७४.संपत्ती आणि नक्की संपती : Wealth & Net worth

७४.संपत्ती आणि नक्की संपती : Wealth & Net worth

लक्ष्मी माता ही नेहमी उभी असते, म्हणूनच ती केव्हाही जाऊ शकते. ललक्ष्मी मातेला अत्यंत हुशारीने सांभाळले तरच ती आपल्या सोबत कायमस्वरूपी राहू शकते. आणि माता सरस्वती ही नेहमी बसलेली असते. याचा अर्थ सरस्वती मातेला एकदा प्रसन्न केले की ती कायम आपल्या सोबत राहते. तिची चोरी होऊ शकत नाही. म्हणून अगोदर सरस्वतीला प्रसन्न करा. म्हणजेच ज्ञान मिळवा. सरस्वती सोबत लक्ष्मी येते हा माझा स्व अनुभव आहे.

संपत्तीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. काहींच्या मते आईवडील आणि कुटुंब ही संपत्ती असते, काहींच्या मते निरोगी शरीर, काहींच्या मते नेटवर्क म्हणजे आपले सहकारी, आपला समाज तर काहींच्या मते आर्थिक संपत्ती. खरंतर आपल्याकडे आर्थिक संपत्ती असेल तर इतर संपत्ती आपण चांगली मिळवू शकतो.

प्रत्येक व्यक्ती ही श्रीमंत घरात जन्म घेऊ शकत नाही. हे जरी खरे असले तरी दृढनिश्चय केला तर प्रत्येक व्यक्ती श्रीमंत बनू शकते. तुम्ही श्रीमंत होणार का नाही? हे तुम्ही किती कमवता त्यापेक्षा कमवलेले पैसे कसे खर्च करतात, कसे बचत आणि गुंतवणूक करता यावर ते अवलंबून असते. खर्चाबद्दल एकच उदाहरण सांगतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामचा मालक कोण आहे? माहीत आहे का तुम्हाला? त्याचं नाव मार्क झुकेरबर्ग. त्याने वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि २२ व्या वर्षी जगातल्या पहिल्या ५ श्रीमंत लोकात तो आला. मार्क झुकेरबर्ग इतका श्रीमंत असनाही तो फक्त ७ टी-शर्ट आणि ७ पॅण्ट वापरतो. दुसरा जोड विकत घेण्याअगोदर
एक जोड दान करतो. त्यानंतरच तो नवीन विकत घेतो. यावरून आजच्या तरुणांनी काय बोध घ्यायचा तो घ्या. पण वायफळ खर्च करू नका. श्रीमंत व्हायचंय तर इझी मनी म्हणजे मोबाईल वरील गेम, ड्रीम इलेव्हन, जंगली रमी अशा जुगाराच्या नादी लागू नका.

आता नेट वर्थ बद्दल… नेट म्हणजे नक्की आणि वर्थ म्हणजे संपती. नेटवर्थ म्हणजे तुमची नक्की संपती किती आहे? यामध्ये सर्वसाधारण लोकांची फसगत होऊ शकते. ती अशी. एखाद्या व्यक्तीकडे ५ करोडचे घर, १ करोडची कार आणि १० कोटीची कंपनी असेल तर त्याची संपती १६ करोड आहे असे आपल्याला वाटते. हे खरे नसून त्याला देणे किती आहे? कर्ज किती आहे ? हे वजा करून आलेली संपत्ती म्हणजेच नेटवर्थ होय. समजा त्या व्यक्तीकडे १६ करोडची संपत्ती आहे आणि १४ करोड देणे असेल तर त्याची नेटवर्थ २ करोडच आहे असे आपल्याला वाटते. खरी गंमत पुढे आहे. काही कारणाने ही संपत्ती विकायला गेलात तर, १६ कोटींचे त्याचे १०/१२ कोटीच मिळणार. कारण घर, कार आणि कंपनीचे डीप्रीशियेशन म्हणजे घसारा असतो. अशा परिस्थितीत १४ करोड देणे आणि १२ करोड ही त्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच विक्री किंमत असल्याने त्याची नेट वर्थ मायनस २ करोड आहे. म्हणजे तो दोन करोड रुपयांनी तोट्यात आहे. म्हणूनच एखाद्याचा टर्नओव्हर किती ? हे महत्त्वाचे नसून त्याचा नफा, त्याची नेट वर्थ किती? हे महत्त्वाचे असते. खरा बिझनेस मॅन तोच असतो ज्याची नेट वर्थ तो दरवर्षी वाढवित असतो.

एखाद्याचे नेटवर्थ पहायचे असेल तर त्याची मागील तीन वर्षाचे बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पहा. फक्त बंगला, गाडी पाहून त्याच्या संपत्तीचा, त्याच्या श्रीमंतीचा अंदाज लावू नका. यापुढे संपत्तीपेक्षा नक्की संपत्ती म्हणजेच नेटवर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे कार्य करून श्रीमंत व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!