उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

घुमाळांचा पहिला ट्रॅक्टर

लॉ कॉलेजमध्ये माझ्या वर्गात नाईकसाहेब म्हणून होते. ते एमए‌आयडीसी (महाराष्ट्र अँग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) मध्ये रिजनल मॅनेजर (क्षेत्रीय व्यवस्थापक) होते. नोकरी करीत असताना ते लॉचे शिक्षण घेत होते. आमची ओळख झाली व पुढे चांगली मैत्रीही झाली. त्यांना मी आमच्या घरची, शेतीवाडीची माहिती दिली होती. त्यांना विचारले, “आम्ही कायम पारंपरिक शेती करतो. शेतीचा विकास कसा करायचा?” त्यांच्या कॉर्पोरेशनकडे तेव्हा शेती अवजारे, बी-बियाणे, खते पुरविण्याचे काम होते. त्यांनी मला सल्ला दिली, “तुमच्याकडे शेती भरपूर आहे, तर तुम्ही ट्रॅक्टर घ्या.” त्यांच्या कॉर्पोरेशनकडेच एचएमटी ट्रॅक्टरची डिलरशिप होती. कर्जप्रकरणासाठी ते साहाय्य करीत असत. तेव्हा अस्तित्वात असलेल्या व आता बंद झालेल्या भूविकास बँकेमार्फत कर्ज मंजूर होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार मी आवश्यक कागदपत्रे घेऊन आमच्या जिल्ह्याच्या भूविकास बँकेच्या बीडमधील मुख्य शाखेत गेलो. कागदपत्रांची छाननी होऊन आमची फाईल मंजूर झाली. एमएआयडीसीला मंजुरीपत्र देण्यात आले. त्यांनी आमचे प्रकरण मंजूर केले. आम्हाला आठ-पंधरा दिवसांत ट्रॅक्टर प्रत्यक्षात मिळणार होता. मधल्या काळात भूविकास बँकेच्या बीड येथील शाखेला पत्र द्यायचे होते. मी बीडहून निघून कडा कारखान्यावर उतरलो. त्या वेळी रात्रीचे नऊ वाजले होते. तिथून आमचे गाव जवळ असले, तरी एकट्याने किर्र अंधारात पायी जायचे म्हणून जरा घाबरलोच होतो. जवळपास तीन-चार किलोमीटर अंतर तुडवत मी रात्री घरी पोहोचलो. त्या दिवशी होळीचा सण होता.

होळीनंतर मी पुन्हा औरंगाबादला गेलो. ट्रॅक्टरची डिलिव्हरी घेतली. आमच्या घरात तोपर्यंत एकच वाहन होते, ते म्हणजे सायकल. त्यानंतर आता थेट ट्रॅक्टरच आमच्या दारात येणार होता. मला खूप उत्सुकता लागली होती. कंपनीने ट्रॅक्टर घरी पोहचता करण्यासाठी त्यांच्याकडचा एक ड्रायव्हर दिला. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि इतर साहित्य घेऊन आमचा औरंगाबादहून प्रवास सुरू झाला. मी मुद्दाम ड्रायव्हरशेजारील टपावर बसलो होतो. हेतू हा की, ड्रायव्हर ट्रॅक्टर कसा चालवतो हे जवळून पाहायचे. कारण पुढे ट्रॅक्टर आम्हालाच चालवावा लागणार होता. आम्ही संध्याकाळी आमच्या गावात पोहोचलो. घरी ट्रॅक्टरची यथासांग पूजा करण्यात आली. सगळ्यांनाच मोठा आनंद झाला होता. ट्रॅक्टर आणल्यावर आम्हाला तो शिकायचा होता, त्याचे काम कसे चालते हे पाहायचे होते. यासाठी आम्ही ड्रायव्हरला दुसऱ्या दिवशी थांबवून घेतले. त्याने त्या दिवशी आम्हाला शेतातच नांगरणी करून दाखविली. तांत्रिक गोष्टींची माहिती दिली. तिसऱ्या दिवशी तो निघाला. मी व भाऊ ट्रॅक्टर घेऊनच त्याला सोडायला कडा कारखान्याजवळील हायवेपर्यंत गेलो. जाताना आम्हाला ट्रॅक्टर न्यायचा असल्याने त्याच्याकडून तो वळवून लावून घेतला. तो गेला व आम्ही ट्रॅक्टर चालवत घरी आणला आमवतात नांगरणीचे काम केले. ट्रॅक्टरवर माझा हातही चांगला बसला होता.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!