इंडस्ट्रीएल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज
त्या काळात अग्निशमन दल आणि आग विझवण्याचे प्रगत तंत्रज्ञान नव्हते म्हणून महाराज यावर रामबाण उपाय सुचवतात आणि तो म्हणजे आग लागण्यास कारणीभूत होतील अशा गोष्टी टाळणे. यात महाराज अगदी बारकाईने उल्लेख करतात. शेकोटी, चुल, चिलीम (सिगरेट) या सर्वाचा विचार करुन लिहितात. निष्काळजीपणाला जागा नको याची ती दक्षता होय. आणि माणसाशिवाय रात्रीच्या अंधारात पोटासाठी जर एखादा उंदीर दिव्यातील वात पळवण्याचा प्रयत्न करील तर त्यातूनही आग लागू शकते म्हणून झोपण्यापूर्वी दिवे विझवा असे महाराज सांगतात. आग तर एखाद्या वेळीच लागू शकते. परंतु महाराजांचा यातील दूरगामी उद्देश म्हणजे त्या काळी तेल ही दुर्मिळ वस्तू होती तिचा दुरुपयोगही टाळला गेला पाहिजे ही महाराजांची दक्षता लक्षात घेण्यासारखी आहे. दिवा ही त्या वेळी जीवनाश्यक वस्तू होती हे लक्षात घेऊन जेवणासाठी, थंडीत ऊर्जा मिळवण्यासाठी त्यावेळी आग हिच एकमेव साधन होते. त्यामुळे ती आग ज्यापासून उपलब्ध होणार ते तेल गवत, लाकूडफाटा सरपण याची अजिबात नासाडी होता कामा नये. म्हणून महाराजांनी कडक शब्दात लिहिले आहे.
आणि हा एवढा मोठा गंभीर विषय फक्त किल्लेदार किंवा हवालदार अशा केवळ निवडक मुख्य लोकांना माहित असणे पर्याप्त नाही हे लक्षात घेऊन महाराज है पत्र सर्व सैनिकांना वाचून दाखविण्यास अधिकाऱ्यांना फर्मावतात. कारण औद्योगिक सुरक्षितता ही सर्वाचीच जबाबदारी आहे. एकाचा निष्काळजीपणा देखील तेवढाच नुकसानीला कारणीभूत ठरु शकतो म्हणून ही तजवीज. छावणीत जितके म्हणून खास खास जुमलेदार, हवालदार, कारकून हजर असतील त्या सर्वांनी हा आदेश काळजीपूर्वक ऐकणे आणि सर्वांनी हुशार म्हणजे सावध, दक्ष राहणे असे लिहिणे म्हणजे एक दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण शिबीरच म्हणावे असे आहे आणि याची उजळणी रोजच्या रोज घेतली जावी असेही महाराज बजावतात. ही ताकीद केल्यावर जर कोणी यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा दाखविल नुकसानीस कारणीभूत होईल त्याला रोजगार कुठून मिळेल असे सांगतात. आपणासह इतरांना बेरोजगार करणारांना दुर्जन समजले जाईल असं म्हणतात आणि त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही ही दंडाची तरतूद करतात. भविष्यातील धोका आणि अगदी बारीक बारीक तपशिलात जाऊन सांगणारे हे दूरदर्शी महाराज आम्ही कळून घेतले पाहिजेत. आणि ते ठिक जाणून सर्वांनी तशी वर्तणुक केली पाहिजे. एवढीच रास्त अपेक्षा महाराज या पत्रातून आपल्याकडून करतात. आपली कंपनी, माणसं, वस्तु जनावरं, निसर्ग राष्ट्रसंपत्तीचं रक्षण करण्याचा बोध घेऊन आपण तसा दृढसंकल्प करावा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
