सोहन चोरडिया
सोहनजींचा जन्म बालमटाकळीचा… शिक्षण व ते घेताना शिस्तीचे धडे हे नगरच्या मातीतले, अ.ए. सोसायटी हायस्कूलमधले (आत्ताचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल). इयत्ता ४ थीपर्यंत म्युन्सिपालटीची शाळा व त्यानंतर एस.एस.सी. पर्यंत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. वडिल व आजोबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढल्याने सोहनर्जीनी शिक्षण घेण्यावर त्यांचा कटाक्ष होता. वडिल ‘बन्सीलालजी’ यांना स्वतःला आवड असूनही शिक्षण न घेता आल्याची खंत होती. आपल्या मुलांनी पारंपरिक व्यवसायाची गादी न चालविता शिक्षणाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. यासाठी सतत दक्षपणे प्रयत्न केले. सोहनजी हे सर्वात
मोठे त्यामुळे शिस्तीची सुरुवात त्यांच्यापासूनच… अभ्यासाशिवाय दुसरे काही विचारायचे नाही… चांगली पुस्तके वाचण्याची शिस्त… शाळेत दररोज पायी व नंतर केवळ शनिवारी सायकलवर जाण्याची परवानगी… पेन नाही. टाक आणि दौत… ‘चहा’ पिण्यासाठी आजारी पडावं लागायचं… दिवाळीला खूप रडल्यानंतर फटाके… अशा अनेक गोष्टी सोहनजींना जाचक वाटायच्या…. मात्र ते सहनशील राहिले, त्याविरोधात कधीही बंड केले नाही.
सोहनजी वगळता सर्व भावंडे ही ‘कॉन्व्हेंट स्कूल’मध्ये शिकली.
समाजात शिक्षणाला महत्त्व नसताना व परंपरागत व्यवसायाची गादी चालवण्याची प्रथा असतानाही वडिल व आजोबांचे शिक्षणाविषयीचे अतिप्रेम हा समाजाच्या अवहेलनेचा विषय ठरला. ‘बन्सीलालजी आपल्या मुलांना ख्रिश्चन करायला निघाले’ अशी उपरोधिक वाक्ये खूपदा आली. पण दूरदृष्टी असणाऱ्या बन्सीलालजींनी आपल्या सर्व मुला- मुलींना जाणीवपूर्वक उच्चशिक्षित केले.
जिद्दीने शिक्षण –
पुण्यात शिक्षण घ्यायचे असेल, तर सोहनजींना काही अटी टाकल्या व त्या त्यांनी जिद्दीने पूर्ण केल्या. तुला फग्र्युसनलाच प्रवेश मिळाला पाहिजे, त्याच फर्ग्युसनमधील होस्टेलमध्ये प्रवेश मिळायला हवा व एस.एस.सी.मध्ये डीस्टींग्शन हवे… या तीनही गोष्टीचं यश मिळाल्यावर १९५९-६३ चा इंजिनियरिंग कॉलेजचा प्रवासही त्यावेळी गंमतीशीर… खूप काही शिकविणारा… प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात जगण्याची जिद्द निर्माण करणारा होता… ग्वाल्हेरला नवीनच झालेल्या परंतु अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक असणाऱ्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे ठरले. त्यासाठी एक मोठी ट्रंक, गादीची वळकटी असा पसारा बरोबर दिला व फक्त मनमाडपर्यंत एक सोबत… त्यापुढचा प्रवास
