विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी हे ४ उपाय करा
भगवद्गीतेतील अर्जुन-कृष्ण संवादात, अर्जुन एकदा म्हणतो की मी माझ्या बाणांच्या अभेद्य भिंती उभारून साक्षात पवन देवाला बंदी करू शकेन – वारा थांबवेन – पण हे मन कसं स्थिर करू?! ते काही माझ्याच्याने होत नाही! एकमेव “पूर्णपुरुष” असलेल्या अर्जुनाला आपल्या विचारांना मुठीत ठेवता येत नाहीत, त्यासमोर आपली काय कथा?!
विचारांवर पूर्ण ताबा मिळवण्याचं जटिल, किचकट ध्येय अप्राप्य वाटत असलं – तरी विचारांचा अनावश्यक गुंता मात्र निश्चितपणे सोडवता येऊ शकतो. मेंदूला लागलेली सततची भिंगरी स्थिर करता येऊ शकते. ते एकदा साध्य झालं की आपल्या कामात पूर्ण लक्ष केंद्रित होऊन आपली परिणामकारकता कित्येकपट वाढवता येऊ शकते.
हा गुंता सोडवण्यासाठी पुढील ४ गोष्टी आवर्जून करायला हव्यात.
१) स्व-संवाद
सकाळी उठा – आवरासावर करून कामाला लागा – संध्याकाळी घरी या – झोपा…दुसरा दिवस पुन्हा तसाच सुरु… या नं थांबणाऱ्या चक्रात माणसाला स्वतःशी बोलण्याचा, स्वतःवर प्रेम करण्याचा, स्वतःची समजून काढण्याचा विचार ही मनात येत नाही. हा स्व-संवादच झाला नाही तर मनात साचलेले मळभ स्वच्छ कसे होतील? गुंता कसा सुटेल?
म्हणूनच, रोज ठरवून स्वतःला थोडाच वेळ द्या. ऑफिसला जाताना बस-लोकलने प्रवास करता का? त्यावेळी सतत मोबाईलवर वेबसिरीज नका बघू! जरावेळ डोळे मिटून गप्पा मारा स्वतःशी!
ऑफिसमध्ये ब्रेक घेतल्यावर, दिवसा कधीही चहा-कॉफी घेताना, रात्री झोपण्यापूर्वी – कधीही ही १०-१५ मिनिटांची “सेल्फ टॉक विन्डो” ठरवून घ्या!
या विन्डोत स्वतःशी गप्पा मारा, समजून काढा, स्वतःला प्रोत्साहित करा…स्वतःच स्वतःचं ऐका…मग बघा कसा जादुई परिणाम घडतो ते!
२) पेन इट डाऊन!
स्व-संवादाची पुढची, अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक स्टेप म्हणजे रोज सकाळी व रात्री “काहीतरी” खरडणे!
यात तुमचा दिवस कसा जाणार आहे – कोणकोणती कामं करायची आहेत, कालची कोणती कामं राहिली आहेत, काय छान घडलं आहे – दिवसभरात घडवणार आहात…असं सगळं लिहू शकता. अनेक यशस्वी लोकांनी ह्या एका सवयीला आपलं “सिक्रेट ऑफ सक्सेस” सांगितलं आहे. यावरूनच या एका सवयीची ताकद लक्षात येते.
म्हणूनच निर्णय घेऊन, ही सवय लावून घेतली तर विचारांना ठोस दिशा देणं, अनावश्यक काळजी दूर सारून शिस्तशीर कृतीकडे लक्ष देण्यासाठी ही सवय अंगिकारायला हवी.
३) सकारात्मक संगत
आपल्या नकळत आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या मनस्थितीवर प्रभाव पाडत असतात. सतत नकारात्मक विचार करणारे, आपल्यावर विश्वास नं टाकणारे, आपल्याला प्रोत्साहित नं करणारे लोक कटाक्षाने टाळायला हवेत. अर्थात, याचा अर्थ आपल्या आजूबाजूला होयबा वा खुशमस्करे लोक गोळा करायचे – असा नव्हे. आपल्या चुका दाखवणारे, प्रसंगी हक्काने रागावणारे लोक जीवनात असल्याशिवाय आपल्यात सुधारणा होतच नाही. परंतु आपल्या क्षमतेवर विश्वास नसणारे, स्वतःच्या जीवनात देखील फारसे सकारात्मक नसणारे लोक टाळावेत.
मोठी ध्येयं असणाऱ्या, आत्मविश्वासू लोकांच्या संगतीत आपण राहिलो तर आपणही तसे होतो. आपली ऊर्जा वाढते, सकारात्मक विचार वाढतात.
४) वाचन…
वाचाल तर वाचाल…हे मराठी लोकांमध्ये सर्वाधिक लिहिल्या-बोलल्या गेलेल्या वाक्यांपैकी एक. बालपणापासूनच वाचनाचं महत्व प्रत्येक मराठी माणसाला व्यवस्थित पटवलं गेलेलं आहे. परंतु तरीही किती प्रौढ नियमित वाचन करतात बरं?!
आपण सर्वांनी हे समजून घ्यायला हवं की प्रत्येक यशस्वी माणूस कोणत्या ना कोणत्या अडचणींमधून गेलेलाच आहे. प्रत्येकाने अपार कष्ट सोसुनच यश गाठलं आहे. आज अतिशय सुखी-समाधानी दिसत असलेला माणूस कधीना कधी वैचारिक गुंत्यात गुरफटलेलाच होता. तो – अपार दुःख, सततचं अपयश पासून – मानसिक शांतता, दणदणीत यश – असा प्रवास समजून घेण्यासाठी, त्यातून आपल्याला योग्य ते धडे मिळवण्यासाठी पुस्तकांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय आपण ज्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्यातील बारकावे, एक्स्पर्टीज मिळवण्यासाठी पुस्तकं हाताशी असण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणूनच पुस्तकांमधून मिळालेली उत्तरं – मनातील, डोक्यातील विचारांचा गुंता सोडवण्यात मदत करतात.
या आणि अश्याच छोट्या मोठ्या सवयींच्या मदतीने सुखी समाधानी आयुष्य उभारता येतं. परंतु ते करण्यासाठी दीर्घ प्रयत्नांची गरज असते. “सेवाह” तर्फे विविध प्रोग्रॅम्स, कार्यशाळा याच प्रयत्नांना हातभार लावण्याच्या, दिशा देण्याच्या हेतूने चालवले जातात. सेवाहच्या चेअरपर्सन सौ अश्विनी धुपे स्वतः एक शिस्तबद्ध आणि अतिशय परिणामकारक शैली जगत आहेत. त्याच्याकडून धडे शिकून हजारो लोकांनी आपल्या जीवनाला आकार दिला आहे, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवून भविष्य घडवलं आहे!
Ashwini Dhuppe
Business couch
9372364699
