दीपक चांदोरकर
एखादी इंटरनॅशनल ब्रँडच्या मद्याची बाटली… मल्टीव्हिटॅमीन टॉनिक… कफसिरप.. किंवा अगदी उत्कृष्ट ब्रँडचा सोया सॉस.. या सगळ्यांमधून आपल्याला त्यांच्याकडे खेचतात ते त्यांचे आकर्षक रंग… आणि हे रंग या कंपन्यांना चक्क अहमदनगरमधून सप्लाय केलेले असू शकतात…! वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना? पण ही किमया आहे… नगरच्या एम.आय.डी.सी.तील ‘अलविन कॅरॅमल कलर्स (इं.) प्रा. लि.’च्या दीपक चांदोरकरांची…
लहानपणी जरा जास्तच हूड, खोडकर आणि मिश्किल असलेल्या दीपकची पदवीधर होताच वडीलांनी थेट ‘एमआयडीसी’तल्या फॅक्टरीत रवानगी केली, पण मालक म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कर्मचारी म्हणून.. त्यामुळेच घरची गाडी असतानाही दीपकला स्टँडवरून बसने चारचौघांसारखं कंपनीत जावं यावं लागायचं.. शिस्तमय कष्ट आणि संस्काराचं बीज रुजलं ते असं…!
आयुष्याचा टर्निंग पॉईंट –
“खरं सांगू का, कॉलेज लाईफ खूप कलरफुल होतं, एन्जॉय केलं, जबाबदारीचं भान मात्र अजिबात नव्हतं..” दीपक त्यावेळच्या आठवणीत
रमतात… त्यावेळी त्यांना १९८३ ची घटना आठवते.. तो भयानक अॅक्सिडेंट ज्यात त्यांनी त्यांचा मित्र कायमचा गमावला.. ते जबर जखमी झाले आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले.. मित्राचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू हा चांदोरकरांसाठी एक मोठा धक्का होता.. या घटनेनंतर दीपक अंतर्मुख होऊन विचार करू लागले… “देवानं मला का ठेवलं आणि मित्राला का नेले ?”… उत्तर मिळाले … “अर्थातच देवाला माझ्याकडून काहीतरी भरीव कामगिरी करवून घ्यावयाची आहे.” त्यामुळेच देवावरचा त्यांचा विश्वास दृढ झाला… आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थान कलाटणी मिळाली… आयुष्याकडे ‘एन्जॉय’ म्हणून पाहणारे दीपक आता एक ‘आव्हानात्मक संधी’ म्हणून गांभीयनि पाहू लागले… आयुष्याची एक वेगळी दिशा याचवेळी ठरली…
जीवनाचे तत्वज्ञान –
देवावरील वाढलेल्या श्रद्धेपोटी दीपक सुटीच्या दिवशी आसपासच्या खेड्यात, झोपडपट्टीत जात.. दोनवेळचं जेवणही नशिबात नसलेल्या, ज्यांच्याकडे पहायला कुणालाही वेळ नाही, अशा लोकांकडे ते जायचे. त्यांची परिस्थिती पहायचे. आपल्याकडे सर्वकाही आहे. मात्र या बिचाऱ्यांना दोन घासही मिळू नयेत, ही विषमता त्यांना अस्वस्थ
करायची. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गोष्टीपासून वंचित असतेली … जीवन जगायचे म्हणून जगणारी व यापेक्षा कोणतेही वेगळे कारण नसलेली ही माणसं विनातक्रार अन कुठल्याही आशा-आकांक्षाळे बाळगता जगत आहेत. पण आपण मात्र आयुष्य सुखाने जगतो व सर्व पर्याय उपलब्ध असतांनाही छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करते राहतो… अशी खंत ते व्यक्त करतात.
