१५. आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.
शिवबाराजे जर तुम्हाला आयुष्यात काही बदल करायचे असतील तर ते प्रथम विचार करण्याच्या पद्धतीत बदल करावे लागतील. आपण कालपर्यंत जे करत होतो तेच जर आजही करणार असू तर मग आपल्या पदरात पण तेच पडेल जे कालपर्यंत पडत आले आहे. तेव्हा जर आपण विचारांची दिशा बदलली तर कृतीची दिशा देखील बदलली जाऊ शकते. ज्याला जगावेगळं यश मिळवायचं त्याने विचार देखील जगावेगळाच करावा लागतो आणि कृतीदेखील जगावेगळीच करायची असते. इनपुट बदलले की आउटपुट देखील बदलते त्या नियमाप्रमाणे माणसाचे विचार त्याचे ध्येय आणि त्यासाठी तो करत असलेली कृती या सर्व गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या असतात.
जे काम करायला बाकीचे लोक धजावत नाहीत तेच काम आपण हाती घेतलं आहे. आणि ते काम म्हणजे स्वराज्य निर्मिती, स्वतःचे राज्य निर्माण करायचे हा विचार देखील येथील लोकांसाठी खूप वेगळा आणि नवीन आहे. कारण आपल्या लोकांना कोणीतरी परका राजा म्हणून चालतो आणि ते आनंदाने शतकानुशतके ते ओझे अंगावर घेण्यात धन्यता मानतात. त्यांच्यासाठी जगणं आणि लाजीरवाणं जगणं यात फरक तो असतच नाही. मला तुम्हाला या सर्वांपेक्षा वेगळं घडवायचं आहे. मला तुम्हाला एक स्वतंत्र सार्वभौम राजा करायचा आहे. आणि या देशातील जनतेला एक नवीन स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, समृद्धीचा मार्ग दाखवायचा आहे. मग तुम्हाला तसे घडविण्यासाठी खालील गोष्टीचा आपणाला विचार करूंन कृती करावी लागेल. साधारणपणे त्या गोष्टी खालीलप्रमाणे-
१) लक्ष बदलू नका.
२) लक्ष नेहमी आठवणीत राहील याची दक्षता घ्या.
३) काय करणार आणि कधी करणार ते ठरवा.
४) प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी करणारे मुद्दे ठरवा.
५) आपल्या यशाचे मोजमाप करत चला.
६) कोणाला तरी जबाबदार माणसाला अहवाल देत चला.
तर राजे आपलं आयुष्य आणि त्याची दिशा ३६० डिग्रीमध्ये बदलणारे हे सहा मुद्दे आहेत. यशस्वी लोक याच पद्धतीने विचार करतात आणि तशीच कृती देखील. सामान्य माणसं सामान्य विचार करतात आणि कृती देखील सामान्य म्हणूनच ते सामान्य राहतात. माणूस सामान्य म्हणून जन्माला येऊ शकतो परंतु जर त्याने या गोष्टी शिकल्या तर मग मात्र तो परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कडवी झुंझ देत देत तो त्या परिस्थितीवर मात करून एक ना एक दिवस असा पराक्रम करता होतो की लोकांना त्याला असामान्य व्यक्ती म्हणून गौरवांकीत करावेच लागते. मला तुम्हाला तसे घडताना पहायचे आहे म्हणूनच ते मुद्दे नीट समजून घ्या आणि तशी कृती करत करत आपले ध्येय प्राप्त करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
