१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

२. संयम ठेवा –

एखादवेळी अपयश आले तरी लगेच हडबडून जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका. एक अपयश म्हणजे सर्वस्व नाही. आपण अनेक कामे करतो त्यातील एखादे काम अपयशी झाले म्हणून निराश होऊ नका. माघार घेऊ नका. ठाम रहा, संयम ठेवा. कारण हे जग हे नेहमी परिवर्तनशील आहे. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ ही होतच असते. म्हणूनच पहाट होईपर्यंत दम धरा. आपण जर आपली सगळी कामे व्यवस्थित मार्गी लावली होती मग तरीही अपयश आले असेल तर त्याला काही बाह्य घटक जरूर जबाबदार असणार आहेत. आणि वातावरणातील हे बाह्य घटक आणि कारणे, परिस्थिती ही बदलणारी असते. बदलाची वाट पहा. योग्य वेळ येणारच असते. तोपर्यंत फक्त संयम ठेवा. कारण अपयशाचा season आणि अपयशाची Reason दोन्हीही बदलणारीच असतात. ती बदलेपर्यंत संयम ठेवा.

संयम ठेवला तरच वाघाला शिकार करता येते. संयम ठेवला तरच बगळ्याला मासा मिळतो. तसं संयम ठेवला तरच संकटातून अपयशातून बाहेर पडता येते. आणि जर संयम सोडलाच तर मग मात्र एका नवीन संकटाला सामोरे जावे लागू शकते किंवा आणखी एक अपयश पदरी पडू शकते तेव्हा संयम ठेवा. उफाळलेल्या सागराला सामोरे जाण्यात काय अर्थ त्यात तुमची नावच बुडेल. उसळणाऱ्या लाटेचा सामना करायची चूक करू नका ती तुमचा जीव घेऊ शकते. वणवा लागला असेल तर सैरभर पळू नका. पूर आला तर धावत सुटू नका, संयम ठेवा. योग्य जागा पहा. आश्रय घ्या आणि जोपर्यंत बाहेरील वातावरण निवळत नाही, शांत होत नाही तोपर्यंत शांतच बसा हाच यशाचा मार्ग आहे, आणि अपयशातून बाहेर पडण्याचा राजमार्ग आहे.
ज्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाही त्या गोष्टी ठिकठाक होईपर्यंत वाट पाहणे हे तरी आपल्या हातात नक्कीच असते. तेव्हा बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका. वातावरण बदलाची वाट पहा आणि आपणाला अनुकूल वातावरण तयार झाले की मग लगेच त्या कामाला सुरूवात करा. लक्षात ठेवा ज्यांना संयम पाळता येतो त्यांनाच वेळ संधी देते आणि तेच लोक बरोबर वेळ पाहून काम करतात आणि यशस्वी होतात. तेव्हा नुसती मेहनत करून उपयोग नाही आणि नियोजन करूनही उपयोग नाही. सर्वात महत्त्वाची आहे ती वेळ. आणि अशी आपली योग्य अचूक वेळ येईपर्यंत संयम ठेवा. अपयश येणारच नाही असे काम करायचे असेल तर संयम ठेवा. अचूक वेळ timing साधा आणि अपयशालाच यशात बदला.

जिजाऊ मातेच्या या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी आयुष्यात अनेक ठिकाणी मोठा संयम बाळगला आणि पुढे मोठे यश मिळवत गेले. सन १६४७ ला शहाजीराजे यांना जिंजीला आदिलशहाने कैद केले. यावेळी महाराजांनी मोठा पराक्रम दाखवत फतेहखानाला पराभूत करत यश मिळवले तरी पण वडिलांच्या सुटकेसाठी कोंढाणा किल्ला परत दिला आणि आदिलशाहीवर आक्रमण करणार नाही हा शब्द देत तो १६५६ पर्यंत पाळला. म्हणजे तब्बल नऊ वर्षे महाराजांनी संयम ठेवत योग्यवेळची वाट बघितली आणि मग पुढे जावळीवर छापा टाकला. जानेवारी १६५६ आणि स्वराज्याचा एका दमात तिप्पट विस्तार केला. हेच मोगलांच्या बाबतीत देखील केले. सन १६६५ ला पुरंदरचा तह झाली आणि त्यानुसार १६७० पर्यंत महाराजांनी मोगलांविरूद्ध म्हणजे तब्बल ५ वर्षे काही हालचाल केली नाही. पण ४ फेब्रुवारी १६७० ला जी एक जबरदस्त घोडदौड केली त्या वेगात महाराजांनी एकदम फटाफट २३ किल्ले परत घेतले आणि स्वराज्य पुन्हा विस्तार करत संपन्न आणि समृद्ध केले.

तेव्हा अपयशातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे की संयम ठेवा, योग्य वेळ आणि संधीची वाट पहा आणि एकदा का ती संधी आली, वेळ आली की मग मात्र आपल्या सर्व ताकदीनिशी तुटून पडा आणि यशाचा बॅकलॉग, यशाची उणीव भरून काढा. “सौ सोनारकी तो एक लोहारकी” असा जोरदार हातोडा मारा.

 

अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग कसा तयार करावा ?

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!