वेगळी उंची – आदेश चंगेडिया

आदेश चंगेडिया

 

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माहितीच्या युगात आम्ही कसं जगावं, काय खावं, काय प्यावं, काय परिधान करावं हे आम्ही ठरवत नाही! मग कोण ? तर सतत अनेक माध्यमातून व दिवसाचे अनेक तास सातत्याने हे सांगणाऱ्या ‘जाहिराती’, पण ज्या काळात केवळ वृत्तपत्रच जाहिरातीचे माध्यम होते, दूरदर्शनची केवळ वाहिनी होती. त्या परिस्थितीत नगरमध्ये प्रथमच रस्त्यावरून जातांना दिसणाऱ्या मोठ्या जाहिरातींच्या होर्डिंग्जने प्रवेश केला. या आऊटडोअरच्या जगातील जाहिरातींचे हे माध्यम अल्पावधीत ‘चंगेडिया आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग प्रा. लि.’च्या माध्यमातून एक वेगळी उंची गाठत लाखो माणसांच्या स्वप्नांचे सौदागर झाले…

‘आदेश चंगेडिया’ एक जिद्दी व्यक्तिमत्व… पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये ‘एम.बी.ए.’चे शिक्षण घेत असताना नगरमध्ये येऊन पिढीजात व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला. वडिलांच्या ‘मे. राजमल श्रीमल चंगेडिया’ या मार्केट यार्डमधील नामांकीत फर्ममध्ये सर्वात प्रथम मराठीमध्ये शेतकऱ्यांची संगणकीकृत पट्टी आदेशजींनी सुरू केली. एकीकडे शिक्षण व दुसरीकडे व्यवसायाचे गणित सांभाळणाऱ्या आदेशजींच्या जीवनात आयुष्यभर सोबत करणाऱ्या जोडीदाराने प्रवेश केला. आदेशजींचा अहमदनगर येथील श्री. शरदजी

मुनोत यांची भाची व श्रीमती डॉ. सुरेखा प्रितम घुगारिया यांच्या कन्या प्रियंका यांच्याशी प्रेमविवाह झाला. प्रेमाच्या आणाभाका घेऊन सुरू झालेला संसार. मात्र दोघांचा एकमेकांच्या जीवनात झालेला प्रवेश आयुष्याचे गणिते बदलविणारा ठरला. पत्नी प्रियंकाने, “तुम्ही पिढीजात व्यवसायाबरोबर स्वतःच्या कर्तृत्वाने आपले ‘विश्व’ निर्माण करा, तुमच्या त्या कमाईच्या पैशांतूनच आपण हनिमूनला जाऊ’, हे उच्चारलेले वाक्य आदेशजींना आव्हानात्मक वाटले. ‘उद्योजक व्हायचं असेल, तर माणसाकडे प्रतिभा हवी. काही तरी निर्माण करण्याची आणि ते घडवून आणण्याची जबरदस्त इच्छा हवी’ हे जाणून पत्नी प्रियंकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा तरुण सरसावला.

शून्यातून सुरुवात –

२००३-०४ च्या वर्षातील हा पहिला प्रयत्न. अहमदनगर जिल्ह्यातील मोठी आडत फर्म असल्या कारणाने घरच्यांनी दुसरा व्यवसाय करायला विरोध केला. आजोबांनी स्पष्ट शब्दांत ‘एक फुटी कवडी मिळणार नाही’ असे खडे बोल सुनावले. पण आदेशजींचा काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न सुरूच होता. आदेशजींचे जिजाजी (मेहुणे) अमितकुमार रमेशकुमार मुनोत यांचा ‘वॅम ऑरगॅनिक्स्’ नावाने गॅस सप्लायचा वाळुंज

(औरंगाबाद) येथे व्यवसाय होता. आदेशर्जीनी नगरमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा मानस त्यांच्याकडे व्यक्त केला व त्याला संमती मिळाली. कुठलेही भांडवल नसतांना जिजार्जीच्या सहकार्यातून आदेशजीमधील उद्योजकाचे हे पहिले पाऊल स्वतंत्रपणे पडले. नगरच्या ‘एम.आय.डी.सी.’मध्ये प्रारंभी दोन-तीन एजन्सी गॅस वितरित करत. पण त्यांची मोनोपली व विस्कळीत सेवा याचा फायदा आदेशजर्जीनी घेतला. घरचा व्यवसाय करून केवळ शनिवार व रविवारी आदेशजी विविध कंपन्यांच्या दारोदारी जाऊन गॅसच्या ऑर्डर घेऊ लागले. काही महिन्यानंतर त्यांनी ‘वॅम ऑरगॅनिक्स् या वासरहित गॅसची संकल्पना नगरच्या उद्योगविश्वात ठेवली. वासरहित हा गॅस इतर गॅसच्या तुलनेत महाग असल्याने तो काही उद्योगांनीच स्वीकारला. वासरहित गॅसचे महत्त्व नंतर पटू लागल्याने अवघ्या एका वर्षातच सर्व उद्योजकांनी वास असलेला गॅस घेणे बंद केले. आदेशजींचा हा पहिलाच प्रयोग, प्रतिस्पध्र्थ्यांना हादरा देणारा ठरला.

