१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.
३) काय करणार आणि कधी करणार ते ठरवा
यशस्वी माणसं आपल्या आयुष्यात कधी काय करणार ते ठरवून करतात. आली लहर आणि केला कहर असे उद्योग यशस्वी माणसं कधी करत नसतात. यशस्वी माणसं जग जिंकणारी माणसं वेळापत्रकावर काम करतात आणि ते ठरलेलं काम ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच करतात. ध्येयवादी माणसांना आयुष्यात खूप कामे करावी लागतात आणि म्हणूनच ते हाताशी कमी आणि मर्यादित असलेला वेळ योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने कामी लागावा यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणूनच अशी माणसे नेहमी आपल्या कामांची यादी बनवतात मग ती कामे गरजेप्रमाणे प्राधान्य क्रमानुसार लावतात आणि मग एकानंतर एक असे करत करत सगळी कामे पार पाडतात. यशस्वी होणाऱ्या ध्येयवादी लोकांना आपली कामे पार पाडण्यासाठी वेळ मिळतोच शिवाय ते वेळेवर मात करत बऱ्याचदा विक्रमी कमी वेळेत जास्तीत जास्त कामे देखील करून दाखवतात. तेव्हा आपणही काय करणार आणि कधीपर्यंत करणार हे ठरवून ते करायचच. What i will do by when i will do हे स्वतःशीच ठरवा आणि कृती करा. शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे वाटचाल करत वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत राज्याभिषेक करून छत्रपती होण्याचे ध्येय ठरविले आणि ते ध्येय सहा वर्षे अगोदरच पूर्ण करत ६ जून १६७४ ला राज्याभिषेक करून घेत छत्रपती ह्या पदाला लोकमान्यता मिळवून घेतली. एक स्वतंत्र सार्वभौम राज्याचे महाराज छत्रपती जाहले.
आपण अजून आपल्या आयुष्यात काय करायचे हे मार्गदर्शनाअभावी ठरविले नसेल तर मग आता हे पुस्तक वाचल्यावर तरी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा. लक्षात ठेवा ध्येयासाठी जगणं आणि ध्येयरहीत जगणं यात खूपच फरक आहे. ध्येयासाठी लढणारा माणूस ध्येय प्राप्त करताना मेला तरी अमर होतो. आणि ध्येयहीन जगणारा म्हातारा होऊन मेला तरी तो कोणाच्या आयुष्यावर प्रभाव पाडू शकत नाही. तेव्हा ध्येयवादी बना. ध्येय ठरवा आणि ते प्राप्त करण्याची तारीख देखील ठरवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या कामाला डेडलाईन असत नाही ते काम कधीच पूर्णत्वाला जात नाही. बघू करू वेळ मिळाला तर पाहू असं म्हणणाऱ्याला ध्येय प्राप्त होत नाही. म्हणून
दोन्ही गोष्टी आजचं ठरवा. आपले ध्येय आणि ते प्राप्त करण्याची अंतिम तारीख.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