कौटुंबिक संस्कार –
संस्कृत, मराठी, बंगाली, मल्याळी, तामिळ, कानडी, हिंदी अशा भारतीय व इंग्रजी, हिब्रू अशा आंतरराष्ट्रीय भाषा येत असलेल्या थोर विदुषी पंडिता रमाबाई (डोंगरे) या ‘सरस्वती’ सारखा वारसा त्यांना आईकडून लाभला. याच पंडिता रमाबाईंनी एकटीने ‘बायबल’चे सर्वप्रथम मराठीत रुपांतर केले, हे आश्चर्यकारकच नव्हे काय? आई सौ. कांचन चांदोरकर या हातमपुरातील युनिअन ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या होत्या. शहर सहकारी बँकेत ३० वर्षे संचालिका म्हणून काम पाहिलेल्या व एकेकाळी “सिमेंटवाल्या बाई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आईकडून उद्योगाचे व शिक्षणाचे बाळकडू मिळाले. मातुल घराणं असं सगळं शिक्षणावर भक्ती असलेलं.. साहजिकच शिकणं, सतत ज्ञान टिपत राहणं हे त्यांच्या रक्तातच आहे….
चांदोरकरांचे आजोबा कै. रामचंद्र दामोदर चांदोरकर यांनी भारतातील पहिली ‘ऑप्टिकल’ काच बनवली. वडील वसंत (बाबा) चांदोरकर व इतर तीनही चुलते क्रिकेट व टेबल टेनिस खेळात राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले खेळाडू केवळ क्रीडाच नाही तर शिक्षण क्षेत्रातही संशोधन कार्यात या सर्वांचाच नावलौकिक. त्यामुळे उद्दमशीलता चांदोरकरांना नवीन नव्हती.
तथापि, दुर्दैवाने कंपनीत दीपकला इतर सहकाऱ्यांकडून अपेक्षित असे सहकार्य, वागणूक व ज्ञान प्राप्त झाले नाही. सहकाऱ्यांच्या या संकुचित वृत्तीची चांदोरकरांना खरं तर चीड यायची. कदाचित त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी त्यांना इस्त्रायलला पाठवलं.
परदेश गमन –
इस्त्रायलला गेल्यावर दीपक चांदोरकरांना खऱ्या अर्थाने ज्ञानसंपन्न गुणवत्तेची ओळख झाली. येथेच त्यांची कॅरॅमेल क्षेत्रातले गुरू ‘डॉ. विली ग्रोअॅग’ यांच्याशी भेट झाली. नेहमीच नवीन शिकण्याची जिज्ञासा असणारे दीपक यांनी इस्त्रायलमधील एका नामांकीत संस्थेतून रितसर शिक्षण घेऊन अवघड समजली जाणारी हिब्रू भाषादेखील आत्मसात केली. दीपक यांची ज्ञान प्राप्त करण्याची तळमळ, कौटुंबिक पार्श्वभूमी व सचोटी यांना पारखून घेतल्यानंतरच डॉ. ग्रोअॅग यांनी कॅरॅमेल तंत्रज्ञानाचा कोपरा न कोपरा चांदोरकरांना शिकवला. हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर दीपक
यांनी कॅरॅमेल कलर्सच्या विश्वात ठामपणे पाऊल टाकलं.
कॅरेंमेत कलर्सच्या उत्पादनाबाबतीत आपण जगाच्या खूप मागे आहोत, तांत्रिकदृष्ट्याही कमी आहोत, हे फारच स्पष्टपणे जाणवतं.. भारतीयत्वाचा आणि कालबाह्य तंत्रज्ञानाचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा खन्या अर्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच सुरुवातीला काही लोकांच्या होणाऱ्या टीकेकडे सरळ दुर्लक्ष करून दीपक यांनी उत्तमोत्तम गुणवत्तेचा ध्यास घेतला.
डॉ. ग्रोअॅग यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानामुळे कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा वाढवायला खूपच मदत झाली. अगदी “ग्लोबल रेकग्निशन” मिळालं. त्यानंतर मग ‘अलविन’नं गुणवत्तेच्या उंच उंच भराऱ्या घेतल्या. आंतरराष्ट्रीय नॉर्मस् सहजपणे पार पाडले. त्यामुळेच आज ‘अलविन’च्या कॅरॅमेल कलर्सना जगभरातील ३० हून अधिक देशांत वाढती मागणी आहे.
