३. Discipline : शिस्त
प्रत्येक संस्थेला संघटनेला राज्याला एका शिस्तीची गरज असते. शिस्त नसेल तर संस्था उभी राहणे वाढणे चालणे या गोष्टी कशा काय शक्य होतील आणि ही शिस्त सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. जशी नोकराला शिस्त हवी तशी मालकाला व्यवस्थापकाला हवी तशी कर्मचाऱ्यालासुद्धा आणि ही शिस्तीची गंगोत्री वरुन खाली वाहिली पाहिजे. ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचे तर “येथ वडील जे जे करिती, तया नाम धर्मू ठेविती” येथे वडील म्हणजे सिनीयर आणि धर्म म्हणजे शिस्त. धर्मपालन म्हणजे काय तर शिस्त. व्यवस्थापक मालक वेळेवर कामाला येत असतील तर ते कर्मचाऱ्यांना वेळेवर या असे सांगू शकतील ना! नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे होणार.
शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात शिस्तीला सगळ्यात जास्त महत्व दिलेले आहे आणि गैरशिस्त बेशिस्त वागणं कधीच खपवून घेतलेलं नाही. अगदी सेनापती असो की मंत्री यांना धारेवर धरायला महाराज कमी करत नसत. स्वराज्याचे नियम कानून काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी महाराज आग्रही होते तसेच ते हे कायदे चांगले असावेत यासाठीही प्रयत्नशील असायचे. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये आणि सैनिकांमध्ये महाराज Dedication समर्पणाची भावना तयार करु शकले. आणि आपोआपच सहकाऱ्यांच्या मनातही आदरभाव वाढीस लागला. महाराज स्वतः शिस्त पालन करणारे होते म्हणूनच स्वराज्य शिस्तप्रिय सैन्य आणि प्रजा शिस्तीची भोक्ती होती. प्रतापगडच्या युद्धप्रसंगी सईबाई मृत्युमुखी पडल्या तरीही महाराज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाहीत की दोन वर्षाच्या संभाजी राजांचे सांत्वनही करण्यासाठी अकरा महिने स्वराज्यात राजगडावर आले नाहीत. ही महाराजांची कर्तव्य कठोरता आणि शिस्त नाही तर काय! आपला राजाच अशी करडी शिस्त पाळतो तो भावनिक होऊन गर्भगळीत होत नाही हे पाहून कोणता सैनिक युद्धाच्या वेळी माझी आई, बायको, मुले आजारी आहेत मला रजा द्या असा अर्ज करु शकला असेल ? याला म्हणतात शिस्तीची सुरुवात स्वतः पासून Nation first we are last. स्वराज्य अगोदर खाजगी, व्यक्तीगत गोष्टी नंतर. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे हे शिस्तीचे आणखी एक ज्वलंत उदाहरण.
शिस्त न पाळणाराला दंड होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिस्त न पाळणारा माणूस कामाला ठेवणे हीच मोठी बेशिस्ती होऊ शकते. त्यामुळे शिस्तप्रिय महाराजांनी बेशिस्त लोकांना फौजेत कधीच सामील करुन घेतले नाही. आणि वर कोणीबेकायदा वर्तुणूक करायचा प्रयत्न केला तर महाराजांनी बडतर्फी, हात कलम करणे, कडेलोट करणे, डोळे काढणे अशा शिक्षा देऊन शिस्त पालनाचे महत्व आणि बेशिस्तपालनाचे परिणाम लोकांना दाखवून दिले. त्यामुळेच स्वराज्य शिस्तबद्ध पद्धतीने वाढत वाढत गेले तर बेशिस्तीमुळे मोगलाई मातीत मिळून गेली.
महाराजांच्या शिस्तप्रिय धोरणामुळेच कधी कोणाला गुप्तहेरीत अपूरी, चुकीची अर्धवट माहिती देण्याची हिंमत केली नाही. की कोणा सरदाराने चुकीचे पत्र लिहून दिशाभूल करण्याची हिंमत केली नाही. महाराजांच्या जीवनात शिस्तीला किती महत्व होते ते अधोरेखीत करणारा एक ठळक प्रसंग पहा.
