१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१) कायम उत्साही रहा-

अपयशातून बाहेर पडण्याचा हाच एक राजमार्ग आहे की शक्य तितक्या लवकर ते डोक्यातून काढून टाका. यशस्वी माणसं जास्तवेळ चिंतन करतात ते यशाचं. अपयशाची चिंता करत बसतच नाहीत. कारण जे झालं ते झालं आता ते परत होणार नाही याची काळजी घ्या आणि पुढील कामावर आपले लक्ष केंद्रित करा. जे होऊन गेलं त्याची जास्तवेळ काळजी करू नका. चिंता करत बसू नका. नाहीतर त्यामुळे आपली पुढची कामे एकतर अडकून पडतील किंवा बिघडून जातील. तेव्हा हातात असलेलं काम थांबणार नाही, पुढील कामे बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या आणि त्यासाठीच सतत उत्साही रहा.

जेव्हा तुम्ही उत्साही असता तेव्हा तुमचं अर्ध यश तर काम सुरू करण्यापूर्वीच तुमच्या हाताशी असतं. बाकी राहीलेलं अर्ध काम तुम्ही कृती केली की लगेच पूर्ण यशात परावर्तीत होत असतं तेव्हा कायम आनंदी रहा, उत्साही रहा. आनंदी माणूसच कल्पना करू शकतो. उत्साही माणूसच सृजनशील कामे करू शकतो. जगातील सगळी मोठी कामे ही सृजनशील विचारांनीच आलेली आहेत आणि ती सुचली आहेत ती केवळ उत्साही माणसांनाच. तेव्हा जेवढं तुम्ही जास्त आनंदी उत्साही रहाल तेवढीच जास्त शक्यता तुमच्या यशाबाबत निर्माण होते आणि जेवढं जास्त तुम्ही दुःखी, उदास, चिंताग्रस्त राहाता तेवढीच जास्त शक्यता तुमच्या अपयशाबाबत निर्माण होते. तेव्हा उत्साही राहून शक्यतांचा विचार करायचा, उदास राहून अडथळ्यांची व्यर्थ चिंता करत बसायचे नाही. think about the possibilities, don’t think about the difficulties.

तेव्हा नवीन संधी प्राप्त करायच्या आहेत तर उत्साही रहा. नेहमी अशा वातावरणात आणि अशा लोकांच्या सोबत रहा की जे नेहमी सकारात्मक वृत्तीचे आहेत आणि सतत उत्साही आनंदी आहेत. लक्षात ठेवा संगत आणि पंगत या दोघांचाही माणसांच्या उत्साहावर प्रभाव पडतोच. तेव्हा उत्साही वातावरणातच रहा आणि उत्साही लोकांच्या सोबतच काम करत चला. आनंदी माणसं यशस्वी असतात आणि यशस्वी माणसंच उत्साही असतात. तेव्हा अशा आनंदी उत्साही आणि यशस्वी माणसांच्या सोबत रहा.

आपला उत्साह जळता निखारा आहे तो कधी विझू देऊ नका. कारण त्यातूनच पुढे आपणाला आग निर्माण करता येणार आहे. या निखाऱ्यावर कधी पाणी पडू देऊ नका. उलट याला सतत सकारात्मक विचारांची फुंकर
मारत रहा. हाच एक अपयशातून बाहेर पडण्याचा एक राजमार्ग आहे. संकटे येतील जातील, समस्या उभ्या राहतील आणि सुटतील, आपण मात्र स्थिर रहायचे, खंबीर रहायचे आणि उत्साहाने पुढील कामावर लक्ष द्यायचे.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!