अर्थात हे सर्व घडले ते घरच्यांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या पाठिंब्यावरच. त्याशिवाय विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी वर्ग, कंपनीतील सर्व जुने जाणते अधिकारी, कर्मचारी, कामगार शिवाय इन्कमटॅक्स, सेल्सटॅक्स, एक्साईज, लेबर कन्सलटंट, ऑडीटर्स, व्यवस्थापकीय सल्लागार, औद्योगिक कायदे, बीआयएस आदी क्षेत्रातील तज्ञ सल्लागार, बँका, विविध पुरवठादार अशा व्यक्ती वा संस्था यांच्या सहकार्याशिवाय हे सगळं शक्य झालचं नसतं, अशी नम्र कबुली चांदोरकर देतात तेव्हा ते केवळ ‘उद्योजक’च नव्हेत तर एक ‘नम्र व कृतज्ञ व्यक्ती’ असल्याची प्रकर्षाने जाणीव होते….
गुणवत्तेचा सुगंध दरवळला…!
“तात्पुरते ग्राहक कसेही मिळविता येतील, पण लाँग टर्म कस्टमर्स मिळवायचे असतील, तर व्यक्तीगत संपर्क, सृजनशीलता, उच्च दर्जाचे सातत्यपूर्ण उत्पादन, विनयशील सेवा, संघभावना, सर्व संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन या सर्व बाबी खूप महत्त्वाच्या आहेत,” असं स्वानुभवातून चांदोरकर सांगतात. ‘नम्रता, आपल्या उत्पादनांची पूर्ण माहिती आणि १००% व्यावसायिकता’ अशी त्यांची यशस्वी व्यवसायाची त्रिसूत्री आहे. गुणवत्ता ही ‘कस्तुरी’सारखी असते, तिचा सुगंध आपोआपच सगळीकडे पसरतो. त्यासाठी जगाला ओरडून सांगायची गरज नाही. म्हणूनच तर चांदोरकरांना
आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी कधीही, कोणापुढेही ना लाळघोटेपणा करावा लागला, ना तत्त्वांना मुरड घालावी लागली, यातच त्यांच्या यशस्वी व्यवसायाचं गुपीत दडलंय.
खरं तर कॅरॅमेल उत्पादनाचा व्यवसाय हा वेगळ्या पठडीतला. आणि त्यांनी तो चालवलाही अतिशय वेगळेपणानं, भारतात त्यांच्याकडे या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी रेंज आहे. ५० हून अधिक प्रकारचे कॅरॅमेल कलर्स, जवळपास १५ ते २० प्रकारच्या पावडर्स असं वैविध्य त्यांनी आपल्या उत्पादनात विकसित केलं आहे. त्याचबरोबर नेस्ले, केलॉग्ज, जीएसके, कॅडबरी, प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल, युनिलिव्हर आणि अशा कितीतरी नामवंत मल्टीनॅशनल कंपन्यांना त्यांची उत्पादने अनेक वर्ष सप्लाय होत आहेत. जगभरात तर त्यांचे प्रॉडक्टस् नावाजले गेलेच आहेत, परंतु सगळ्या जगात आपलं उत्पादन एक्सपोर्ट करण्याचा जणू ‘विडा’च उचललेल्या चीनी बाजारपेठेतदेखील चांदोरकरांनी आपल्या उत्पादनाची विक्री केली. हे विशेष… शिवाय वाढत्या प्रमाणात रिपिटेटिव्ह ऑर्डर्स येणे हे गुणवत्ता व उत्तम सेवेचंच द्योतक आहे, हेही
अभिमानास्पद आहे. अहमदनगर येथील सुप्रसिद्ध ‘आयएमएस-सीडीआर’ या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून औद्योगिक क्षेत्रावर आधारित प्रबंध पूर्ण करण्यासाठी ‘अलविन कॅरॅमेल कलर्स (इं) प्रा.लि.’ ची निवड केली व आपले प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण केले, हाही ते एक मानाचा शिरपेच समजतात.
