१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

३) देवाणघेवाणीचा वेग : Speed of transaction

शिवबाराजे तुमचे राज्य, तुमचा उद्योगधंदा हा किती वाढणार हे तेथे होणाऱ्या देवाणघेवाणीच्या वेगावर अवलंबून आहे. यालाच Speed of stransaction असे म्हणतात. वस्तू खरेदी करणे आणि ती विक्री करणं यात जेवढा कमीतकमी वेळ असेल तेवढा जास्तीत जास्त नफा हा त्या उद्योगाला मिळतो. त्यामुळे हा वेग कायम जास्त असावा म्हणून युद्ध नको, मोहीम नको. टाकायचा तो फक्त छापा. म्हणजे देवाणघेवाणीचा वेग हा प्रचंड असेल. छापा टाकणे हा Speed of transaction वाढविण्याचा देवाणघेवाण वाढविण्याचा एक मोठा राजमार्ग आहे. आपण शत्रूचा किल्ला किंवा बाजारपेठ ही नेहमी विजेच्या वेगाने जाऊन ताब्यात घेतली पाहिजे. छापा टाकायचा, बाजारपेठेवर तर पैसा गोळा करायला जेवढा वेळ लागेल तोच दोन-चार दिवसांचा असेल आणि शत्रूला याची माहिती मिळेपर्यंत तर तुम्ही परत स्वराज्यात दाखल झालेला असणार. आणि जर किल्लाच जिंकायचा असेल तर मग मात्र एक रात्रीचा वेळ पुरेसा आहे. रात्रीचेच जायचे. रात्रीचेच किल्ला चढायचे. छापा टाकायचा. किल्लेदारच ताब्यात घ्यायचा आणि किल्ला खाली करायला लावायचा.
छाप्यामध्ये देवाणघेवाणीसाठी लागणारा काळ हा चार दिवसांचा. परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न हे प्रचंड असणार आहे. या उलट किल्ला जिंकण्याचा वेळ असेल केवळ एका रात्रीचा पण तोच किल्ला आपणाकडून परत घ्यायचा तर शत्रूला किमान वर्ष तरी सहज लागेल ना ! देवाणघेवाणीचा वेग कायम वाढता असावा म्हणून मराठ्यांनी कधीही हत्ती आणि उंट वापरले नाहीत. तोफा वापरायचा तर संबंधच आला नाही. जायचे आणि थेट बाजारपेठ ताब्यात किंवा किल्ला हाती एवढंच हे समीकरण.

छापा टाकणे हा देवाणघेवाणीचा वेग वाढविण्याचा मोठा राजमार्ग असल्यामुळे महाराजांनी बहुतेक ठिकाणी छापेच टाकणे पसंत केले. सुरतेवरील छापा हा केवळ चार दिवसांचा होता आणि मिळालेले पैसे आणायला १८००० गोणी लागल्या. यात हिरे, माणिक, मोती आणि फक्त सोनं यांचा समावेश होता. अंदाजे १०० कोटी होन म्हणजे १०० कोटी २४०,००० हजार एवढी ही किंमत आहे. एक होन = २४०,००० या सोन्याच्या किंमतीप्रमाणे हा आकडा आहे. एवढी मोठी रक्कम चार दिवसांत मिळविणारे शिवाजी महाराज आणि ३० वर्षे नोकरी करून २४०,००० मोजणारी मराठी माणसं, किती अंतर आहे म्हणून जो कोणता धंदा कराल त्यात देवाणघेवाणीचा वेग हा जास्त ठेवा. सकाळी वस्तू घेतली, संध्याकाळी विका, यात जास्त नफा आहे. आता बनवा पुढच्या मिनिटाला विका आणखी नफा आहे. असं काम करणं म्हणजेच सुरतेवर छापा आहे. बारा रुपयांची वस्तू २० रुपयात विकेन भले २० वर्षे लागली तरी चालतील हा आडमुठेपणा सोडा. बारा रुपयांची वस्तू तेराला विका पण दिवसांत शंभर वेळा विका. बघा तुम्ही देवाणघेवाणीचा वेग हे सूत्र वापरून श्रीमंत होता की नाही. फेसबुक, व्हॉट्सअॅपवाले हेच तर गणित लावून श्रीमंत झाले ना ! फुकट दिल्या जाणाऱ्या वस्तूमुळे हे एवढे झाले कारण एकच Speed of transaction आता शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकण्यासाठी जो वेळ ठरविलेला असायचा तो एका रात्रीचा म्हणजे खूप झालं तर आठ तास. म्हणजे देवाणघेवाणीचा वेग ८ तासाला एक किल्ला याउलट मोगलांचा किल्ला जिंकण्याचा वेग हा किमान ६ महिने जास्तीत जास्त आठ वर्षे. जिथे महाराज एका रात्रीत किल्ला घेतात तोच किल्ला जिंकायला मोगलांना ६ वर्षे ते आठ वर्षे लागलीत. याला म्हणतात देवाणघेवाणीचा वेग, महाराजांचा वेग मोगलांच्या सातशे ते आठशे पटीने जास्त होता. मग श्रीमंत कोण झालं. स्वराज्य की मोगलशाही. अहो हे देवाणघेवाण वेग माहीत पडला म्हणून तर स्वराज्य दिवसेंदिवस वाढतच गेलं आणि मोगल साम्राज्य दिवसेंदिवस रसातळाला गेलं.

