१०७.सुख म्हणजे काय?

१०७.सुख म्हणजे काय?

सुख म्हणजे नक्की काय असतं ? असे जर विचारले तर अनेकांची अनेक उत्तरे असतात. जसे निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख असतं. म्हातारपणी मुले आधाराला जवळ असणं म्हणजे सुख असतं. भरपूर पैसा असणं म्हणजे सुख असतं. शरीर धडधाकट असणं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणे, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुखच असतं.

याचा अर्थ सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो की प्रत्येक जण एका बाबतीत दुःखी आहे. कोणाची बायको भांडखोर आहे, कोणाला संडास व्यवस्थित होत नाही, कोणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत. तर कोणाकडे पैशाची कमतरता आहे. याचाच अर्थ उरलेल्या ९९ टक्के बाबतीत आपण सुखीच असतो ना! फक्त १ टक्के दुःख आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण ९९ टक्के सुखाकडे दुर्लक्ष करतो व १ टक्के दुःख चघळत बसतो. म्हणूनच आपण दुःखी असतो. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की आपण सुखातच असतो, पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहीत नसतं.

लहान असताना वाटतं लहानपण हे परावलंबी जीवन असते. अधिकार नसतात. मी केव्हा मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभा राहतो. पण मोठे झाल्यावर वाटते की किती हे टेन्शनचे जीवन जगतोय. कामाचं टेन्शन, बॉसचं टेन्शन, कर्जाचं, मुलांचं, संसाराचं टेन्शन. केव्हा एकदा मुले मोठे होतात व मी जबाबदारीतून मुक्त होतो असेच वाटत असते.

आपण म्हातारे झाल्यावर शरीराचे अनेक भाग कुरकुरू लागतात. अनेक
आजार मागे लागतात. तेव्हा वाटते नको ते म्हातारपण. व्यवस्थित जेवण घेणे, लघवी संडास साफ होणे. निवांत झोप लागणे हे सुख नाही का? आपले हातपाय धडधाकट आहेत. डोकं व्यवस्थित चालतय, आपण चांगले काम करतोय, मुलं चांगले शिक्षण घेत आहेत. घराबाहेर असताना घरी आपली कोणी वाट बघते हे सुख नाही का? सुख म्हणजे नक्की काय असतं ! तुमचं आमचं सेम असतं. ते आपल्याला घरबसल्या मिळत असतं.

तुम्हाला सुखी राहायचं असेल तर, आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तक्रारी करणे सोडा. दुसऱ्याशी तुलना करणे सोडा. निराशा, आळस झटकून टाका. मनाच्या खिडक्या उघड्या ठेवून विचार केला तर तुम्ही खूपच सुखी आहात, असे तुम्हाला वाटेल. सुखी जीवन म्हणजेच आपला दररोजचा दिवस सुखात जगा, आनंदात जगा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!