६. Subordination of Interest :
संस्था अगोदर आपण नंतर. थोडक्यात काय तर organisation first employees second. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांच्यापेक्षा संस्थेच्या उद्दिष्टांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. संस्था यशस्वी झाली तर त्या संस्थेतील लोक यशस्वीच झाले. विमान उडाले म्हणजे आतील प्रवासी उडतोच की! परंतु एखादी व्यक्तीचे उड्डाण म्हणजे विमानाचे उड्डाण होऊ शकत नाही तसेच व्यक्तीच्या हितापेक्षा एकंदरीत संस्थेच्या कंपनीच्या राज्याच्या हिताला प्राधान्य दिले गेले पाहिजे.
दुसऱ्या भाषेत सांगायचे तर व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी काम करुन व्यक्तीगत उन्नतीचे लक्ष न ठेवता संस्थेच्या, कंपनीच्या उन्नतीकडे लक्ष दिले पाहिजे. संस्था वाढली तर सगळ्यांचा उत्कर्ष आपोआपच होणार आणि त्यासाठी प्रत्येकाने हिच भूमिका अंगिकारली तरच संस्था किंवा कंपनी यशस्वी होऊ शकतात.
शिवाजी महाराजांना या बाबतीतील सगळ्यात मोठं म्हणावं लागेल. त्या काळात व्यक्तीगत उत्कर्षासाठी झटणारे लोक जहागिरी मिळाली की आपली गढी बांधून आरामात राहत. त्यांना समाजाचे राष्ट्राचे काय होते आणि काय नाही याचे काही देणे घेणे नसायचे. म्हणजेच काय तर या जहागिरदारांची भूमिका काय होती तर आधी आमचा उत्कर्ष नंतर बघू राष्ट्राच्या उद्धाराचं. आणि महाराजांनी ही परिस्थिती प्रयत्नपूर्वक बदलून आधी राष्ट्र उद्धार मग व्यक्तीगत उत्कर्ष ही समाजाची आणि एकंदरीत देशाची भावना निर्माण केली. व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह जेव्हा व्यक्तीगत उन्नतीसाठी पुढे सरसावतो तेव्हा ती संस्था, कंपनी बंद पडण्यास, डुबण्यास वेळ लागत नाही. या उलट जेव्हा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह स्वराज्य किंवा राष्ट्र या उद्देशाने राष्ट्रीय उन्नतीसाठी एकत्र येतात तेव्हा तो उत्कर्ष कायम स्वरुपी आणि दिर्घकाल टिकणारा असतो.
महाराजांच्या स्वराज्य व्यवस्थापनेचे हे मोठे कौशल्य आहे की त्यांनी राष्ट्रसैन्याची निर्मिती केली. आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे म्हणणारे हजारो तानाजी मालुसरे निर्माण झाले. रामजी पांगेरा कण्हेरगडच्या लढाईत मारला गेला म्हणून महाराज त्याच्या घरी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले. त्यांनी त्या कुटुंबाला थैली भरुन सुवर्ण मोहरा देण्याचं योजलं तर त्या कुटुंबाने ते सोन्याचं बक्षीस नाकारलं आणि रामजीचे वडील रडू लागले. महाराज म्हणाले बाबा आणखी काही हवं का ? जमीन जुमला वतन, पैसे, बोला… बाबा बोला. शिवाजी राजा तुमच्या दारात उभाआहे शब्द देतो तुम्ही मागाल ते देईल. तुमच्या पोराचं स्वराज्यावर मोठं उपकार आहेत. निसंकोचपणे मागा काय हवंय आपल्याला.
तेव्हा तो रामजी पांगेराचा वडील महाराजांचा हात हातात घेऊन सांगतो महाराज मागणारी माणसं आपल्या स्वराज्यात जन्माला आली नाही आणि तसली मागणारी अवलाद स्वराज्यानं कधी वाढविली नाही. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय कबूल करा. मी देईन ते तुम्ही घेताल म्हणून. महाराज विनाविलंब म्हणाले बाबा राजाकडून न घेता राजालाच देणारी माणसं या मुलुखानं जन्माला घातली. म्हणून स्वातंत्र्याच्या क्षितीजावर स्वराज्यरुपी सूर्य तळपू लागला आहे. दिला शब्द जे तुम्ही स्वराज्याला देणारं ते मी घेणारं. रामजी पांगेराचा भाऊ तिकडेच एका डोंगरावर शेतात काम करण्यात मग्न होता. त्याला माहित नव्हतं, महाराज त्याच्या झोपडीत आलेले आहेत म्हणून. त्या म्हाताऱ्या बाबाने जोरात आरोळी ठोकली आणि पोराला ताबडतोब घरी यायला सांगितलं.
शेतातलं काम तसंच सोडून पोरगं धापा टाकीत लगेच गावात पोहचलं. ते येताच पांगेरान त्याचा हातात हात घेतला आणि महाराजांच्या हातावर ठेवला. म्हणाले राजे एक मुलगा स्वराज्याच्या कामाला दिला आणखी काही लेकरं पोटी असती तर तीही स्वराज्याच्या कामी लावली असती. आता एवढं एकच आहे ते पदरी घ्या. महाराज म्हणाले, पण बाबा तुम्ही आता एकटे आहात. या वयात तुमचा मुलगा तुमच्या जवळ असणं केव्हाही चांगलं. पोराला घरीच राहू देत. रामजीच्या पेन्शनमधून घर खर्च चालण्याची तरतूद करुन देतो. निश्चिंत रहावा. तेव्हा तो म्हातारा महाराजांना म्हणाला, रामजी पडला तेव्हाच पैशाचा प्रश्न संपला. काम न करता पगार कशापायी घ्यावा स्वराज्यासाठी मरण येणं सगळ्याच्याच भाग्यात नसतं.
माझा पोरगा भाग्यवान स्वराज्याच्या कामी आला. हा माझा दुसरा मुलगा आताच्या आता स्वराज्यात दाखल करुन घ्या. आधी स्वराज्य मग माझा गाव मग माझं कुटुंब आधी कुटुंब आणि मी शेवटी. महाराज निरुत्तर झाले आणि छोटा पांगेरा लगेच स्वराज्यात भरती करुन घेतला. याला म्हणतात राष्ट्रवाद याला म्हणतात Nation first I am last. Exactly it is a Subordination of Interest.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