एकट्याचा… पहिल्यांदाच राज्याबाहेर व कोणीही ओळखीचे नसणाऱ्या ग्वाल्हेर मध्ये शिक्षणासाठीची परीक्षा… रेल्वेतून उतरल्यावर ‘ए. कुली इधर आवो’ असे मी म्हटल्यावर ‘बेटे, आप अपने पिताजी को भी ऐसेही बुलाते हो?’ असा प्रतिप्रष्ठन आल्यावर मी निःशब्द झालो. दुसयाही आदराने व नम्रतेने राहण्याचा मिळालेला पहिला धडा दुसयाशी कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगमुळे परतण्याचा निर्णय. परंतु ओळखीचे निवृत्त शिक्षण संचालक श्री. व्यास यांच्यामुळे तेथे टिकलो. उत्तर भारतीय पद्धतीचे जेवण रुचत नव्हते तरी खाण्याची सवय लावली. अत्राला कधीही आजपर्यंत नावे ठेवली नाही… या कॉलेज जीवनातील तीनही गोष्टी पुढील आयुष्यातील खडतर प्रवासात सोबत देणाऱ्या ठरल्या…
नोकरीचा अनुभव –
सोहनींचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच रांचीला ‘एचएससीएल’ मधून झेकोस्लाव्हीयन कंपनीचे कोलॅबोरेशन असलेल्या प्रोजेक्टमध्ये झेकोस्लोव्हीकाला जाण्याची संधी मिळत असूनही ती नोकरी नाकारली. वडिलांचे असे सांगणे होते की, शिक्षणानंतर लगेचच व्यवसाय नाही करायचा. किमान ५ वर्षे तरी परदेशी कंपनीत कामाचा अनुभव घ्यायचा. त्यानुसार सोहनर्जीनी १९६३ पासून ऑगस्ट १९७० पर्यंत नोकरी केली ती अमेरिकन जनरल इलेक्ट्रीकल्सच्या भारतात असलेल्या एल्प्रो इंटरनॅशनल लि.मध्ये. प्रारंभी काही तरी शिकण्याची, नवीन काहीतरी करून दाखविण्याची जिद्द खूप काही देऊन गेली. हायली टेक्नीकल ट्रेनी म्हणून काम करताना पहिला २०० एम. ए. एक्सरे डायग्नॉस्टीक युनिट हा तयार झाला. त्यामध्ये सोहनजींचा सिंहाचा वाटा होता. पहिल्यांदाच भारतात विकसित केलेली ही यंत्रणा त्यांच्या यशस्वीतेचे बीज होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनेक वर्ष अथक परिश्रम करून प्राप्त झालेला हा बहुमान त्यांना सतत पुढे घेऊन गेला. त्यांच्या या नोकरीच्या काळात त्यांचे वरिष्ठ अधिकारी रेसिडेंट डायरेक्टर श्री. जाल मेहरूमजी हे गुरू लाभले. अनेक अनुभव, मार्गदर्शन यामुळे मेहरूमजींकडून सोहनजी उद्योजकतेचे धडे आपसूक घेत गेले. त्यांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरले.
दरम्यानच्या काळात १९६४ मध्ये सोहनजीच्या जीवनात आयुष्याची जोडीदार म्हणून हेमलता यांनी प्रवेश केला. त्या बी.ए.च्या शेवटच्या वर्षात असताना लग्न झाल्यानंतर सोहनजींच्या आजोबांनी सुनेला माहेरी पाठवून शिक्षण पूर्ण करून घेतले. आजोबांचे त्यावेळीही शिक्षणाविषयी असणारे प्रेम स्पष्टच होते. सोहनजी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सतत प्रयोगशील राहून शिकत राहिले. नवनिर्मितीचा त्यांचा ध्यास त्यांना अनेक प्रकारचे यश देऊन गेला. त्यासाठी ते रात्री उशिरापर्यंत कंपनीत काम करायचे. कित्येकदा एस. टी. गाठण्यासाठी मध्यरात्री चिंचवड ते
पिंपरीपर्यंतचे आठ किलोमीटरचे अंतर पायी चालत यायचे. शिक्षणाचे असे वेगवेगळे धडे शिकविणारे गुरू फार होते. पण आपली जिद्द, ‘ग्रहण करण्याची कुवत’ महत्त्वाची होती. ती सोहनजींची लहानपणापासून वृद्धींगत होत गेलेली.
