८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.
५. सगळी जबाबदारी स्वतःवर घ्या.
शिवाजी राजे ध्येयाच्या प्राप्तीकडे नेणारे हे पाचवे सूत्र मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा आपण ध्येयाकडे जाण्यासाठी काही उपक्रम राबवतो तेव्हा ■त्यातील एखादा उपक्रम किंवा एखादी गोष्ट अपयशी होऊ शकते. जर असे काही झाले तर त्या पराभवाची त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्या. स्वतःवर जबाबदारी घेण्याची कधीही टाळाटाळ करू नका, यशाला अनेक मानकरी असतात पण अपयश हे मात्र पोरकं असतं त्याला कोणीच वाली नसतो. Success has many father but the failure is orphan.
तेव्हा यश मिळाले की ते माझ्यामुळे ही झाली सामान्य माणसांची सामान्य प्रवृत्ती. तुम्ही असामान्य व्यक्ती आहात म्हणूनच तुम्ही ही असमान्य प्रवृती जपली पाहिजे. आणि ती म्हणजे यश मिळाले की सांगायचे ते सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्याचे सर्व श्रेय माझ्या माणसांना जाते आणि जर कधी अपयश आल पराभव झाला तर त्याचे खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडायचे टाळायचे आणि ती संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्यायची. अपयशाचे बील स्वतःवर कोणी घेत नसतो. आपण मात्र खूप मोठ्या मनाने तो पराभव आपणामुळे झाला अशी भूमिका घेत इतरांना आधार द्यायचा आणि पुढील यशासाठी त्यांना प्रेरणा द्यायची त्यांनी आणखी अचूकतेने आणि प्रभावीपणे काम करावे अशी प्रोत्साहने त्यांना द्यायची.
पराभवासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरताना आपलीच चिडचिड जास्त होणार. आपण कधी कधी आपली जीभ सैल सोडणार आणि त्यातून आपणच आपली कर्तबगार माणसं गमावणार हे अजिबात होऊ द्यायचे नाही. उलट सगळी जबाबदारी स्वतःवर घ्यायची आणि आपणच आपले आत्मपरिक्षण करून आवश्यक त्या सर्व दुरूस्ती करून घ्यायच्या. जेणेकरून परत त्या पराभवाची पुनरावृत्ती टळेल. एका पराभवातून बरेचकाही शिकायला मिळते ते आपण शिकून घ्यायचे आणि पुढील यशासाठी त्याचा उपयोग करायचा. आता मात्र पुढील यशाची सर्व सूत्रे देखील आपल्या हाती घ्यायची. साधा नियम जबाबदारीतून पळ काढायचा नाही, प्रसंगातून बाहेर पडेपर्यंत कळ काढायची, यश मिळाले तर त्याचे श्रेय संघाला team work ला द्यायचे. आणि अपयश आले तर जबाबदारी मात्र स्वतःवर घ्यायची. हाच मनाचा मोठेपणा आणि समंजसपणा आपणाला पुढे नेतो.
सामान्यपणे पराभव झाला की लोक तुझ्यामुळे झालं असं म्हणतात. आपण मात्र यश मिळाले की तुमच्यामुळे मिळालं असं म्हणायचं. आणि यश मिळाले की माझ्यामुळे मिळालं असं सामान्य माणसं म्हणतात. तिथं आपण अपयश आलं की ते माझ्यामुळे असं उलट म्हणत सर्व जबाबदारी आपणावर घ्यायची, लक्षात ठेवा जो जबाबदारी घेतो तो जबाबदार नसेल पण तर तो जबाबदारी घेऊ लागला तर तो तेवढाच जबाबदार माणूस म्हणून घडत जातो. आणि यशस्वी होत जातो. जबाबदारी टाळणारा कायम पळ काढतो आणि मग तो यशस्वी कसा होईल. तेव्हा यशस्वी माणसं जबाबदारी घेतात टाळत नाहीत.
राजमाता जिजाऊ यांची ही शिकवण महाराजांनी प्रतापगडाच्या युद्धात बापरली. युद्धाची संपूर्ण सूत्रे आणि जबाबदारी स्वतःकडे घेतली. परंतु जेव्हा हे युद्ध जिंकले तेव्हा ते सर्व श्रेय त्यांनी आपल्या मावळ्यांना दिले. अफजलखान बधानंतर बाईच्या तळावर मिळालेले १० लाख रुपये महाराजांनी त्याच रात्री आपल्या सर्व सैनिकांना बक्षीस म्हणून वाटले. आपल्या सहकाऱ्यांना एवढं मोठं श्रेय तर दिलंच परंतु वरून मिळालेले सर्व पैसे बक्षीस म्हणून दिले. जखमी लोकांची विचारपूस करून औषधोपचार केला आणि मगच महाराज कोल्हापूरकडे निघाले.
तानाजी मालुसरेला तु सिंहगडाची मोहीम घेऊ नको ती आणखी कोणाला तरी जबाबदारी देतो असे म्हणत असताना तानाजीने जबाबदारी घेतली आणि धारातिर्थी पडले. अशा प्रसंगी महाराज असे म्हणाले नाहीत तो तर स्वतःच्या ईच्छेने गेला होता. महाराजांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली. रायबाचे लग्न लावले. सूर्याजीला कोंढाण्याची किल्लेदारी दिली आणि तानाजीच्या बलिदानाची जबाबदारी म्हणून मालुसरे घराण्याला बेळगाव सीमेवरील पारगड नावाचा किल्ला वंशपरंपरेने नावावर करून दिला. खरंतर महाराज कोणालाही वतन देत नव्हते. याबाबत त्यांनी एक अपवादात्मक परिस्थिती समजून असा निर्णय घेतला आणि यापुढे युद्धात आपला कोणीही माणूस ढाल तुटली म्हणून मरणार नाही याची काळजी घेतली. तानाजीची ढाल तुटल्यामुळे त्याला मरावं लागलं याची जबाबदारी महाराजांनी इतर कोणावर न ढकलता राजा म्हणून स्वतःवर घेतली आणि मालुसरे घराण्याला पिढ्यान्पिढ्या पुरेल अशी नुकसानभरपाई करून दिली.
****************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
