१०१.सर्वोत्तम रोल मॉडेल हनुमान,आजही जिवंत आहेत!

१०१.सर्वोत्तम रोल मॉडेल हनुमान, आजही जिवंत आहेत!

जय श्रीराम, पृथ्वीतलावर जेवढे देव, दानव, नायक, महानायक होऊन गेले. त्या सर्वांना आयुष्यात कधी ना कधी तरी अपयश आलेच आहे असा इतिहास सांगतो. पण महाबली हनुमान असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की, त्यांना कधीच अपयश आलेलं नाही.

१०८ नावे असलेले हनुमान हे भक्ती, शक्ती, कौशल्य, चारित्र्य, नम्रता, संकटमोचक, ज्ञानी, सेवक अशा अनेक गुणांमुळेच ते रियली सुपरमॅन आहेत. हनुमान हे सर्व काळासाठी आणि सर्वांसाठी एक सर्वोत्तम रोल मॉडेल आहेत. म्हणूनच जगात सर्वात जास्त मंदिरे ही फक्त हनुमानाचीच आहेत. माता अंजनीने महादेवाची कठोर तपश्चर्या केली. वायुदेवापासून अकरावा रुद्रावतार म्हणून पवनसुत, हनुमंताचा जन्म झाला. तोही नाशिक जवळच्या अंजनेरी पर्वतावर झाला. प्रभू रामचंद्राच्या वरदानाने हनुमानानी जे कार्य केले ते तमाम मानव जातीला ऐक सर्वोत्तम रोल मॉडेल ठरले आहे. आपल्या जीवनातील यश आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीकोनातून, हनुमंताचे ७मोठे गुण हे आपणा सर्वांसाठी अनुकरणीय आहेत ते असे.

१) गुरुमुळेच यश मिळते :

हनुमान स्वतः समर्थ असतानासुद्धा त्यानी सूर्य देवाला गुरू मानले. परमेश्वराने प्रत्येकालाच अफाट बुद्धी आणि शक्ती दिलेली आहे. परंतु दिशा दाखविण्यासाठी आणि तुमच्यामध्ये असलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला गुरूची, अर्थात चशी ची गरज भासते. तसेच संकटाच्या वेळी विश्वास देऊन दिशा दाखविणारा गुरूच असतो. मातंग ऋषींनी शाप दिल्याने हनुमान स्वतःमध्ये असलेली
शक्ती विसरला होता. सीतामाईच्या शोधासाठी लंकेचा समुद्र पार करणे गरजेचे होते. त्या वेळी गुरू जांबुवतांनी हनुमानाला आठवण करून दिली की, तू लहान असताना भूक लागली म्हणून फळ समजून तू सूर्यालाच गिळंकृत केले होते. तुझ्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. म्हणून सीतामाईच्या शोधासाठी फक्त तूच समुद्रावरून उडी मारून जाऊ शकतोस. हा विश्वास दिल्यानेच हनुमंत हा मातंग ऋषीच्या शापातून मुक्त झाला, त्यानंतरच हनुमानाने १०० योजने दूर असलेल्या अशोक वनातच उडी मारली. तिलाच हनुमान उडी म्हणतात. तुम्हीही तुमच्या गुरूवर अतूट विश्वास ठेवून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर गरुड झेप घेण्यासाठी तुमची हनुमान उडी मारा व यशस्वी व्हा.

२) पर्यायावर अवलंबून राहू नका:

जीवनात कठीण प्रसंगी आपण पर्याय किंवा ऑप्शन शोधत असतो. राम रावण युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा, द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी नावाची जडीबुटी आणण्याचे काम हनुमंतावर सोपविल गेलं, हनुमान हे रॉकेटच्या गतीने हिमालयात गेले. पण द्रोणागिरी पर्वतावर हजारो जडीबुटी दिसल्या, रिस्क नको, ऑप्शन नको म्हणून संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. कोणती जडीबुटी घ्यायची ती घ्या. पण माझ्या लक्ष्मणाला दुरुस्त करा.

३) संकटमोचक हनुमान :

दुनिया निर्माण करणाऱ्याला भगवान म्हणतात आणि संकटाला हरविणाऱ्याला संकटमोचक हनुमान म्हणतात. प्रभू रामचंद्रावर जेव्हा जेव्हा मोठमोठी संकटे आली, त्या त्या प्रत्येक वेळी, स्वतः पुढाकार घेऊन हनुमंतानेच सर्व संकटे दूर केली. त्यांमध्ये सीतामाईचा शोध असो किंवा रात्रीतून संजीवनी जडीबुटी आणायची असो. यापुढें आपल्या जीवनात छोटे-मोठे संकट आले तरी, बजरंगबली हनुमंताला रोल मॉडेल
माणून जबाबदारी स्वीकारा, पुढे येऊन नेतृत्व करा आणि तुम्हीच तुमच्या क्षेत्रातील संकटमोचक बना.

