फक्त वस्तुच नव्हे; नातेही जोडतो!

फक्त वस्तुच नव्हे; नातेही जोडतो..!

प्रसिध्द अॅडव्हर्टायझिंग तज्ज्ञ लिओ बर्नेट असे म्हणतात की, “मार्केटमध्ये स्थान मिळविण्याआधी मनामध्ये स्थान मिळ्यावं लागतं. मार्केटचा हिस्सा बनण्याआधी ग्राहकांच्या मनाचा हिस्सा बनावं लागतं.” हे सांगण्याचं कारण असं. की, नगरच्या आयएमएस-सीडीआर कॉलेजने आयोजित केलेल्या ‘अॅड-मॅड शो’ मध्ये नुकताच जाण्याचा योग आला. अहमदनगर जिल्ह्यातील विविध गांव-शहरांतून, अनेक कॉलेजेसमधून खूप विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. वेगवेगळे ग्रुप्स् तयार करण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे प्रॉडक्ट विषय म्हणून दिले होते आणि साधारणपणे २-३ मिनिटांमध्ये ती अॅड सादर करायची होती. कुणाला लॅपटॉप, कुणाला मोबाईल फोन, कुणाला हेलमेट तर कुमाला शूज असे विषय निळाले होते, प्रत्येक ग्रुप उत्तमप्रकारे अॅड सादर करण्याचा प्रयत्न करत होता एका ग्रुपचा विषय होता ग्लू (सरस किंवा चिकटण्यासाठी वापरले जाणारे प्रॉडक्ट), त्यांनी तयार केलेली अॅड माझ्या विशेष लक्षात राहिली. अॅड सादर केल्यानंतर परिक्षक म्हणून मी प्रश्न विचारला, की तुमच्या प्रॉडक्टमध्ये आणि फेविकॉलमध्ये काय फरक आहे? तुमच्या प्रॉडक्टचा यूएसपी (युनिक सेलिंग पॉईंट) काय आहे? तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. त्या ग्रुपमधला विद्यार्थी म्हणाला, “सर, फेविकॉल फक्त वस्तुंना जोडतो, मात्र आमचा प्रॉडक्ट नात्यांनाही जोडतो.” त्याच्या या उत्तराने माझ्यासह सर्वच प्रभावित झाले आजोबांची तुटलेली खुर्ची जोडून त्या प्रॉडक्टने नात्यांनाही घट्ट जोडले अशी काही ती जाहिरातीची थीम होती. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच, की जाहिरात तयार करण्यासाठी कल्पकता, स्पार्क आणि ‘मॅडनेस’ खूप आवश्यक असतो. (मॅडनेस म्हणजे धांगडधिंगा किवा विचित्रपणा नाही. इथे चाकोरीबाहेरचा विचार असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे.) अशाप्रकारचा ‘अॅड-मॅड शो’ आयोजित करून विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला एक व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल आयएमएस-सीडीआर कॉलेजला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजकाल आपण पाहतो, की करियरसाठी विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्चर इ. अशा अनेक क्षेत्रांची निवड करतात. पण जाहिरात क्षेत्राकडे करियर म्हणून पाहण्याची मानसिकता थोडी कमीच पाहायला मिळते. खरं तर, जाहिरात हे खूप क्रिएटिव्ह आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे. जिथं सतत नाविन्य हवं असतं. भन्नाट कल्पना हव्या असतात. अशा कल्पना असणाऱ्याऱ्यांना या क्षेत्रामध्ये आर्ट डायरेक्टर, व्हिज्युलायझर, कॉपीरायटर्स, डिझाईनर्स अशा खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. मोठमोठ्या कंपन्या आपल्या अॅडव्हर्टायझिंगसाठी व बॅण्ड बिल्डींगसाठी अशा कल्पक आणि ‘हट के’ विचार करणाऱ्यांची सतत मदत घेत असतात. जाहिरातीच्या कल्पनेला भावनेची जोड असली की विक्री देखील नक्कीच वाढते. म्हणून बाजारपेठेत स्थान मिळविण्यासाठी ग्राहकांच्या मनात स्थान मिळविणे अत्यंत महत्वाचे असते. ‘केवळ वस्तूंनाच नव्हे तर नात्यांनाही जोडतो’ ही टॅगलाईन खूप काही सांगून जाते.

    लिओ बर्नेट
 (लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत. व प्रसिध्द अॅडव्हर्टायझिंग तज्ज्ञ)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!