उद्योगातील चढ-उतार –
“चढ-उताराचं म्हणाल तर सर्वच उद्योगधंद्यात ते असतातच. पण विचारपूर्वक, संयमाने व पुरोगामी कृतीने त्यांच्यावर मात करून ध्येयपूर्तीसाठी वाटचाल करत राहणे हाच कोणत्याही समस्यांवर विजय मिळविण्याचा ‘रामबाण’ उपाय आहे”, असे दीपक आत्मविश्वासाने सांगतात. १९९५-९६ दरम्यान कंपनीत मोठा संप झाला, पण एकही क्षण उत्पादन न थांबविता अतिशय चाणाक्ष पद्धतीने त्यात यशस्वी तोडगा काढण्यात आला. कामगारांना ‘गुलाम’ नव्हे तर ‘माणूस’ म्हणून वागवा, तरच समस्या सुटतील या मतामुळेच पुढे कंपनीत समस्या कमी झाल्या. आता कंपनीच्या गुणात्मक वाढीसाठी जर लिस्टिंग करायचे असेल तर त्यात अगदी टॉपला कंपनीचे कामगार व अधिकारी आहेत, याचे कारण जागतिक स्तरावर ‘अलविन’ला उच्च पदावर नेण्याचे ध्येय या संघभावनेतून निर्माण झाले आहे, असे चांदोरकर अगदी अभिमानाने सांगतात.
ग्राहकाभिमुख व्यवसाय –
आपल्या उत्पादनासंदर्भात ग्राहकांकडून दाखविण्यात आलेला
लहानातला लहान दोष नम्रपणे स्वीकारणे, त्यात प्रयत्नपूर्वक सुधारणा करून ग्राहकाचे पूर्ण समाधान करणे व भविष्यात दोषांची पुनरावृत्ती टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. कॅरेंमेल या नैसर्गिक कलरचे उच्च दर्जाचे उत्पादन आणि विक्रीपश्चात सेवेमध्ये कंपनीतील सर्व लहान थोर घटकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो, हे सांगतांना चांदोरकर आपले यश हे ‘व्यक्तिगत’ नव्हे तर ‘सांघिक’ असल्याची जाणीव करून देतात. काही उत्पादक मात्र आपल्या उत्पादनात काहीच दोष नसल्याचे ठामपणे सांगतात आणि कायमचे ग्राहक घालवून बसतात.
भविष्याचा वेध –
कॅरॅमेल तयार करताना काही केमिकल्स वापरावे लागतात, अर्थात त्यांना सरकारची परवानगी असतेच. परंतु वाढते प्रदूषण व केमिकल्सचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन साऱ्या विश्वातून आता नैसर्गिक व केमिकलमुक्त कॅरॅमेलची मागणी वाढत आहे. यामुळे अशा जागरूक ग्राहकांसाठी त्यांच्या मागणीनुसार संशोधन करून कॅरॅमेलचे इको-फ्रेंडली उत्पादन बनविण्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘अलविन’ अग्रेसर आहे.
इस्त्रायलकडून सन्मान –
इस्त्रायल हे राष्ट्र संपूर्ण जगात एक ज्ञानपिपासू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या राष्ट्राने आजपर्यंत जगाला १० पेक्षा अधिक नोबेल पुरस्कार विजेते दिलेले आहेत. त्यामुळेच कोणत्याही बाहेरील उत्पादनास तेथील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून आपला दर्जा सिद्ध केल्याशिवाय शिरकाव करता येत नाही. अशा ज्ञानाला प्राधान्य देणाऱ्या राष्ट्राकडून ‘अलविन’च्या उत्पादनांना सातत्याने मागणी तर आहेच, पण जोडीला इस्त्रायलचं खास मानाचं ‘The Israel Trade Award’ हे प्रमाणपत्र इस्त्रायली उपपंतप्रधानांच्या हस्ते मिळाले, ही निःसंशय अभिमानाची गोष्ट आणि कार्यसिद्धीची पावती आहे, असे चांदोरकरांना वाटते.
