व्यवस्थापनाची चौदा रत्ने – १३. Initiative पुढाकार

१३. Initiative पुढाकार

व्यवस्थापनाच्या या तत्वाचा आहे वरिष्ठांनी आपला अहंगड बाजूला ठेवून आपल्या कनिष्ठांना नवीन कल्पना पुढे करण्यासाठी प्रोत्साहन देणे. मलाच सगळं काही कळतं आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही ही भूमिका यशस्वी लोकं घेत नसतात. आपल्याला बरेच काही कळत असेल तर आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनाही थोडेफार कळत असतं हे शहाण्या लोकांना कळतं. आपल्याला जगात यशस्वी व्हायचे असेल कंपनीला पुढे न्यायचे असेल तर

एकच पर्याय असतो आणि तो म्हणजे नवीन नवीन कल्पना, संकल्पना आपण अस्तीत्वात आणली पाहिजे. त्यामुळे विकासाचा वेग वाढतो. नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती जन्माला येतात त्या याच Initiative व्यवस्थापन तत्वज्ञानामुळ. जुनं ते सोनं हे तत्व इथे नसून जुनं ते भंगार आणि नवीन ते अंगार अस असतं पहाना. बैलगाडी आणि विमान, जुना मोठा टेलीफोन आणि नवीन हातात घेऊन डोंगरावर, समुद्रात कुठेही सोबत करणारा मोबाईल.

जग हे नेहमी नवीन नवीन गोष्टींना डोक्यावर घेत असतं म्हणून नवीन नवीन कल्पना डोक्यात येणं गरजेचं असतं. मग ती कल्पना डोक्यात येणं गरजेचं असतं. मग ती कल्पना सहकाऱ्यांच्या किंवा कनिष्टाच्या डोक्यातून आली तर बिघडले कुठे. हेच व्यवस्थापनाचं मूळ तत्व चांगली कल्पना कुठूनही येवो, कोणाकडूनही येवो, कधीही, कशीही येवो आपण ती स्विकारायची जर आपला दृष्टीकोन प्रगतीशील असेल तर आणि हा प्रगतीशील दृष्टीकोन ठेवणे म्हणजेच पुढाकार घेण्याची संधी देणं.

महाराजांचं स्वराज्य का निर्माण झालं याचं उत्तरच या तत्वात आहे. Initiative घेणे म्हणजे आपण स्वतःच अस्तीत्व राज्य निर्माण करु शकतो असं तीनशे वर्ष जिथे लोकांना स्वप्नातही पाहता येत नव्हतं ते महाराजांनी अस्तीत्वात आणलं. म्हणजे नवीन विचार संकल्पना मांडली आणि अंमलात आणली.

सह्याद्रीच्या ज्या डोंगररांगा दळणवळणासाठी अतीदुर्गम आणि व्यापार यासाठी प्रतिकूल म्हणून सर्वच राजांनी दुर्लक्षित उपेक्षित ठेवल्या त्याच महाराजांनी Initiative घेऊन या दुर्गम रांगा कशा दुर्मिळ असतात ते जगाला दाखवून दिले. निर्जन सह्याद्रीला किल्ले बांधून शेले पागोटे चढविले आणि चालते बोलते नंदनवन निर्माण केले. स्वराज्य हे नावही Initiative प्रकारात मोडते तेच आपल्या स्वराज्यासाठी महाराजांनी निवडले.आठशे वर्षे या देशात कोणत्याही भारतीय सत्ताधिशाला आरमार बांधण्याची अक्कल सुचली नाही. २७ वर्षाच्या महाराजांनी या देशातील पहिले आरमार उभे करुन Initiative हे व्यवस्थापन शास्त्रातील तत्व किती महत्वाचं असते ते दाखवून दिले.

हिंदू धर्मातील काही चुकीच्या विचारांमुळे इथल्या लोकांना समुद्र पर्यटनला बंदी असताना महाराजांनी समुद्राला पालाण घातले. फक्त आरमार बनवून सैनिकांना त्यात बसवलं नाही तर स्वतः कारवार पर्यंत १६६५ ला जहाजात बसून मोहीम केली आणि पुढे तर युरोप आशियातील देशांबरोबर व्यापार करण्यासाठीही व्यापारी गलबते (trading ships) बांधली. म्हणजे Shipping कंपनी काढली. इराक, बसरा, मस्कत, युरोप आदी देशापर्यंत महाराजांचं व्यापारी कामकाज सुरु झाले.

