जडणघडणीचा काळ:
जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण
गुढीपाडव्याची यात्रा
एकीकडे माझे शालेय शिक्षण चालू होते. त्यात मी नंबर काढतच होतो. त्याचवेळी गावातील विविध सण-उत्सवही जवळून अनुभवत होतो. यातून गावकी कळत होती. आमच्या गावात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा असायची. सगळ्याच गावांना अशी परंपरा असते. ग्रामदैवताचा हा उत्सव घरोघरी उत्साहाने साजरा होतो. आजच्या काळात ही प्रथा परंपरा चालूच आहे. ग्रामदैवताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ असतो. त्यामुळेच गावापासून कितीही दूर स्थायिक झाले, तरी मूळचे ग्रामस्थ यात्रेनिमित्त गावात येतातच. यातून नातेवाइकांचा गोतावळा एकत्र येतो, एकमेकांची विचारपूस होते, गोडधोड जेवणाचा आनंद घेत यात्रेत फिरायचे, देवाची यथासांग पूजाअर्चा करायची असे मंत्रमुग्ध करणारे वातावरण या काळात गावात असते. त्यातही यात्रा व जत्रा यातील फरकही यानिमित्त सांगायला हरकत नाही. कारण नव्या पिढीला दोन्ही सारखेच वाटत असेल. घात्रा म्हणजे देवाचा नैवेद्य पूर्ण शाकाहारी असतो. तर जत्रेत देवाचा नैवैद्य मांसाहारी असला तरी चालतो. प्रत्येक गावाच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरेनुसार यात्रा की जत्रा, हे ठरते. तर अशा रीतीने आमच्या गावातील गुढीपाडव्याच्या प्रतिपदेची यात्रा म्हणजे आनंदाची मोठी पर्वणी असायची.
शिक्षण सक्ती कायद्यामुळे आताच्या पिढीला शालेय शिक्षणाचा कायद्याने हक्क मिळाला आहे. परंतु पुस्तकी ज्ञान कितीही मिळविले, तरीही जगण्याच्या व्यवहारातले शिक्षण हे अनुभवातूनच मिळत असते. मी शालेय दशेपासूनच जरा हुशार असल्याने घरातील अनेक कामांमध्ये आजोबा, वडील मला बरोबर घ्यायचे. विशेषतः गणिती हिशेब, आकडेमोडीचे काम असेल; तर मला आवर्जुन बोलवायचे. त्या काळात आमच्या रानात ज्वारीचे पीक मुबलक येत असे. भुईमूग, करडईचेही पीक घेतले जायचे; पण प्रमुख पीक म्हणाल तर ज्वारी, आमचे शेत मोठे असल्याने पाच-सात खंडी ज्वारी व्हायची. एक खंडी म्हणजे जवळपास वीस पोती. असे शंभर-दीडशे पोती ज्वारी झाल्यावर वर्षभरासाठी घरी लागणारी ज्वारी बाजूला काढायची व उरलेली ज्वारी बाजारात विकायला नेऊन रोकड मिळवायची असा तो शेतीव्यवसाय असायचा. ज्वारी बाजारात विकायला न्यायची म्हटले, तर सर्वात जवळचा बाजार कडा, आष्टीचा, नाही तर थेट मिरजगावला ज्वारी न्यायची. मिरजगावला बाजारासाठी जायचे असेल, तर वडील मला आवर्जुन न्यायचे. त्यासाठी भल्या पहाटेच बैलगाडीत ज्वारीची पोती भरून आम्ही निघायचो. मिरजगाव गातून तिथे बाजारभाव पाहून व्यापाऱ्यांना काही माल विकायचो. काही माल थेट ग्राहकांना किरकोळ पद्धतीने विकायचो. व्यापाऱ्यापेक्षा थेट ग्राहकाला माल विकला, तर थोडे पैसे जास्त मिळायचे. त्या काळात आजच्या प्रमाणे दशमानपद्धतीची वजनमापे नव्हती. त्याऐवजी पायली, आदुली, चिपटे, निपटे, आठवा अशी मापे होती. एक पायली म्हणजे साधारणतः पाच-साडेपाच किलो, असे गणित असायचे. विक्रीचा हिशेबही पायलीच्या दरानेच व्हायचा. साधारणपणे दोन ते तीन रुपये पायली असा ज्वारीला भाव असायचा. माझे वडील गिऱ्हाइकाला माप मोजून द्यायचे व मी दिलेल्या ज्वारीचा मापाप्रमाणे हिशेव करून पैसे जमा करायचो. आमच्याकडे एक जाडीभरडी पिशवी असायची, त्यात मी पैसे जमा करायचो. त्या पिशवीला खूप जपायचो. कारण आमची सगळी मेहनत लक्ष्मीच्या रूपाने त्या पिशवीत येत असे. दिवसभर आमचे हे धंदे शिक्षण चालू असायचे. घरून आणलेल्या भाकरी खायच्या व परत कामाला जुपायचे. या कामापोटी मला एक आवडते बक्षीस मात्र मिळत असे, ते म्हणजे जिलबीचे. वडील मला आठ आणे द्यायचे व मी हलवायाकडून गरमागरम जिलबी आणून त्याचा मनापासून आस्वाद घेत असे. माझ्यासाठी ज्वारी बाजारात नेण्याचे जिलबी हेही एक आकर्षण होते. मला मुळातच गोडाची जास्त आवड होती. असा बाजार करून आल्यावर आम्ही आमच्या वाड्यातील एका खोलीत जायचो. वडील खोलीत आल्यावर दार बंद करून घ्यायला सांगायचे. दिवसभरात जमा झालेल्या पैशाचा हिशेब करून ते सगळे पैसे आईकडे ठेवायला द्यायचे. त्या काळात बँका वगैरे अशा भानगडी नसायच्या. त्यामुळे आई ते पैसे गाडग्यामडक्यात सुरक्षित ठेवून द्यायची. तिच्या दृष्टीने तेच तिचे लॉकर असायचे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