४) नम्म्रतेने वागनारा हनुमान :

जीवनात अहंकारामुळे खूप मोठे नुकसान होत असते. नम्रता हा गुण शिकावा तो हनुमंताकडूनच. तसे बुद्धिवान माणसे नम्रच असतात. हनुमान सर्वात शक्तिशाली, बलशाली, ज्ञानी असतानाही हनुमंताइतका नम्र सेवक जगात चुकूनही सापडणार नाही. सगळी कामे स्वतःच केली तरी, प्रभू आपल्या कृपेमुळे झाले, असे सांगणाऱ्या हनुमंताने अनेकांचा अहंकार मोडून काढला. महाभारतात भीमाला जेव्हा स्वतःच्या शक्तीचा गर्व झाला. तेव्हा हनुमंताने म्हाताऱ्या वानराचे रूप घेऊन भीमाला रस्त्यातील शेपटी उचलून बाजूला ठेवण्यास सांगितले. ती शक्तिशाली भीमाला उचलता आली नाही. म्हणूनच अहंकार बाजूला ठेवून नम्रतेने वागा आणि जीवनात यशस्वी व्हा.

५) चारित्र्यवान हनुमान :

जय जय हनुमान, ज्ञान गुन सागर. हनुमान बलशाली असून सुद्धा ज्ञानाचे सागर आहेत. मुंगी येवढे सूक्ष्म रूप ते विराट रूप धारण करणारा हनुमान. अशक्य ते शक्य करून दाखविणारा महाबली हनुमान. हे खरे चारित्र्याचे रोल मॉडेलच आहेत. हनुमान लहान मुलीला पण माता म्हणूनच संबोधित असत. दिलेल्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून त्या पूर्ण करण्याचा गुण फक्त हनुमानाकडूनच शिकायलाच हवा.

६) मर्यादा सांभाळणारा हनुमान:

मर्यादा सांभाळून कार्य करणारे हनुमानच आहेत. ते सीतामाईला अशोक वनात भेटल्यानंतर सीतामाईला प्रभू रामचंद्राकडे आणू शकले असते. परंतु प्रभू रामचंद्रांनी फक्त शोध घ्यायला सांगितले होते, म्हणून स्वतःच्या मर्यादा सांभाळणारे रोल मॉडेल हे हनुमानच आहेत.
७) श्रद्धावान हनुमान :

प्रभू रामचंद्रावर हनुमंताची इतकी श्रद्धा होती की, त्याचे अनेक दाखले देता येतील. सीतामाईने दिलेल्या मोत्याच्या हारातील सर्व मोती फोडून, फेकून दिले, कारण त्यामध्ये राम सीता नव्हते, पण स्वतःची छाती फाडून त्यामध्ये राम सीता असल्याचे हनुमानानेच दाखविले. सीतामाई, केसाच्या भांगेमध्ये कुंकू आणि सिंदूर लावताना, हनुमंताने विचारले माता, सिंदूर लावल्याने काय होते. तेव्हा सीतामाई म्हणाल्या ज्यांच्या नावाने हा सिंदूर लावला जातो त्यांचे आयुष्य वाढते. तेव्हापासून हनुमंताने सर्व शरीरालाच सिंदूर अर्थात शेंदूर लावून घेतला. जर कपाळावरील एका ठिपक्यांने प्रभू रामाचे आयुष्य वाढत असेल, तर संपूर्ण शरीरालाच शेंदूर लावल्याने प्रभू रामचंद्राचे किती आयुष्य वाढेल. एवढी श्रद्धा फक्त हनुमानच दाखवू शकतात. म्हणूनच प्रभू रामचंद्रांनी वरदान दिले की, कलियुगाच्या अंतापर्यंत हनुमान जिवंत राहणार. म्हणूनच हनुमंताला चिरंजीवी म्हणतात. रामायणानंतर तब्बल २ हजार वर्षांनी महाभारत घडले. त्यावेळी पण हनुमान जिवंतच होते. महाभारतातील भीम हा हनुमंताचा भाऊच होता. कारण दोघेही पवनसुत आहेत. कौरव पांडवाच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर कपिल ध्वज धरणारा हनुमानच होता. महाभारतात अनेक ठिकाणी हनुमंत असल्याचा उल्लेख आलेला आहे.

संत तुलसीदास यांनी चारशे वर्षांपूर्वी लिहिलेली हनुमान चालीसा आज म्हणताना तिथेही हनुमानाचे वास्तव्य असते आणि आताही अनेक हनुमान भक्तांना ते दर्शन देतात, असा दावा अनेकांनी केला आहे. अशा सर्व गुणसंपन्न असलेल्या हनुमंताला सर्वोत्तम रोल मॉडेल मानून दररोज हनुमान चालीसा म्हणा आणि आपल्यासह सर्व मानवजातीचे कल्याण करा. जय श्रीराम. जय हनुमान, रामकृष्ण हरि.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!