प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा –
दीपक यांनी व्यवसायानिमित्त जगभरातील २०हून अधिक देशांना वारंवार भेटी दिल्या आहेत. त्यामुळे तेथील स्वच्छता, शिस्त, वेळेचे महत्त्व त्यांना प्रकषर्षाने जाणवले. इतर देशांत व्यवसाय करताना कुणा सरकारी अधिकाऱ्यांचे इगो जपावे लागत नाहीत की कमिशन पद्धती नाही. क्वॉलिटी असेल, तर सरळ-सरळ व्यवसाय बिनदिक्कत करता येतो, भारताबाहेर सगळीकडे थोड्याफार प्रमाणात हाच अनुभव येतो. पण भारतात मात्र उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदललं गेलं नाही तर उगाचंच महासत्तेची स्वप्न कशाला बघायची ? असा
परखड सवालही चांदोरकर विचारतात. “सिलीकॉन व्हॅलीत भारतीय जास्त का आहेत, सॉफ्टवेअर फील्डमध्ये जगभरात भारतीयच का दिसतात, तर हुशार भारतीय तरुण सगळीकडे कमी पगारातही काम करायला तयार होतात म्हणून..।” हा स्पष्ट विचार चांदोरकर बोलून दाखवतात.
“तुम्ही मला कदाचित देशद्रोही म्हणाल…’ आमच्याकडे डोकं आहे. पण पैसा नाही हो’, ही भारतीयांची रड खोटी आहे”, असं परखड मत चांदोरकर व्यक्त करतात. ‘आपल्यातल्या त्रुटी आपणच कमी करायला हव्यात, त्याशिवाय उगीचंच काठावर राहून शहाणपण शिकवण्यात काय अर्थ ?’
‘एखाद्याला सुखी करायचं.. दुसऱ्याला दुःखी करायचं’ हे तत्व दीपक चांदोरकरांना आयुष्यात कधीच पटलं नाही. ते स्पष्टपणे म्हणतात – “White is White and Black is Black…!” जे आहे ते स्वच्छ आणि स्पष्ट मांडलेलं त्यांना जास्त आवडतं.
“आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते महत्त्वाचं. वाईट असेल तर ते सोडून द्यायचं. ‘माणसं ओळखत’ जगायला शिकलो… माणसांना नव्हे तर परमेश्वराला भिऊन राहिलं पाहिजे हे जाणवलं ‘I Love what I am doing.. and I do what I Love…!’ म्हणून मी व्यवसायात यशस्वी आहे.’ असं चांदोरकर सांगतात, त्यावेळी ही अंधश्रद्धा नव्हे, तर परमेश्वरावरची गाढ श्रद्धा असल्याचं स्पष्ट जाणवतं.
“आपल्याकडची माणसं मेंढरासारखी वागतात. एक पुढे चालला तर इतर सर्वजण कुठल्याही बऱ्या-वाईट परिणामांची कल्पना न करता त्याचे अंधानुकरण करत त्याच्या पाठीमागे राहतात. त्यांच्याजवळ कल्पकता अथवा नवा विचार करण्याची मानसिकताच नाही. ही ‘शीप’ मेंटॅलिटी कधी संपणार कोण जाणे… युरोप, अमेरिका, इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांनाच जास्त नोबेल पुरस्कार का मिळतात? कारण त्यांच्याकडे वेगळा विचार करण्याची कुवत व मानसिकता आहे, तसे पोषक वातावरणही तिकडे आढळते. आपल्याकडे मात्र ‘पीएच.डी.’चे प्रबंध देखील ‘कॉपी-पेस्ट’ केले जातात”, ही खंत चांदोरकर अगदी तळमळीने मांडतात, त्यावेळी त्यामागचा त्यांच्यातील गुणवत्तेसाठी तडफडणारा उद्योजक दिसतो. सतत नाविन्याचा ध्यास आणि वेगळेपणात आनंद शोधणारा हा उद्योजक आहे. त्याचबरोबर केवळ स्वतःच्या व्यवसायापुरतंच न पाहता, समाजातल्या त्रुटी, वैगुण्य कसं दूर करता येईल, याचंही चिंतन करून ते विचार प्रत्यक्षात राबविणारे दीपक सतत कृतीशील राहतात.