महाराजांनी काळाची पावले ओळखून मिर्झाराजांशी पुरंदरचा तह केला आणि मोगलांना २३ किल्ले देऊन स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. पुढे मिर्जाराजांनी महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीस जाण्याचा आग्रह धरला. आता मात्र महाराजांना स्वराज्यापासून दूर जाणे भाग होते. आता आपण एवढे दिवस एवढे दूर अंतरावर गेल्यावर आपल्या माघारी स्वराज्यात शिस्त पालन कशाप्रकारे होईल याची महाराजांनी परीक्षा घेण्याचे ठरविले.
आणि त्यानुसार एके रात्री महाराज अचानक एका किल्ल्याच्या दरवाजावर येऊन पोहचले. त्यांनी किल्लेदाराला आदेश दिला दरवाजा उघडा. यावर किल्लेदाराने महाराजांना विचारले आपण कोण? महाराजांनी उत्तर दिले मी शिवाजीराजा आहे. तुम्ही ताबडतोब किल्ल्याचा दरवाजा उघडून मला आता घ्या. यावर किल्लेदार म्हणाला, आपण महाराजच असाल तर स्वराज्याचा नियम आपणास माहित नाही का ? सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा साक्षात यमराज आला तरी सूर्योदय होईपर्यंत उघडला जाणार नाही. स्वराज्याची ही शिस्त आहे. त्यावर महाराज म्हणाले, अरे ते मला माहित आहे. परंतु संकट काय कोणाला सांगून येते का? शत्रू माझ्या पाठलागावर आहे. मला आश्रय दिला नाही तर माझा जीव जाईल ना! तू दरवाजा उघड. यावर किल्लेदार म्हणाला, प्रश्न जर तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी. किल्ल्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जिवीताचे रक्षण करण ही किल्लेदाराची जबाबदारी मी पूर्ण करीन. आपण फक्त थोडं पुढे येऊन दरवाजाला चिकटून बसा. आम्ही बुरुजावर उभे राहून आलेला शत्रू अंगावर घेऊ. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री बाळगा. परंतु दरवाजा मात्र उघडता येणार नाही.
महाराज म्हणाले, अरे ज्याने नियम करुन दिला तो राजाच तुझ्या समोर उभाआहे. तू मला कायदा कसला आणि कशाचा सांगतो. यावर किल्लेदार म्हणाला, हा आपल्या स्वराज्याचा कायदा आहे तो राजाने बनविला तरी तो राजालाही लागू पडतो. रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे दोन कायदे स्वराज्यात नाहीत. आपण निश्चितपणे दरवाज्यात बसा. आलेल्या शत्रूला आम्ही बघून घेऊ. त्याने जास्तीची कुमक मागवून दरवाजा बुरुज यावर फौज सिद्ध करुन महाराजांच्या सुरक्षेची तजवीज केली. परंतु दरवाजा काही उघडला नाही.
महाराज आता मात्र रागावले आणि म्हणाले अरे तुमच्या स्वराज्यात राजापेक्षा मोठा अधिकार बाळगणारे कोणी आहे की नाही किमान त्यांच्या परवानगीने तरी मला आत घ्या. माझा जीव वाचवा. किल्लेदाराने लगेच उत्तर दिले. होय यावर एक उपाय आहे. स्वराज्यात राजालाही आदेश देऊ शकणारी एक अधिकारी आहेत त्यांच्या परवानगीने सही शिक्यानिशीच्या पत्रावर तुम्हाला आत घेण्यासंबंधी अध्यादेश घेऊन आलात तरच तुम्हाला सुर्योदयापूर्वी किल्ल्यात घेण्यासाठी दरवाजा उघडता येईल. तुम्ही असं करा राजगडला जा. जिजाऊसाहेब स्वराज्याच्या कुलमुख्यतेयार आणि सर्वाधिकारी आहेत त्यांना भेटा. विनंती करा. पत्र बनवा आणि माझ्याकडे घेऊन या
मी तुम्हाला लगेच आत घेतो.
यावर महाराज म्हणाले अरे मला बनवितो काय ? नियम आणि कायदे दाखवून.