आदेशजी ‘गॅसच्या निमित्ताने औरंगाबादच्या जिजार्जीच्या वाळुंज कंपनीत गेले. जिजार्जीचा ‘गजेंद्र आर्टस्’ या नावाने गेली ३५-४० वर्षे आऊटडोअर होर्डिंगचा व्यवसाय होता. यावेळी आदेशजींनी असंख्य होर्डिंगचे सांगाडे तेथे पडलेले पाहिले. विचारपूस केल्यावर औरंगाबाद शहर, जालना रोडच्या विस्तारीकरणात मनपाने हे होर्डिंग काढून टाकले असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर ३ महिन्यांनी जिजाजींना ‘मॅकडॉवेल’ या कंपनीच्या जाहिरातीचे महाराष्ट्राचे काम मिळाले. त्यामध्ये नगरला चार होर्डिंग तातडीने उभे करावयाचे होते. आदेशजींना या कामाचा सर्व्हे करण्यास सांगितला. तेव्हा त्यांनी नगरमध्ये अगदी छोटे व बोटावर मोजण्याइतके होर्डिंग असल्याची माहिती फोटोसह पाठविली. जिजाजींनी तीन नवे होर्डिंग उभे करू असे आदेशजींना सांगितले. पण त्यांचा या व्यवसायात अजिबात रस नव्हता. ‘तुम्ही या व तुमच्या पद्धतीने कोठेही लावा’ या वाक्यात आदेशजींनी हा विषय संपविला. पण नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते.

जिजार्जीचे पाठबळ –

जिजार्जीनी दिलेला ‘तू स्वतःच्या बळावर होर्डिंग उभे कर’ हा प्रस्ताव आदेशजींनी नाकारला. ‘माझ्याकडे एक तर पैसे नाही व होर्डिंगचा व्यवसाय करायला वेळही नाही’ असे उत्तर दिले. ‘आदेश, तू फक्त जागा निवड. मटेरियल मी देतो,’ या जिजाजींच्या उत्तरावर आदेशजी यासाठी तयार झाले. प्रारंभी विक्री प्रतिनिधीबरोबर चर्चा करताना पुण्याकडून नगरमध्ये प्रवेश करतानाची होर्डिंगची दिशा असावी असा निष्कर्ष काढला. आदेशजींनी त्याच्याविरोधी पुण्याच्या दिशेने अर्थात नगर एक्झीटच्यादिशेने ती असावी, असे सुचवले. जिजार्जीशी

चर्चा झाल्यावर दोन्ही ठिकाणी होर्डिंग लावावे असे ठरले. प्रश्न जागेचा होता. जी जागा ठरली, ती उद्योजक गोकुळशेठ गांधी यांची. त्यांनी होर्डिंगच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. परंतु चर्चा झाल्यावर आदेशजींचा उत्साह पाहून तसेच ‘राजूशेठचा मुलगा म्हणून एक वर्षासाठी तुला जागा देतो. तुला परवडेल तितके भाडे दे’ असे सांगून ती जागा दिली. नशिबाने दिलेल्या पहिल्याच यशस्वी कौलानंतर ‘मॅकडॉवेल नंबर १’ या कंपनीने आदेशजींनी दाखविलेलीच जागा मान्य केली. आदेशजींचा होर्डिंगचा अचूक अंदाज व गोकुळशेठ गांधी यांनी दिलेली संधी ‘चंगेडिया आऊटडोअर्स’ची मुहूर्तमेढ ठरली. त्यानंतर अहमदनगर शहरातील मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास श्री. राजेंद्र चोपडा यांनी पत्रकार चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जागा मिळवून देण्यास मदत केली. नगर शहरात एकाच वेळी २० फूट बाय ४० फूटचे महाकाय होर्डिंग झळकले ते ‘चंगेडिया आऊटडोअर्स’चे. पहिले ‘मॅकडॉवेल नंबर १’ तर दुसरे ‘रिलायन्स’चे.