स्वराज्य निर्माण झालं. वाढलं, आणि टिकलं ते याच पुढाकार घेण्याच्या प्रवृत्तीने. याच Initiative घटकामुळे महाराजांनी स्वतःला आवश्यक असणारी नवीन हत्यारे पट्टा आणि विटा बनवून घेतला. त्यामुळेच महाराज स्वतः न थकता सात तास विशाळगडचा वेढा फोडण्यासाठी लढू शकले तर विटा या हत्यारामुळे ३०० मावळे ८

तास ५००० शत्रूना रोखून घोडखिंड लढवू शकले. महाराजांनी स्वराज्याची आर्थिक घडी व्यवस्थीत बसावी म्हणून स्वतःची ७२ प्रकारणी नाणी पाडली. एका राजाने एका राज्यासाठी एवढी नाणी पाडणे हे देखील जगाला आश्चर्य करायला लावणारी गोष्ट महाराजांनी केली आणि ती व्यवस्थापन

शास्रातील Initiative या तत्वाचं विकास कामात काय महत्व असते ते जगाला पटवून

देण्यासाठीच.

महाराजांनी असा अनेक नवनवीन गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येतो. तसेच सर्वसामान्य लोकांनाही नवीन कल्पना जन्माला आणण्यासाठी प्रवृत्त केले आणि लोकांमध्ये हे Initiative च व्यवस्थापन तत्व रुजावं म्हणून दरवर्षी दसरा कार्यक्रम सुरु केला. या दिवशी सर्व लोकांना आप-आपलं कसब दाखविण्यासाठी खुल्या रंगमंचावर संधी दिली जायची ती यासाठीच आणि याच लोकांकडून मिळालेली, नवीन कल्पना, विचार घेऊन महाराज दरवर्षी दसऱ्यालाच मोहिमेला सुरुवात करीत असत. Initiative या व्यवस्थापन तत्वाचं सोनं लुटूनच मोहीम हाती घेत असत.

मोठ्यात मोठ्या शत्रूला मारण्यासाठी छोट्यात छोटे शस्त्र वापरणं हे जगाला आचंबीत करणारे काम तर महाराजांनी स्वतः केले हे आपणाला माहितच आहे. वाघनखांचा वापर जगात यापूर्वी कोणी केला नसताना महाराजांनी प्रथम करुन जगाला Initiative या व्यवस्थापन तत्वाची कायमस्वरुपी ओळख करुन दिली. प्रतापगडचारणसंग्राम लोकांच्या मेंदूत कोरला गेला तो याच वाघनखामुळे नव्हे Initiative या महाराजांच्या उपजत स्वभावामुळे आणि ते व्यवस्थापनाचे जनक असल्यामुळेच.

धूर, आग, प्रकाश, आवाज यांचा संदेश वहनासाठी उपयोग तोही १६ व्या शतकात महाराजांनी केला हीच तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिली क्रांती या देशात करुन वेगवान संदेश वहनाची महती जगाला दाखवून दिली.

दक्षिणेतील लोक उत्तरेतील लोकांकडून का पराभूत झाले याचा अभ्यास करुन महाराजांनी स्वतःचे मोठे घोडदळ तयार करुन ६०% घोडदळ आणि ४०% पायदळ हे नवीन समीकरण दक्षिणमध्ये उदयाला आणून उत्तरेकडील मोगलांचा अस्त केला. एका ८०० वर्षाच्या बहुराष्ट्रीय कंपनीचा एका छोट्या स्वदेशी स्वराज्य नामक कंपनीने केलेला हा पराभव व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे महत्व किती असते याचे महत्व अधोरेखीत करणारा आहे.

राज्याभिषेकाची बातमी काही मिनीटात सर्व गडांवर पोहचविण्यासाठी पांढऱ्या धुराचा उपयोग स्वराज्यावरील संकटाची बातमी लगेच आजुबाजुच्या किल्ल्यांना देण्यासाठी काळ्या धुराचा उपयोग, तानाजीला कोंढाणा लढवताना ती बातमी लगेच कळावी म्हणुन गंजी पेटवून इशारा देण्याची सूचना हा प्रकाशाचा उपयोग आणि घोडखिंडीत लढणाऱ्या तीनशे मावळ्यांना आपण पोहोचल्याची बातमी विनाविलंब कळविण्यासाठी तोफांच्या आवाजाचा पर्यायाने, ध्वनीचा उपयोग करणारा हा आपला राजा मॅनेजमेंटच्या Initiative याच तत्वाचा नाहीतर अख्या व्यवस्थापन क्षेत्राचा बाप आहे हे आता कळलेच असेल. चला आता थोडं आणखी पुढे जाऊया.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!