अरे तू इथला किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीस आणि तिकडे राजधानी राजगडचा
किल्ल्याचा दरवाजा कुठून रात्रीचा उघडला जाईल. किल्लेदार म्हणाला, ते तुमचं तुम्ही
बघा. तो प्रश्न तुमचा आहे. महाराज म्हणाले आणि काय हे मी येथून अंधाऱ्या रात्रीत
राजगडला जाणार परत येणार तोपर्यंत सकाळ होणार की? किल्लेदार म्हणाला मग
मी दरवाजा उघडायला सकाळी तयारच आहे की तुम्ही येण्याअगोदर सूर्य उगवला तर
दरवाजा तुमच्यासाठी उघडनूच ठेवलेला असेल की! जावा लवकर आणि जिजाऊंचा
अध्यादेश आणा. किल्ल्याचा दरवाजा उघडावा असे वाटत असेल तर. महाराज
रागावून म्हणाले, माझ्याबरोबर गनिमी कावा करुन मला कात्रजचा घाट दाखवतोस
काय ? थांब तुझी गर्दनच मारतो. राजाची आज्ञा न पाळल्याची शिक्षा तुला मृत्यूदंडच
देतो.
किल्लेदार म्हणाला, महाराज तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती नक्की द्या. मी ती भोगायला तयार आहे परंतु सकाळ झाल्यावर ! शेवटपर्यंत महाराजांनी अर्ज, विनंती, धमकी, समजूत अशी अत्रे वापरुनही त्या फाकड्याने महाराजांच्या आदेशाला न जुमानता स्वराज्याच्या शिस्तीचे पालन केले. महाराजांना रात्र किल्ल्याच्या दरवाज्यात बसून काढावी लागली.आणि दोन तीन तासानंतरच पूर्वेकडे तांबडं फुटायला लागले. सूर्याचं पहिलं किरण धरतीला स्पर्श करताच किल्लेदाराने नियमानुसार किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि महाराजांना आत घेतलं. किल्लेदार आपण रात्री महाराजांच्या आदेशाचं पालन करु शकलो नाही म्हणून मान खाली घालून अदबीन दरवाज्यातच उभा राहिला. महाराज मी आपला अपराधी आहे. आपण रात्री दिलेल्या आदेशानुसार माझी गर्दन मारा. मी शिक्षा भोगायला तयार आहे.
महाराजांनी त्या किल्लेदाराला छातीशी कवटाळत आपल्या हातातील सोन्याचं कडं त्याच्या हातात घालत महाराज म्हणाले, शाब्बास! बहाद्दरा अरे तुमच्यासारखी स्वराज्याचा कायदा पाळणारी माणसे जन्माला आलेली असताना माझ्या माघारी स्वराज्याची काळजी नाही. राजापेक्षा स्वराज्याची घटना मोठी. कायद्यानेच राज्य चालावं ही तुम्हा मावळ्याची भावनाच मुळी राष्ट्रप्रेमाची आहे. शिस्तीशिवाय कोणतंही राष्ट्र मोठं होत नसतं. तुम्ही दाखवून दिलंत स्वराज्य अगोदर मग राजा. Nation first King next हे तत्व महाराजांच्या मावळ्यांना कळतं ते शिस्त कळल्याशिवाय का ?
महाराजांच्या मृत्यूनंतरही पुढे ५० वर्षे हा कायदा पाळला गेला. अगदी राजाने आदेश दिला तरीही किल्ल्याचा दरवाजा रात्रीच्या वेळी कधीच कोणासाठी उघडला नाही आणि त्यामुळे स्वराज्य कायम अजिंक्यच राहिले. Swarjya remained impregnable due to discipline अगदी स्वतः औरंगजेब स्वतः ७००,००० फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला हे एका बाजूला तर त्याला स्वतःलाच पराभूत होऊन याच मातीत मोकळ्या हातानं मरावं लागलं ते फक्त एकाच गोष्टीमुळे आणि ती गोष्ट म्हणजे स्वराज्याची शिस्तबद्धता.
आज २१ व्या शतकातही ज्या कंपन्या, संस्था शिस्तीच्या बाबतीत कडक आहेत त्याच बाजारात टिकतात, जगात झेंडा लावतात आणि जे या बाबतीत कटाक्ष पाळत नाहीत त्याचे अटकेपार दांडेच उरतात. झेंडे रातोरात गायब होतात.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