“प्रचलित बाजारपेठेच्या व ट्रेंडच्या प्रवाहाच्या विरोधात जाताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. आदेशजींनाही या गोष्टीचा अनुभव सुरुवातीला आला. चंगेडिया आऊटडोअर्सने मोठे होर्डिंग उभारण्यास प्रारंभ केल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर ‘कोहिनूर’ या वस्त्रदालनाने पहिले होर्डिंग भाडेतत्त्वावर घेतले…” आदेशजी सांगत होते. नगरमध्ये आपल्याला या मोठ्या होर्डिंगसाठी ग्राहक मिळणार नाही ही मानसिकता आदेशजींची झाली. मुंबईला जाऊन होर्डिंगचा व्यवसाय मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. मात्र, छोटे होर्डिंग लावण्याचा कधीही विचार केला नाही. मोठी स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकाची मोठी सुरुवात होती ती…

अनुभवांची शिदोरी –

प्रारंभीच्या काळात मिळालेले अनेक खडतर अनुभव हे प्रगतीशील भविष्याची शिदोरी होती. नगरच सोडा पण कॉर्पोरेट भागात खूप प्रयत्न करूनही होर्डिंग जात नव्हते. तत्कालीन स्थितीत होर्डिंग पेंट केले जात असल्याने त्याचा खर्च खूप होता. त्यामुळे त्याकडे कंपन्याचा ओढा मर्यादित होता. पुढील एक-दीड वर्षात फ्लेक्स प्रिंटिंग तंत्रज्ञान आले. परंतु त्याची किंमतही जास्त होती. त्याचा सर्व परिणाम होर्डिंगवर होत असे. पुणे-मुंबईच्या मोठ्या होर्डिंगकडे

पाहताना पुढे आपल्या होर्डिंगला मोठी मागणी असेल, असा विश्वास आदेशर्जीच्या मनात होता. भविष्यात तो सिद्धही झाला.

२००५ साली व्यवसायाचा विस्तार करायचा विचार आला. नवीन होर्डिंगसाठी ५ लाख रुपये हवे होते. घरच्यांकडे मागणी केली…. अपेक्षेप्रमाणे नकार…. मर्चेंट बँकेचे उंबरठे झिजवले… मोठ्या अथक प्रयत्नाने कर्ज मिळाले. मग एकाच वेळी आनंद ट्रेडिंगवर उभे राहिले ३ होर्डिंग ते २० फूट x ४० फूटाचे…

आदेशजी २००६ मध्ये शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असताना नगरमध्ये वादळ झाल्याची बातमी आली. तातडीने ते नगरला आले. सर्व होर्डिंग्ज जमीनदोस्त झाले होते. नैसर्गिक संकटाने होर्डिंग उन्मळून पडताना त्यांची ‘स्वप्नेही’ उद्ध्वस्त झाली होती… तीन दिवस ते पुन्हा त्या पडलेल्या होर्डिंग्जकडे फिरकले नाही. व्यवसायातील सुमारे १० लाख रुपयाचे नुकसान मानसिक आघात करणारे ठरले. पडलेले होर्डिंगचे स्क्रॅप विकून बँकेचे कर्ज फेडायचे व हा व्यवसाय बंद करायचा त्यांनी निर्धार केला.

या संकटाच्या काळी मामांनी शांतीलालजी लुणिया (घोगरगांव) यांनी दिलेला व्यावसायिक संकट निवारणाविषयीचा गुरूमंत्र दिशा देणारा ठरला. त्यांनी समजावले की, ‘श्री साईंची इच्छा अशी असावी की, ५० कमजोर होर्डिंग्ज लावल्यानंतर ते पडण्यापेक्षा, ५ बोर्ड पाडून पुढील ५०० साठी आदेशला सक्षम करावे.’ तिथून पुढे शून्य ते ५०० ची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला प्रेमविवाहामुळे नाराज असणारे मामेसासरे, नंतर आदेशची व्यवसायातील प्रामाणिक धडपड पाहून ‘इम्प्रेस’ झाले. श्री. शरद मुनोत यांनी ‘गुरू’ या नात्याने व्यवसायाच्या पुनर्डभारणीत मोठा आधार दिला. त्यांची पार्श्वभूमीही अभियांत्रिकीची असल्याने त्यांचा सल्ला आदेशजींना मोलाचा ठरला. प्रसिद्ध डिझायनर विवेक आपटे यांच्या मार्गदर्शनामुळे उभे राहिलेले नवीन होर्डिंगचे स्ट्रक्चर भविष्यात असंख्य वादळातही ताठ मानेने उभे राहिले आणि ‘चंगेडिया आऊटडोअर अॅडव्हर्टायझींग प्रा.लि.’ सुद्धा !