व्यवसायाची वणवण –
आज सोहनजींना या क्षेत्रात सुमारे ४८ वर्षे झाली. ते अजूनही त्यामध्ये सतत कार्यरत राहून प्रगती करतात. मात्र इतिहासाची पाने उलगडली तर अनेक धक्कादायक अनुभव त्यांनी घेतल्याचे जाणवते. नोकरी करताना सतत खूप काम केल्याने त्यामध्ये त्यांना ‘मास्टरकी’ मिळाली. आता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे वाटू लागले. फर्ग्युसनमध्ये शिकत असताना सोहनजींच्या पुढे दोन वर्षे शिकणारे श्री. दाणी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण स्नेहातून व्यवसाय करण्याचे निश्चित झाले. ‘शेठजी व भटजी’ असे जातीवाचक गणित अनेकांकडून नकाराचा सूर देऊन गेले. पण जग काहीही म्हणो, आपल्याला व्यवसायात यश मिळवायचं या जिद्दीने ही जोडगोळी व्यवसायात उतरली. एकाच कंपनीत काम करणाऱ्या ‘चोरडिया-दाणी’ यांनी नोकरीवर पाणी सोडून व प्रत्येकी १३ हजारांचा प्रॉव्हीडंट फंड घेऊन रामराम ठोकला. २६ हजारांचे भांडवल घेऊन व्यवसाय करणं तसं अशक्य होतं. वडिलांकडे पैसे असूनही ‘मी व्यवसाय शून्यातून उभा केला, तुलाही तो शून्यातूनच निर्माण करावा लागेल’, हा सल्ला आव्हान देऊन गेला. फक्त घरच्या ‘किचनची जबाबदारी आईने’ घेतली तोच काडीचा आधार… सोहनजींची सुरुवात होती ती…
तत्कालीन परिस्थिती इंपोर्टचा काळ असल्याने व कस्टम ड्युटी २०० पट असल्याने भारतात नवीन संशोधनास वाव होता. चोरडिया-दाणी या नवव्यवसायिकांनी यासाठी खूप सर्व्हे केला. शेवटी बकाऊउल्फ कंपनी आयात करीत असलेले टायमर बनविण्याचे ठरले. परंतु गिअर टेक्नोलॉजी, प्लॅस्टिक टेक्नोलॉजी व इतर अनेक गोष्टी त्यात असल्याने व या सर्वच गोष्टींचा पूर्वानुभव नसल्याने द्विधा मनःस्थिती झाली. यासारख्या उत्पादनांसाठी बँकेकडे आर्थिक सहकार्य मिळावे म्हणून अर्ज केला. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. पण जिद्द कायम होती. व्यवसायात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची नाही, कमीतकमी लोन व डाय- मोल्डसाठी पैसे उभे करणे असे ठरले. त्यावेळी स्टॅण्डर्ड मशिनरीसाठी लोन मिळायचे. परंतु डाय-मोल्डचा प्रश्न कायम
होता. याचवेळी ‘बैंक ऑफ बडोदा’चे लक्ष्मी रोड शाखेचे (पुणे) व्यवस्थापक श्री. घाडगे यांची भेट झाली. तू ‘बन्सीलालजीं’चा मुलगा आहेस. तू पैसे बुडविणार नाही. मी तुला बँकेचे लोन देतो, असे म्हणत मदत केली. वडिलांच्या पुण्याईवर मिळालेला हा ‘आधार’ दिशा देणारा ठरू लागला आणि त्यामधून जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स् प्रा.लि. बाळसे धरू लागले. आम्ही उत्पादन करणाऱ्या ‘टायमर’ मध्ये टूल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक्स यासह अनेक गोष्टी एकत्र आल्याने ते एक मोठे आव्हान होते. हे सर्व करताना आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. गाडी विकली… फोनचे पैसे मिळायचे म्हणून तोही विकला… नियतीने पाहिलेल्या ४० महिन्यांच्या या परीक्षेत शेवटच्या दीड वर्षांत घरात पाहुणे आले तरच भाजी… अशी स्थिती. पण आम्ही दोन्ही पार्टनरने असे ठरविले होते की, दोन नंबरचा व्यवसाय करायचा नाही. ब्रँड सोडायचा नाही.. अगदी शून्यापासून शून्यापर्यंत गेलो तरीही…
यश दारी आले –
अनेक परदेशी-देशी कंपन्यात हे दोघेही युवक आपला ब्रँड घेऊन फिरत त्यांना डेमो दाखवत. हा ‘टायमर’ आता भारतातही उपलब्ध आहे, हे दाखविण्याचा हा खटाटोप. पण अनुभव मात्र खूप विचित्र… मोठमोठ्या कंपन्यांना यामध्ये खूप स्वारस्य होते. मात्र, त्यांच्या अटी जाचक… उत्पादन आमच्याच नावाने करायचे व त्यांची इतरांना विक्री करायची नाही. पुन्हा दोघांनी आपल्या तत्त्वांना धरून या गोष्टी नाकारल्या. शेवटी ‘एल अॅण्ड टी’ या जगातील ७० ते ८० हजार कोटींचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीशी बैठक झाली. अतिशय दयनीय, फाटक्या अवस्थेत असणाऱ्या पण गगनाला भिडणारे स्वप्न उराशी बाळगताना ही बोलणी यशस्वी केली. तत्कालीन डिव्हीजनल मॅनेजर यांनी चोरडिया- दाणी यांना मैत्रीचा हात दिला. ही विश्वासाची वीण इतकी घट्ट झाली की ती पुढेही आजतागायत तशीच वृद्धिंगत होत राहिली. अनेक वर्षे तपःश्चर्या करून मिळालेले हे यश सोहनजींना भविष्यातील मोठी गरूडझेप घेण्यासाठी पाठबळ देणारं ठरलं.
