आयडीया जगावर राज्य करते…

आयडीया जगावर राज्य करते…

एखादा मुलगा १९ वर्षाच्या छोट्याशा वयात काय करू शकतो? उत्तर आहे – ‘खूप काही!’. आणि हे सिध्द करून दाखवलंय फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग यानं. छोट्याशा वयात एक ‘आयडीया’ पेरली आणि तिचा आज एक विशालकाय वटवृक्ष झालाय, जो आपल्यासमोर आहे. आज सर्वात तरूण मिलेनियर म्हणून मार्क झुकेरबर्ग जगप्रसिध्द आहे. त्याचं म्हणणं खूप प्रेरणादायी आहे. मिशन शिवाय कुठलाच बिझनेस होवू शकत नाही. मार्क म्हणतो की, “फेसबुकचं ध्येय आहे की जगातल्या करोडो अरबो लोकांना जोडायचं आहे. त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मला त्यांना मदत करायची आहे. हे काम खूपच सुखद आणि अद्भुत आहे आणि हे करत असल्याचा मला गर्व आहे.” आपल्या उद्योग-व्यवसायाचं मिशन काय आहे? काहीन् काही असेलच नां. आणि जर नसेल तर ते ठरवा. मनावर कोरा. त्या दिशेने वाटचाल करा. आपला बॅण्ड निर्माण करण्यासाठी ही महत्वाची पायरी आहे. फेसबुकची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतल्या छोट्याशा कोपऱ्यातून झाली. आणि आज जगातला एकही कोपरा नाही की जिथे फेसबूक पोहोचले नाही. ही आहे आयडीयाची ताकद. आयडीयावरचा विश्वास विश्व उभं करू शकतो. महाकाय विराट अशा वडाच्या झाडांचं बीजदेखील मोहरीच्या दाण्याइतकं असतं. त्यामुळे कुठलीही कल्पना – ‘आयडीया’ लहान आहे असं न म्हणता त्यातून काय काय होवू शकतं, याचा सकारात्मक विचार नक्की करायला हवा. मार्क झुकेरबर्ग म्हणतो की, पैशांसाठी सेवा देवू नका तर लोकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी पैसे मिळवा. जगातल्या मोठ-मोठ्या कंपन्यांनी आपलं व्हिजन आणि आपलं मिशन यासाठी काम केलं आहे आणि करतआहेत. आश्चर्य वाटेल, जेव्हा आपण मोठं ध्येय ठरवून काम सुरु करतो नां, तेव्हा जगही आपल्याला साथ देतं. जसं मी मार्ग सांगितलं, की लोकच तुम्हाला बॅण्ड बनवतात. अगदी तसंच, काय करायचंय आणि का करायचंय? या प्रश्नांची उत्तरं मिळाली की व्यवसायाचा खरा प्रवास सुरु होतो. कोका-कोलाचं मिशन आहे की, आम्हाला जगाला रिफ्रेश करायचंय. आशेचे आणि आनंदाचे क्षण द्यायचेत. किती सखोल आहे ना हे. का नाही जग प्रेरित होणार अशा मिशनने, आयबीएम कंपनीचं मिशन आहे की, आम्ही प्रत्येक क्लाएंटच्या यशासाठी समर्पित आहोत. प्रत्येक नात्यांची विश्वासाने आणि व्यक्तिगत जबाबदारीघेतो. फेसबुकचं मिशन आहे की, आम्हाला लोकांना शेअर करण्याची, व्यक्त होण्याची पॉवर द्यायची आहे. आणि जगाला अधिकाधिक खुलं करायचं आहे. लोकांना जोडायचं आहे. आपणही ठरवायला हवं की, आपल्याला नक्की कुठं जायचंय, काय करायचंय. अर्थात खूप व्यावसायिकांनी हे ठरवलेलं देखील असेल. पण सांगायचं तात्पर्य इतकंच की, आयडीया किंवा कल्पना ही एक जबरदस्त गोष्ट आहे. तिची ताकद ओळखा. तिच्यावर विचार करा. अंमलात आणा आणि झोकून द्या ती पूर्ण करण्यासाठी. जग आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तयार आहे. फक्त आपणच पाऊलं उचलण्याची गरज आहे. कल्पनेला प्रतिभेनं साकारल्यानंतरच ब्रँड ची ‘प्रतिमा’ निर्माण होते. आयडीया जगावर राज्य करते.

 

लेखक- अज्ञात

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!