या सर्व चढ-उतारात आई-वडिलांनी व्यवसायात विरोध केला नाही. शक्य तितक्या प्रकारे त्यांनी सकारात्मक पद्धतीने मदत केली. मामेसासरे मुनोत यांनी बँकेत स्वतःचे ‘मॉरगेज’ देऊन आदेशजींना मर्चेंट बँकेत मोठे कर्ज मिळवून दिले. जैन समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय फुलचंद चोपडा यांची शासकीय परवानग्या मिळविण्यास व जाहिरात बोडर्डाचे परवाने नियमित करण्याच्या सल्ल्याने आत्मविश्वास वाढत गेला. चंगेडिया आऊटडोअर अॅडव्हर्टायझींग प्रा.लि. यामधून आकार घेत गेले.

आदेशजींच्या या व्यवसायाच्या प्रवासात अनुभव हेच आपले शिक्षण व गुरू ठरले. वडिलांचा व्यवसाय, ‘गुडवील’ व बहिणीची जिद्दीने काम करण्याची शिकवण ही आयुष्याची शिदोरी होती. त्यांच्या तत्वाचे अनुकरण आयुष्याला दिशा देणारे ठरले. त्यामुळेच जागा मालकांनी

आपल्या कोट्यवधी रुपयांच्या जागा विश्वासाने होर्डिंगसाठी दिल्या. चंगेडिया आऊटडोअर्सवरचा हा मोठा विश्वास होता. जाहिरातीच्याबाबतीतही आपण अनेक तत्वे सांभाळली. कितीही नुकसान होत असते तरी आक्षेपार्ह जाहिराती कधीही स्वीकारती नाही असे आदेशजी आवर्जून सांगतात.

सामाजिक जबाबदारी-

चंगेडिया आऊटडोअर्सने आपले सामाजिक भान राखत अनेकवेळा होर्डिंगमधून सामाजिक संदेश देण्याचे कार्य केले आहे. सामाजिक, धार्मिक संस्थांना आपल्या होर्डिंगमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून मोफत सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, असे आदेशजींनी सांगितले.

या व्यवसायात राजकारणी लोकांच्या शुभेच्छा फलकांचा मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने या व्यवसायाकडे कोणीही यायला तयार नाही. आज नगर शहर व जिल्ह्यात बहुतांश होर्डिंग आमचे असले, तरी तत्त्वात कधीही बदल केला नाही. विरोधकांच्या विरोधाचा विचार न करता आमचा चंगेडिया आऊटडोअर्स परिवार बदलांचा अंगीकार करत गेला. हे सर्व करताना स्केचिंग, बॅडमिंटन या आवडत्या छंदातही ते रुची घेतात. मंदिरातील देवदर्शनानंतरच त्यांची दिनचर्या सुरू होते.

नगर शहरातून पाच जिल्हे व विविध राज्यांना जोडणारे महामार्ग आहेत. ते विस्तारित होण्याची गरज आहे. नगरचे मोठे खेडे हे चित्र बदलण्याची सर्वांचीच इच्छाशक्ती हवी. शहराच्या अधोगतीसाठी नव्हे तर प्रगतीसाठी राजकारण झाले तर तो नगरच्या सर्वांगीण विकासाचा सुवर्णक्षण असेल असे ते आवर्जून सांगतात.

उद्योगात-व्यवसायात येणाऱ्या नवीन पिढीने अल्प काळात मोठे यश मिळवण्याचा शॉर्टकट स्वीकारता कामा नये. प्रामाणिकपणे व नीतीने प्रयत्न व कष्ट केल्यास कोणताही व्यवसाय यश देतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूरदृष्टीने व योग्य दिशेने टाकलेले पाऊल हे निश्चित प्रगतीला प्रेरक ठरते, असा संदेश ते देतात. नगर शहरात आऊटडोअर्सच्या जाहिरातींचा बादशाह ठरलेल्या चंगेडिया आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग प्रा.लि. व आदेशजीचे कर्तृत्व नव तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे.

error: Content is protected !!