हे सर्व होताना सोहनजींनी ज्या गोष्टी येत नव्हत्या, त्याही यामध्ये अवगत केल्या. प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, पॉलीमर इंजिनिअरींग, टूल इंजिनिअरींग, मॅनेजमेंट इ. या सर्व अद्ययावत शाखा त्यांनी यशस्वीपणे, जिद्दीने उभ्या केल्या. त्यांच्या जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स् प्रा.लि.च्या पहिल्याच उत्पादनाला नामांकित असे ‘पारखे’ पारितोषिक मिळाल्याने उद्योग जगतात त्यांच्या ब्रँडला मानाचे स्थान प्राप्त झाले.
भारतातील उत्पादनाबरोबरच कंपनीने परदेशातील अनेक कंपन्यांसाठी काम केले. जर्मन कंपन्यांच्या प्रॉडक्टच्याबरोबरीने सोहनजींनी आपले उत्पादन बनविले. त्याचा राग येऊन पहिल्यांदा ज्या जर्मन उद्योजकांनी निराशेचा सर दिला. त्यांनीच नंतर यांच्याशी मैत्रीत्ता हात पुढे केला. सतत वडिलांनी दिलेल्या तत्त्वावर आपण वाटचाल करत राहिल्याने हे यश मिळाले, असे सोहनजी सांगतात.
जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स् प्रा.लि. स्वतः अनेक गोष्टींनी, तंत्रज्ञानाने सक्षम होताना कंपनीने स्वतःच स्वतःच्या परीक्षा घेतल्या. इमर्सन इलेक्ट्रीक अमेरिकाः इएमबी इलेक्ट्रीक, अमेरिका, लीग्रांड, जर्मनी: ग्रासलीन, जर्मनी: अशा अंतर्देशीय कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशन केले. रेडिंग्टन, अमेरीकाः टू मीटर, अमेरिका व यु.के., डीपसी, यु के अॅन्फीनॉल, जर्मनी; व तत्सम अंतर्देशीय कंपन्यांबरोबर व्यावसायिक संबंध जोडले व त्यांना प्रोडक्टस्, कंपोनंटस्, टूल-मोल्डस् एक्सपोर्ट करत आहेत. इमर्सन ऑफ अमेरिका, डीपसी ऑफ यु. के., अॅन्फीनॉल ऑफ जर्मनी अशा अनेक परदेशी कंपन्यात त्यांनी टूल्स सप्लाय करून भारतीय बुद्धीमता सिद्ध केली. गोजो या अमेरिकन कंपनीने सर्व्हे करून सोहनींना मोल्डसाठी ऑफर दिली. त्यांनी बनविलेले मोल्ड इतके दर्जेदार होते की तुम्ही उत्पादनही करा, असे आवाहन त्यांनी केले. त्याला साद देत सोहनजींनी हे आव्हानही यशस्वी केले.