आणखी एक गोष्ट वेगाची ती सुद्धा खूप महत्त्वाची. मोगलांचा लष्कराचा वेग दिवसाला ३० किलोमीटर आणि मराठ्यांचा ताशी ६० किलोमीटर. म्हणजे जेव्हा मोगल दिवसाला ३० किलोमीटर जायचे तेव्हा मराठे ३०० किलोमीटर चालायचे. मग मराठे यांच्या नवसाला कधी तरी पावले असतील का? आणि जर मराठ्यांनी ठरविले की मोगलांना तांगडायचे तर अर्ध्या तासाचा खेळ बाकी काय? याला म्हणतात दळणवळणाचा वेग. तुमचा प्रवासाचा वेग सुद्धा असा वेगवान असला पाहिजे. जेवढा तुमचा प्रवास वेगवान तेवढाच तुमचा देवाणघेवाणीचा वेग जास्त. तेव्हा वस्तू वेगाने बुक करा, वेगाने मागवा, आणि तेवढ्याच वेगाने विका. मार्जिन केवळ ५% असले तरी दिवसाला शंभर वेळा देवाणघेवाण करा, नफा होतो ५००% . तेव्हा हेच गणित अंगावरील कपड्यानिशी निर्वासित झालेले सिंधी लोकांनी वापरले. भांडवल काहीच नव्हते तर बॉबी, गोळ्या विकून ते श्रीमंत झाले. गोष्ट ५ पैशांची नव्हती तर ती होती ५% नफा आणि देवाणघेवाणीचा वेग ५०० पटीचा. सकाळी गोळ्या, बॉबी महिला बनवायच्या आणि संध्याकाळपर्यंत पुरुष मंडळी ती विकून दिवसाला आपले भांडवल ५ पट करायचे. आता सिंधी लोक श्रीमंत झाले आहेत आणि हे गणित नीट न कळल्यामुळे आमचे लोक निर्वासित झाले आहेत. कारण उठसूठ नोकरीच्या मागे. देवाणघेवाण वेग किती तर ३० वर्षाला एक. मोगलांपेक्षा ६ पट तापदायक ही नोकरी नावाची भानगड अजून काही मराठी माणसं सोडायला तयार नाहीत. हल्ली तर मोर्चे काढू लागलेत म्हणे नोकरी द्या. परत देवाणघेवाण वेग ३० वर्षे आणि मागणी पूर्ण होण्यासाठी ६० वर्षे.

शिवाजी महाराज न कळल्याचे हे परिणाम, तेव्हा मराठी माणसा आता उद्योगधंदाच कर. कोणताही कर अगदी चहा विक तू Speed of transaction हे तत्व वापरून सहज प्रधान मंत्री होशील मराठी माणूस अजून कधी प्रधानमंत्री का झाला नाही तर त्याचे हे मुख्य कारण आहे. देवाणघेवाणीचा वेग ३० वर्षे, कारण नोकरी, पण हेच तुम्ही उद्योगात उतरले तर हाच वेग ३० वर्षांवरून १ दिवसावर येतो. मग बघा काय हे रॉकेट सायन्स काम करते. तेव्हा वस्तू झटकन घ्या पटकन विका, मार्जिन नफा थोडं मिळू द्या पण देवाणघेवाणीचा वेग शेकडधाच्या पटीत असू द्या.

शिवाजी महाराज रात्रीत एवढा मोठा किल्ला ताब्यात घ्यायचे. तुम्ही ३० वर्षांत एक फैक्टरी तरी उभी करा. शिवाजी महाराज ४ दिवसांत पूर्ण बाजारपेठ ताब्यात घ्यायचे. तुम्ही चार वर्षात तरी बाजारपेठेत आपला ठसा उमटवायला शिका, देवाणघेवाणीचा वेग कायम लक्षात ठेवा. तेव्हा जर तुम्ही गरिबीत मेलात तर मी असेच समजेन की तुम्ही या देवाणघेवाण या तत्त्वाकडे दुर्लक्ष केले. आता तुम्ही ठरवा गरीब म्हणून मोगलांसारखं मरायचं की मराठा म्हणून — अब्जोपती होऊन जगायचं.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!