१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

४) नेत्याकडे बघून –

Followers आता राजे मी तुम्हाला काम करणाऱ्या लोकांचा चौथा प्रकार सांगते. ही लोकं आपल्या राजाची वागणूक बघून आपल्या नेत्याचे कामकाज पाहून त्याच्यासोबत काम करतात. ही लोकं प्रेरित होऊन काम करणारी असतात. हे लोक आपल्या नेत्याला आपल्या राजाला मनापासून मानतात, आदर करतात आणि राजा जे करेल तेच करतात. राजा वागत असेल तसेच ते लोक वागतात. हे लोक नेत्याचे अनुकरण करून काम करणारे असतात. त्यांच्यासमोर त्यांचा राजा हाच एक आदर्श प्रमाण असतो. तेव्हा अशा लोकांसाठी आपणही काही उदाहरणे सेट केली पाहिजेत. हे लोक पुढे कामाचे असतात. अशा लोकांना Leading from front ची इच्छा आणि मानसिकता दोन्ही असते. तेव्हा अशा लोकांसमोर वागताना खूप सावध वागा. चुकूनही आपले हातून चूक होता कामा नये. आणि म्हणूनच आपण नियम पाळायचे. शिस्त पाळायची राजा असला तरी. कारण हे लोक तुम्हाला फॉलो करणारे तुमचे अनुकरण करणारे असतात. ते अनुकरण करताना इतर कोणत्याही गोष्टींचा जास्त विचार करत नाहीत. आपल्या राजाने केलं ना मग आपण करणारच अशी त्यांची भूमिका असते.

शिवचरित्रात असे घडलेले अनेक प्रसंग आहेत. यातील एक प्रसंग म्हणजे तानाजी मालुसरे यांचा. “आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे” असं तानाजी मालुसरे म्हणाले. याला कारण काय तर कुटुंबापेक्षा स्वराज्या आधी. कुटुंब आणि स्वराज्य यांच्यात प्राधान्य देण्याची निवड करण्याची वेळ आली तर ती स्वराज्य कार्याचीच करायची ही शिकवण महाराजांनी देण्याची गरजच नव्हती. मावळे लोक महाराजांकडे पाहूनच हे करायला शिकले. जेव्हा अफजलखान चालून आला तेव्हा दोन वर्षांचे बाल शंभू आणि मरणाच्या दारात पोहोचलेल्या सईबाई यांना सोडून महाराज राजगडावरून प्रतापगडावर गेले. ते तिकडेच चार महिने राहिले. इकडे सईबाईंचे आजारपणात निधन झाले. दहावा पण झाला, तरी महाराजांनी प्रतापगड सोडलाच नाही. कारण जर मी माझ्या कुटुंबाचे पहात बसलो तर माझ्या स्वराज्यातील रयेतची हजोरा कुटुंबे उद्ध्वस्त होतील या जाणीवेने महाराज प्रतापगडावरच थांबले. अफजलखान प्रसंग संपवला. पुढे महाराज टाकोटाक पन्हाळ्याला भिडले. पन्हाळा जिंकला आणि परत एक नवीन संकट स्वराज्यावर
चालून आले. सिद्दी जौहर सत्याहत्तर हजार फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने धावला. आता परत जर महाराज पन्हाळ्यावरून थेट राजगडला आपल्या कुटुंबासाठी परत आले असते तर त्यांचा पाठलाग करत करत सिद्धी जौहर देखील पुण्यात आला असता. त्याने राजगडाला वेढा घालून पुण्यात प्रचंड नासधूस करून नंगानाच केला असता. अनेक लोकांची घरे उजाडली गेली असती. शेतीभाती बरबाद झाली असती. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली असती. आणि नेमकं हेच टाळण्यासाठी महाराज पन्हाळ्यावर थांबले. परत तेथे चार महिने गेले. सोबतच्या सर्व मावळ्यांनी महाराजांच्या आयुष्यातील हे दोन्ही प्रसंग डोळ्यांनी जवळून पाहिले आणि त्यांना याची खात्री पटली की महाराजांसाठी स्वराज्यापेक्षा मोठं असं दुसरं काही नाही. तेव्हा मावळेसुद्धा तशाच समर्पण बुद्धीने वागू लागले आणि आधी स्वराज्य मग कुटुंब असे म्हणत तसेच जगू लागले.

असेच आणखी एक उदाहरण आहे शिवचरित्रात आणि ते म्हणजे कन्हेरगडचा किल्लेदार रामजी पांगेरा यांच्या कुटुंबाचे. दुसरे उदाहरण आहे बाजी जेथे यांचे दक्षिण दिग्विजयी मोहीमेच्या वेळेचे. ही दोन्ही उदाहरणे विस्तारीत स्वरूपात शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या पुस्तकात दिली आहेत आपण ती जरूर वाचा. आणि अशाचप्रकारे शिवाजी महाराजांचे अनुकरण करा. पुन्हा स्वराज्य निर्माण करता येणं शक्य आहे याच्यावर विश्वास ठेवा.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्रात बरेच लोक महाराजांसारखे दिसण्यासाठी तशीच दाढी ठेवतात, मिशी ठेवतात, वर कपाळाला चंद्रकोर असतेच पण वागणूक शून्य असते. असे पोकळ लोक केवळ बाह्य दिखावा करून आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी असल्याचा भास निर्माण करतात. वास्तवात शिवाजी महाराजांसारखे वागण्याचा यांचा ध्यास नसतो, तशी तेवढी योग्यताही ते कमवत नाहीत आणि मग केवळ शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या एखाद्या संघटनेला जन्माला आणतात. नाहीच झाले तर रेडिमेड एखाद्या संघटनेत घुसतात आणि टोळी टोळीने फिरत झुंडशाही गाजवायला बघतात. फक्त घोषणाबाजी करणे, एखाद्या जातीचा किंवा समाजाचा द्वेष करणं एवढेच काम ते करतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही खुळी यालाच शिवभक्ती म्हणतात. शिवाजी महाराज न कळल्याचे हे ज्वलंत उदाहरण होय. आपल्या आजुबाजूला असे अनेक स्वतःला शिवभक्त म्हणवणारे लोक सापडतील. आचरण आणि कर्तृत्व शून्य असणाऱ्या अशा लोकांपासून सावध रहा. यांच्या आजुबाजूला देखील फिरकू नका आणि यांच्या एकाही कार्यक्रमाला चुकून देखील जाऊ नका. फुकटची दंगल हे करतील आणि तुम्ही जेलमध्ये जाल. तेव्हा यातील मुद्दा हाच आहे की शिवाजी महाराज नीट कळून घ्या आणि त्यांच्या आचरणाप्रमाणे चला. तसे कर्तृत्व करा, तसा पराक्रम करा.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!