भारतासारख्या व्यापार करणाऱ्या देशात आता शासन मात्र उदासीन आहे. व्यापाराला पोषक वातावरण निर्माण झाले तर त्यात मोठी वाढ होईल असे असले, तरी या देशात अंबानी, व्हिडिओकॉन निर्माण झालेच ना! ठराविक वर्गाची व्यापाराची मक्तेदारी संपून मराठी माणूससुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झाला आहे. हे सर्व होताना अनुभवांच्या ठेचा अनेक गोष्टी शिकवून जातात. निर्णय चुकतात, नुकसान होते पण ‘नुकसान हेच भांडवल’ समजून जो पुढे जातो तो यशस्वी होतो, असे सोहनर्जीचे स्पष्ट विचार आहेत.
कुटुंब प्रमुखाची भूमिका –
सोहनजींकडे असणारी निरीक्षण बुद्धी, जिज्ञासा त्यासाठी द्यावा लागणारा वेळ व पैसा या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. व्यवसायाबरोबरच त्यांनी अनेक आवडी-निवडी, छंदामधून आपले जीवन सर्वांगसुंदर बनविले आहे. प्रत्येक गोष्ट स्वतः ने करायची सवय अनेक नवीन गोष्टी शिकवून गेल्या. ‘जे कराल ते उत्तम करा’ तुमच्या मनाला जोपर्यंत समाधान मिळत नाही, तोपर्यंत ती गोष्ट अपूर्ण आहे असे समजा, हा संदेश त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक आहे.
जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स् प्रा.लि.च्या यशस्वी वाटचालीत सोहनींच्या पत्नी सौ. हेमलताजी तसेच बंधू श्री. शांतीलालजी व डॉ. सुरेश यांचा पाठिंबा सतत राहिला आहे. कुटुंबातील मोठी सून, कुटुंब प्रमुख, पतीला व्यवसायात मदत करणारी पत्नी इथपासून ते जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स् प्रा.लि.च्या दुसऱ्या शाखेच्या-एस.बी. इंडस्ट्रीयल कम्बाईन्स्च्या संचालिका हा त्यांचा थक्क करणारा प्रवास.
सोहनजींनी या सर्व काळात आपले सामाजिक भान सतत जपले.
सुमारे २२ वर्षे रोटरीच्या माध्यमातून त्यांनी समाजाची निःस्पृहपणे सेवा केली. त्यानंतर वडिल व आजोबांच्या नावाने ट्रस्ट उघडून सुमारे १ कोटी रुपयांचा फंड उभारला. त्यामधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम सुरूच आहे. समाजाप्रमाणे सोहनींनी आपली संस्कृती व कुटुंब मोठ्या प्रेमाने जपले व जिंकले. कुटुंब प्रमुख म्हणून सोहनजी व त्यांच्या पत्नीने केलेल्या त्यागातून आजही चोरडिया कुटुंब एकत्रपणे आदर्श म्हणून उभे आहे.
सोहनर्जीचा नगरपासून सुरू झालेला प्रवास पुणे व तेथून जगभरात व्यवसायाच्यानिमित्ताने यशस्वीपणे पोहोचला. स्वतःचे कान, डोळे उघडे ठेवून जगाची बिनभिंतीची शाळा पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप काही शिकवून जाते असा हा संदेश… कुठल्याही व्यवसायात किमान १ हजार दिवस तरी अनुभवायचे. शिक्षण, पारदर्शीपणा, प्रामाणिकपणा व कष्ट यामधूनच मिळणारे खरं यश हे यशस्वी जीवनाचे मार्ग ते आदर्श मानतात. शून्यातून निर्माण केलेलं जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स व ऐसबी इंडस्ट्रीयल कम्बाईन्स् या विश्वाच्या यशस्वी पसाऱ्यातून बाहेर पडून मुलांसारखे पुतणे अजय, विजय व ओजस यांच्या हाती हा व्यवसाय सोपवून पुन्हा शून्याकडे येण्याचे धाडस हे असामान्य माणसाचं लक्षण.. नगरच्या मातीतून घडलेले व जगभर नाव गाजवून पुन्हा आपले पाय जमिनीवरच ठेवणारे सोहनजी व सौ. हेमलता चोरडिया यांचा जीवन प्रवास प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.
