ज्याला ग्राहक समजला, त्याला बिझनेस समजला..

ज्याला ग्राहक समजला, त्याला बिझनेस समजला..

प्रसिध्द उद्योजक, ‘डेल’ कंपनीचे चेअरमन, मायकल डेल म्हणतात की, “तुमच्या विकासाच्या वाटचालीत ग्राहकांना लवकरच सहभागी करून टाका. लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मौल्यवान, सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याचं म्हणणं लवकर ऐका आणि नीट कान देऊन ऐका”, यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल की, व्यवसाय उद्योगात ग्राहक समजणे किती महत्वाचे आहे. लहान मुलांशी बोलताना आपणही बोबडे बोलतो. याचा अर्थ असा काय होतो? त्यांच्याशी त्यांच्यासारखंच म्हणजे त्यांच्या जागी जाऊन समजून घेणं महत्वाचं असतं. ग्राहकांना समजून घेण्याची कला ज्याला जमली त्याला बिझनेस करणं आणि बॅण्ड घडवणं अवघड नाही.. समजा ग्राहक ग्रामीण भागामध्ये आहे आणि आपण त्याच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधत आहोत तर त्याला आपल्याला काय म्हणायचे आहे हे समजेल का? नाही ना? यासाठी ग्राहकाचा कल, त्यांची अपेक्षा आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन सहज सोप्या स्थानिक भाषेमध्ये संवाद साधला तर आपण ग्राहकांशी लवकर कनेक्ट होतो. तिथे आपलेपणा वाटतो. रात्रीच्या वेळी टीव्हीवर अॅड सुरू आहे आणि त्यातला माणूस म्हणतोय की, “आजही खरिदिए आपका मनपसंद साबून!” मला सांगा आहे का शक्य हे? कोणतं दुकान उघडं असेल? किती असंबधित आहे हे, मला यातून एवढंच सांगायचं आहे की, ग्राहकांची मानसिकता ओळखणे खुप जरूरी आहे. जसे पेशंटचं नक्की काय दुखतंय हे समजल्याशिवाय डॉक्टर औषध देत नाहीत, अगदी तसंच आहे. हे… मॅकडोनाल्डचे मालक रे क्राक म्हणतात, “तुम्ही जर फक्त पैशांसाठी झटत असाल तर ते कधी कमवू शकणार नाही. पण तुमचं तुमच्या कामावर प्रेम असेल तर व ग्राहकांना अग्रक्रम दिलात तर यश तुमचंच आहे.” तुम्ही जर यशस्वी बॅण्ड चा आभ्यास केलात तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल की, ग्राहकांना हवं ते, हवं तेवढं आणि हवं तिथं देणारी माणसं ‘ब्रॅण्ड’ निर्माण करण्यात यशस्वी होतात… आज मार्केटमध्ये आपला बॅण्ड फायदेशीरपणे विकून, कमी किंमतीत खूप जास्त विक्री करणारी ‘मारूती सुझुकी’ आहे आणि आपला ब्रँड प्रतिष्ठित करून जास्त किंमत ठेवून कमी विक्री करणारी ‘मर्सिडिज’ देखील आहे. आपला दृष्टीकोन नाविन्यपूर्ण असणे महत्वाचे असते. त्यावर तुमची ‘ब्रँड’ इमेज अवलंबून असते. आपला ग्राहक आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपल्या फिचर्स बद्दल भडाभडा सांगत बसण्याआधी ग्राहकांची ‘ऐकून’ घेण्याची सवय आपण आपल्याला लावली पाहिजे. आपल्या उत्पादनांसाठी ग्राहक शोधण्यापेक्षा आपल्या ग्राहकांसाठी उत्पादन शोधा, तयार करा, पूर्तता करा. आपलं वेगळं स्थान निर्माण होईल. यशाचं नवं शिखर गाठणं शक्य होईल. स्वप्नात पाहिलेलं प्रत्यक्षात येईल. आणि हो.. या सगळ्याचं श्रेय ग्राहकांनाच जाईल..!

मायकल डेल

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत. व डेल’ कंपनीचे चेअरमन)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!