महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती
शेकडो मैलांचे असणारे अंतर महाराजांची संपर्क यंत्रणा काही मिनिटात पार करून योग्य तो संदेश योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवित होती, जर इशारा धोक्याचा असेल गनिमाचे भयंकर आक्रमण असेल शत्रु ज्या रोखाने येत असेल तसा इशारा देणारा काळा घुर केला जाई. त्याप्रमाणे आजुबाजुचे किल्लेदार सावध होत असत व तेही आपल्या किल्यावर तसाच काळया धुराचा लोट तयार करुन आजुबाजुच्या किल्ल्यांना इशारा देत शत्रुच्या आक्रमणाबाबत खबर बात देत असत. महाराष्ट्रात असणाऱ्या ३६० किल्ल्यावर अवघ्या काही तासात अशा प्रकारे सुचना मिळत होत्या आणि पुढील कार्रवाई केली जात होती. याचाच परिणाम म्हणुन की काय मोगलांना महाराजांचा कोणताही किल्ला गाफील ठेवुन घेण्यात कधीच यश मिळाले नाही.
उलट महाराज जेंव्हा एखाद्या ठिकाणी आक्रमण करायचे त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत क्षत्रुला त्याची खबर लागुन देत नव्हते तर शत्रुने एकमेकाला इशारत करण्याची गोष्टच खुप लांब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी पांढरा घुर आणि तोफांची आतिशबाजी या दोहींचा एकत्र वापर केला असणार. अर्थात प्रसंगच तेवढा आनंद द्विगुणीत करणारा आणि सर्वांच्या सुखा समाधानाचा होता. शिवाय प्रत्येक किल्ल्यावर तशी आगाऊ सुचनाही होती. ही संदेश वहन यंत्रणा खुप चांगल्या रितीने राबविण्यासाठी महाराजांनी निवडलेले राजधानीचे ठिकाण रायगड हे काही उगाच निवडले नव्हते. तर लष्करी दृष्ट्या रायगड अजिंक्य, बेलाग आणि शत्रुला पायथ्यापर्यंत पोहोचण्यास दुरापस्त होता. असे असले तरी रायगडाला जवळपास ६५ किल्याचे संरक्षण आहे. व ६५ किल्ल्यांच्या मध्यभागी रायगड वसलेला आहे हे दुसरे कारण. काही किल्ले तर रायगडापासुन हाकेच्या अंतरावर तर काही उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतील
एवढ्या अंतरावर. परंतु त्याच वेळी रायगडाची उंची हा एक भाग महाराजांनी अगदी आवर्जून लक्षात घेतलेला. आजुबाजुच्या इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा रायगडाचा बालेकिल्ला जवळपास ४०० फुटांनी ऊंच आहे. म्हणजे आजुबाजुचा एखादा किल्ला शत्रुच्या ताब्यात जाऊन त्याने तेथुन तोफा चालविल्या तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत येवु शकत नव्हत्या ही एक गोष्ट तर प्रचंड उंची असल्यामुळे संदेश वहन करण्यासाठी राजधानी म्हणुन रायगडाचा चांगलाच उपयोग होत होता. मग ते संदेश वहन प्रकाशाच्या माध्यमातुन असो किंवा ध्वनीच्या माध्यमातुन असो.
जगाच्या पाठीवर ज्याला व्यवस्थापन क्षेत्रात नाव कमवायचे असेल त्याने महाराजांच्या या संदेशवहनाच्या क्रांतीतून एकच बोध घ्यावा आणि तो म्हणजे जेवढा संदेशवहनाचा वेग जास्त तेवढा विकासाचा वेग यशाचा पल्ला जास्त.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
