२. लोकांना सन्मानाची वागणूक द्या
राजे तुम्हाला सामान्य लोकांकडून असामान्य कामगिरी करून घ्यायची असेल तर त्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि असामान्य माणसाकडून सामान्य कामगिरी करून घ्यायची असेल तर त्याला सन्मान देऊ नका. मोगल आदिलशाही, निजामशाही यांनी असामान्य शौर्य रक्तात असणाऱ्या पराक्रमी मराठ्यांना क्वचितच कधी सन्मानानं वागवलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की याच मराठ्यांना आपण सन्मानानं वागवलं तर ते असामान्य असा पराक्रम, अतुलनीय असे धाडस आणि कल्पनेपलीकडील शौर्य गाजवतील.
तेव्हा तुमच्या सोबत काम करणारे तुमच्या हाताखाली काम करणारे अष्टप्रधान मंडळ सेनापती, सैनिक ते रयत या सर्वांना तुम्ही सन्मानाची वागणूक देत राहिले पाहिजे. यासाठी आपण सर्वांना ‘जी’ हा आदरार्थी प्रत्यय लावूनच बोलावले पाहिजे, हाक मारली पाहिजे आणि फर्माने, आदेश देखील काढले पाहिजेत.
या शिकवणूकीची अंमलबजावणी करत असताना शिवाजी महाराजांनी लोकांना ज्या ज्या नावाने संबोधले त्या त्या प्रत्येक नावाच्या पाठी ‘जी’ हा शब्द लावला आहे आणि महाराजांनी नेहमी आपण तुम्ही अशाच संबोधनाचा वापर केला आहे. ‘तु’ हा एकेरी शब्द सदैव टाळला आहे. तेव्हा आपणही आपल्या आयुष्यात आजपासून आपण तुम्ही जी अशा शब्दांचा जास्तीत जास्त वापर करा आणि स्वतःची होणारी प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी पहा.
माणसं हाताळण्याचं हे कौशल्य जिजाऊंनी शिवबांना शिकवत त्यातून अनेक लोकं जोडली गेली. जोडलेली माणसं मरेपर्यंत सोबत राहिली. सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांना सन्मानाची वागणूक दिल्याने त्यांच्या हातून असामान्य कामे करून घेता आली. माणसांना सन्मानाची वागणूक दिली तर
ते प्रतिकूल परिस्थितीत अवघड प्रसंगात आणि बिकट ठिकाणी देखील पराक्रम गाजवू शकतात हे महाराजांनी करून दाखवलं. परंतु युरोपातील लोकांना जिजाऊंनी महाराजांना जे तत्त्वज्ञान शिकविलं त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांनी १९२८ मध्ये काही तज्ञांनी एकत्र येऊन माणसांना सन्मानाने वागविण्याचा काय परिणाम होतो, प्रगती होते, यावर हाँथ्रोन इलेक्ट्रीक प्लॅन्ट नावाच्या कंपनीमध्ये यावर प्रयोग करून पाहिला. तो प्रयोग त्यांनी महिलांवर केला. कारण हे तत्त्वज्ञान एका महिलेने जिजाऊंनी सांगितलेले असल्यामुळे ते महिलांवरच प्रयोग करण्यासाठी उत्सुक होते.
त्यांनी प्रयोगासाठी मोटर असेंब्ली करणाऱ्या महिला कामगारांची निवड केली. त्यांनी महिलांना सांगितलं की तुम्ही ‘खास महिला’ म्हणून तुमची या प्रयोगासाठी निवड करण्यात आलेली आहे. तुमच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि कामातील चुका कमी व्हाव्यात यासाठी कामाचे वातावरण कसं असायला हवं यावर आम्ही प्रयोग करणार आहोत आणि तज्ञांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी कामाच्या ठिकाणी लाईट म्हणजे उजेड वाढवला. परिणामी उत्पादकता वाढली आणि चुका देखील कमी झाल्यानंतर त्यांनी हळूहळू उजेड कमी करत गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरीही उत्पादन वाढतच गेले. मग तज्ञांनी कामाच्या ठिकाणी गोगांट वाढवून पाहिला, कमी करून पाहिला, तापमान वाढवून पाहिले, कमी करून पाहिले, कामाच्या जागा बदलून पाहिल्या, वेळा बदलून पाहिल्या पण प्रत्येकवेळी उत्पादन पातळी वाढतच गेली.
आता मात्र तज्ञ गोंधळात पडले आणि आश्चर्य करू लागले की हे कसे होत आहे. तेव्हा सर्व शक्यता तपासून संपल्यावर त्यांनी त्या महिलांनाच यामागचे खरे कारण काय असे विचारले तेव्हा त्या महिलांनी प्रामाणिकपणे निरागसपणे दिलेले उत्तर आहे. “आजपर्यंत आम्हाला सन्मानाची कधीच वागणूक दिली गेली नव्हती. प्रथमच आम्हाला कोणीतरी खास म्हटले आणि आमची प्रयोगासाठी निवड केली. त्यामुळे आम्हाला स्वतःचा अभिमान वाटला, स्वतःची प्रतिमा उंचावली आणि मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला की
आपणही कोणीतरी आहोत आणि आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधीही केलं नव्हतं एवढं उत्साहाने आणि आनंदाने आत्मविश्वासाने काम केलं. त्यामुळे साहजिकच आमची उत्पादकता वाढत गेली. आम्ही जास्तीत जास्त चांगले काम करू शकतो.”
या प्रयोगामुळे जिजाऊंच्या शिकवणीवर शिक्कामोर्तब तर झालेच परंतु व्यवस्थापन तज्ञही कामाला लागले. त्यांना हे लक्षात आले की जगात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रेरणादायी गोष्ट एकच असू शकते आणि ती म्हणजे आत्मसन्मान.
जेव्हा तुम्हाला जर असामान्य कामगिरी करून हवी असेल तर सामान्य समजल्या जाणाऱ्या लोकांना देखील सन्मानाची वागणूक देत चला. याचा आणखी एक फायदा हा आहे की तुम्ही लोकांचा नेहमी सन्मान करत गेला म्हणजे तुमचा कधीही अपमान होणार नाही. अवमान होण्याची शक्यताच निर्माण होत नाही.
तेव्हा वागा सन्मानान ! जगा सन्मानानं !! आणि लोकांनाही वागवा सन्मानानं !!!
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
