९८.अपयशातून यशाकडे किंवा हार मानू नका
सिंह जरी जंगलचा राजा असला, तरी प्रत्येक वेळी त्याला शिकार मिळेलच असे नाही. एक शिकार मिळविण्यासाठी त्याला ८ -१० वेळा हार पत्करावीच लागते. तरीही त्याचे प्रयत्न तो चालूच ठेवतो. सिंहाचे जीवन हे ८५ टक्के अपयशाने भरलेले असते, तरीही हार न मानण्याची मानसिकताच त्याला जंगलचा राजा बनविते. इतिहासात अशी एकही यशस्वी व्यक्ती नाही, की जिने अपयश पचविले नाही. यशस्वी लोकांचे आपल्याला फक्त यशच दिसते, पण ते किती वेळा फेल झाले हे दिसत नाही. आणि आपण म्हणतो की ती व्यक्ती किती नशीबवान आहे. तिच्या यशामागे नशीब नसून तिची चिकाटी, इच्छाशक्ती, सातत्य व प्रयत्न असतात. खरे तर मोठ्या यशासाठी अपयशी होणे गरजेचे असते.
तुम्हाला पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून लगेच हार मानू नका, खचून जाऊ नका. पुन्हा जोमाने कामाला लागा. कमीत कमी १० वेळा प्रयत्न करा. यालाच Law of Avarage म्हणतात. तुम्हाला माहीतच आहे की विजेच्या बल्बचा शोध हा थॉमस अल्वा एडिसनने लावला. त्यासाठी तो ९९९ वेळा फेल झाला, आणि १०००व्या वेळी तो यशस्वी होऊन त्याने इतिहास रचला. किती संयम असावा याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पत्रकारांनी त्यांना विचारले की तुम्ही इतके हुशार असताना ९९९ वेळा फेल का झालात? त्यावर एडिसन म्हणाले मी ९९९ वेळा फेल झालो नसून मी हे सिद्ध केले की मी ९९९ वेळा जी प्रोसिजर वापरली, जो रस्ता वापरला त्या मार्गाने बल्ब लागतच नाही. त्यानंतरही एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली व सर्व भस्मसात झाले. तेव्हा तो म्हणाला परमेश्वराची लीलाही अगाध आहे. त्या परमेश्वराने माझ्या सर्व चुका, सर्व अपयश जाळून टाकले. आता उद्यापासून मी नव्याने प्रयत्न करून नवीन शोध लावणार. आणि त्याप्रमाणे त्याने अनेक शोध लावले. किती हा संयम आणि किती हा सकारात्मक दृष्टिकोन. यावरूनच हे सिद्ध होते की, संयमाने प्रयत्न करीत राहिल्यास मनुष्य नक्की जिंकतो आणि जिंकला नाही तर शिकतो तरी.
कधी कधी प्रयत्न करूनही अपयश येते, तेव्हा अपयश आल्यावर आपल्याला खूप वाईट वाटते, दुःख होते, कधी कधी रडू पण येते. अशावेळी सर्वसाधारण लोक अपयशाची कारणे सांगून आपल्या मनाचे समाधान करतात. की माझ्याकडे पैसेच नव्हते, ज्ञानच अपुरे होते. साधनसामग्रीच नव्हती, वेळच नव्हता, जवळच्या लोकांनी साथच दिली नाही. अशी अनेक कारणे सांगतात. तुम्हाला अपयशातून यशाकडे जायचे असेल तर अपयशानंतर चिंतन करून आपल्याकडे ज्या गोष्टीची कमी आहे त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तशी क्षमता निश्चितच आपल्याकडे असते.
जे संघर्ष करतात तेच जिंकतात व तेच यशस्वी होतात. परमेश्वर संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्याकडे आत्मविश्वास, मोठे ध्येय व प्रखर इच्छाशक्ती असते. अपयशानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस करता त्यावरच आपले यश अपयश अवलंबून असते. तो फोकस जर सकारात्मक असेल तर प्रत्येक अडचणीला, प्रत्येक समस्येला उत्तर मिळतेच मिळते. आणि आपण यशस्वी होतो.
Impossible या शब्दातच I am Possible हा अर्थ दडलेला असतो. म्हणूनच म्हणतात Everything is possible and nothing is impossible in the world.
एक सिद्धांत सांगतो, Acceptance and correction of the mistakes are the 1st step towards the success. चुकांचा स्वीकार करून सुधार करणारेच यशस्वी होतात. नवीन काम करताना चुका तर होणारच. त्या होऊ द्या, परंतु झालेल्या चुकांचा स्वीकार करून त्या पुन्हा होऊ न दिल्यास निश्चितच यश मिळते हा माझा स्वः अनुभव आहे. चुका करणे ही मानवाची प्रवृत्ती आहे. त्याच चुकांचा स्वीकार करणे ही आपली संस्कृती आहे. आणि झालेल्या चुका सुधारणे ही प्रगतीच असते. असेही सिद्धांत सांगतो. महान कार्य हे अडथळ्याशिवाय महान असू शकत नाही. म्हणून अपयशातून यशाकडे जाण्यासाठी निराश होऊ नका, हार मानू नका, बाऊन्स बँक करा, सर्वस्व पणाला लावून प्रामाणिकपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
