मोठा प्रभावशाली असला तरीही त्याचा आदेश पाळला जात नव्हता. order should be from the king only महाराज जेव्हा सेनापतीला युद्धासाठी पाठवत तेव्हा त्यांना युद्धभूमीची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार होताच. परंतु एखाद्याला जीवदान द्यायचे की नाही, तह करायचा की नाही याचा आदेश मात्र महाराजांकडूनच यावा असा संकेत होता.

महाराजांची सही नसलेला आदेश धुडकावला गेला तर यात नवल ते काय ! एकदा असे झाले की महाराजांचा ३ एप्रिल १६८० ला विषप्रयोगाने राजधानी रायगडावर मृत्यू झाला. आता महाराजांच्या नंतर उत्तराधिकारी कोण तर युवराज शंभूराजे. परंतु बेईमान मंत्र्यानी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत शंभूराजांनाच अटक करण्याचा हुकूम काढला. आणि हा हुकूम नेहमी बाळाजी आवजीच्या हस्ताक्षरात लिहिला जाई. त्याने मंत्रीमंडळाला स्पष्ट शब्दात बजावले मी छत्रपती शिवाय दुसऱ्या कोणाच्या आदेशाने, दबावाने, आमिषाने अगदी मरणाच्या भितीमुळेही पत्र लिहिणार नाही. हुकुम लिहीणार नाही. झक मारुन मंत्रीमंडळाला हात हालवत परत जावे लागले. तेव्हा त्यांनी दुसरी शक्कल लढविली. बाळाजी आवजीचा मुलगा आवाजी बाळाजी याला धमकावून त्याच्याकडून पत्र लिहून घेतले. कारण दोघांचेही अक्षर सेमच होते आणि त्या पत्रावर शिक्का मारला की झाले काम फत्ते ! असा डाव होता. परंतु शंभू राजांना कैद करण्याच्या आदेशावर महाराज सही कोठून करणार? महाराज नुकतेच इहलोकांची यात्रा संपवून गेले होते. तेव्हा आता जरी या पत्रावर महाराजाचाशिक्का होता, अक्षर नेहमीसारखेच होते तरी सही नव्हती तेव्हा आदेश कसा पाळला जाणार का? ते पत्र पाठविले गेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना. कराडच्या तळावर हंबीररावांनी ते पत्र वाचले आणि साफ शब्दात सांगितले या पत्रातील आदेशाची मी अंमलबजावणी करणार नाही. कारण यावर महाराजांची सही नाही. याला म्हणतात Unity of command.

आता ते पत्र परत रायगडावर आले. चिडलेल्या मंत्र्यांनी स्वतः कराडला जायचे ठरविले. कारण आदेशाचं पालन झालंच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ते कराडला आले. सरसेनापतीना सांगितले तुम्हाला पत्रातील आदेश पाळावाच लागेल. तेव्हा सर सेनापतींनी सांगितले मी महाराजाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आदेशाचं पालन करु शकणार नाही. तेव्हा चिडलेले मंत्री म्हणाले मग तुम्हालाच अटक करण्याचा आदेश द्यावा लागेल तेव्हा हंबीरराव खंबीरपणे म्हणाले अहो महाशय त्यासाठीही महाराजांचाच आदेश लागेल. तुमचा आदेश साधा स्वार शिपाई देखील

पाळणार नाही. त्यावर मंत्री म्हणाले, तुम्ही हे विसरु नका की आम्ही मंत्री प्रशासनाचे कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे आणि तुम्ही एकटे लष्कराचे पाहणारे आहात. आमचे बहुमत आहे आणि या मुद्यावर एकमत आहे की शंभू राजांना कैद करावी या आदेशाचं तुम्ही पालन करावं. हंबीरराव म्हणाले तुमचं एकमत बहुमत असेल तर तसं करुन बघा. माझी काही हरकत नाही. तसा आदेश तुम्ही फौजेला द्या. फौज त्याची अंमलबजावणी करेल. तेव्हा चिडलेला आण्णाजी दत्तो या मंत्र्याने आदेश दिला की शंभू राजांना नंतर अटक करु पहिले हंबीररावांना कैद करा. मंत्र्याने आदेश दिला पण अंमलबजावणी कोणी करायची. हंबीररावांना अटक करण्याचा मंत्र्यांनी आदेश देऊनही १०,००० फौजेतील

एकही जण आदेश पाळायला पुढे आला नाही.

कारण स्वराज्याचं लष्कर सेनापतीच्या आदेशाला बांधील असतं. मंत्र्याच्या नव्हे! आता मग मंत्र्याची पंचायत झाली आणि दुसऱ्याच क्षणाला हंबीररावांनी आदेश दिला या सर्व मंत्र्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली स्वराज्याचा नियम तोडला म्हणून अटक करा ! एकाच मिनीटात सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या. याला म्हणतात Unity of command आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एक वाक्यता हा नियम जसा हंबीररावांनी कटाक्षाने पाळला तसाच तो नियम तेवढ्याच कटाक्षाने साध्या स्वार, शिपायांनीही पाळला. Unity of command या तत्वाचं जगाच्या पाठीवर असं ज्वलंत उदाहरण कुठे पहायला मिळेल का ?

Discipline even after the death of king.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!