कॅरॅमेल या नैसर्गिक रंगाच्या व्यवसायात ‘पोटॅशिअल’ आहे, पण केवळ पैसा कमविणे हा उद्देश नाही. या जागतिक समाजाचे आपण काही देणं लागतो, या उद्देशाने बिझनेस करायचाय. उद्योजकांना सोयीचे होतील, त्यांचा विस्तार वाढेल असे औद्योगिक कायदे बनले तरच देशाचा विकास
होईल असंही त्यांना वाटतंय… क्लेषकारक इन्स्पेक्टर राज पेक्षा राष्ट्रीय विकासाचे ध्येय असणारे इन्स्पेक्टर राज असावे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते.
देई छंद मकरंद –
छंद आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतात. परंतु जगरहाटीत सामान्य माणसालाही जिथे आपल्या छंदासाठी वेळ काढता येत नाही, तिथे चांदोरकरांसारख्या उद्यमशील उद्योजकास वेळ मिळणे खरं तर दुरापास्तच ! पण तरीही वेळात वेळ काढून हा बॉटनीचा स्टुडंट ‘हिपीअॅस्ट्रम’ या वनस्पतीचा आगळा-वेगळा व कदाचित भारतातील सर्वात मोठा संग्राहक बनला आहे. आपल्याकडील वातावरणात ही झाडे चांगली उगवतील, हा त्यांचा कयास खरा ठरला व आज त्यांच्या बागेत सुमारे ३०० हून अधिक प्रकारची ही झाडे आहेत. यासोबतच फोटोग्राफी, ड्रॉईंग, कुकींग, वाचन हेही त्यांचे आवडते छंद आहेत.
कुकींगचे उदाहरण द्यायचे झाले तर देश-परदेशात व्यवसायानिमित्त भ्रमंती करत असल्यामुळे तेथील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला आहे. एखादा विशिष्ट पदार्थ आवडल्यास पाकगृहात जाऊन तो पदार्थ कसा बनविला, कोणती सामग्री वापरली अशी संपूर्ण माहिती घेतात व तो पदार्थ स्वतः तयार करताना त्यात नाविन्यपूर्ण, आकर्षक बदलही करतात… दीपक हे ऑस्ट्रेलिया व इस्त्रायल येथील ‘Master Cheese Make’मध्ये प्रमाणपत्र धारक आहेत हे विशेष..! व्यवसायातील चढ-उतार असो, व्यवसायानिमित्त दौरे करणे असो वा छंदाची जपवणूक करणे असो.. खरं तर या सर्व गोष्टी करताना आपल्या कुटुंबाकडून मिळणारा मानसिक आधार हीच कोणत्याही व्यक्तीची प्रमुख बलस्थानं असतात.. म्हणूनच तर सौ. मीना चांदोरकर या सुविद्य पत्नीचे व कु. मलका चांदोरकर या कन्येचे दीपक यांच्या आयुष्यात व यशस्वी कारकीर्दीतदेखील अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे.
सामाजिक भान –
आपल्या सामाजिक जाणिवा समृद्ध असाव्यात व त्या संस्कारानेच येतात, पैशाने नव्हे… हा त्यांचा विचार मनापासून आलेला आहे. म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता ते आपले सामाजिक कार्य करत आहेत. आपल्याला शक्य होईल तितकी मदत ते समाजातील उपेक्षित घटकास करत असतात. ज्याला खरंच मदतीची गरज आहे, त्याला ती मिळाली की
समाधान… ‘वाचायला साधं, सरळ वाटणारं पण लौकिक अर्थाने तितकेच असामान्य असणारे हे तत्व’ चांदोरकरांनी जोपासलं आहे…
नाविन्यपूर्णता, वैचारिक क्षमता व सचोटी या गोष्टी विकत आणता येत नाहीत. त्यांची जपवणूकच करावी लागते. यशस्वी बनण्याचा तोच एकमेव पाया आहे, असा चांदोरकरांचा बिझनेसमध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांना सल्ला आहे. पारदर्शक व्यवहार आणि मूळ गुणवत्ता या गोष्टी कोणत्याही आगीतून तावून सुलाखून निघतात, हा त्यांचा संदेश म्हणूनच मोलाचा व महत्त्वाचा आहे.
