१२. Patience : संयम
उतावळा मनुष्य मोठा नेता होऊच शकत नाही. आणि संयमी माणूस यशस्वी नेता झाल्याशिवाय राहत नाही. थेट खासदारकीचा अर्ज भरुन पंचायत कशाला करुन घेता पायरी पायरीने आपली ताकद आजमावत संयम ठेवत एक दिवस मुख्यमंत्री व्हा ना. मिशी फुटायच्या वेळी मिशी पिरगळण्याच्या भाषा करु नका. अगोदर तेवढी ताकद कमवूया योग्य संधीची वाट पाहूया. आणी संधी आली की सुवर्ण संधीत परीवर्तन करुया. आता जेवण शिजेपर्यंत दम काढला थंड होईपर्यंत थांबा नाहीतर तोंड भाजेल. बळेविण शक्ती बोलू नये !
महाराज खानाचा समाचार घेण्यासाठी प्रतापगडावर तळ ठोकून होते. इकडे राजगडावर सईबाईचे निधन झाले तरी महाराजांनी संयम सोडून खाली उतरले का ? आणि महाराज गड उतरले असते तर एवढा मोठा प्रताप घडला असता का? म्हणून संयमाच्या किल्ल्यातून कारण कोणतेही असो खाली उतरु नका. तरच यशाचे किल्ले प्राप्त होतील. महाराज निमंत्रीत पाहुणे म्हणून आग्र्याला गेले आणि औरंगजेबाने विश्वासघात करुन महाराजांना कैद केले. आता अचानक उद्भवलेल्या या संकटात महाराजांनी संयम राखला. चांगला चार महीने आणि एक दिवस बादशहाच्या हातावर तुरी देऊन महाराज राजगडावर पोहोचले. अशा जीवघेण्या कैदेत आपल्यासारख्या माणसांनी एकतर शरणागती पत्करली असती किंवा आत्महत्या केली असती. परंतु महाराजांनी संयम राखून स्वराज्य राखलं. आपणही असंच संयम राखून आपलं राज्य
आपली जागा टिकवली पाहीजे, लक्षात ठेवा संयमाच्या झाडाला कायम यशाचीच फळे लागतात. लोक आपल्याला अगदी साध्या शब्दात हेच सांगतात सबुरी का फल मिठा होता है। ही सबुरी म्हणजेच संयम, ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे यम फिरकत नाही आणि जो संयम सोडतो तो त्याच क्षणी यमाच्या म्हणजे पराभवाच्या हाती लागतो.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
