१७. कोणते लोक सोबत घ्यावे?

१७. कोणते लोक सोबत घ्यावे?

५) विश्वास किंवा श्रद्धा-

belief, faith शिवबा राजे असे विश्वासाने काम करणारे तुम्हाला श्रद्धास्थानी मानून काम करणारे लोक हेच जगातील सर्वात उत्कट ध्येयासाठी काम करणारे लोक होत हे लक्षात ठेवा. अशी माणसे लाखात एक असतात आणि ती शोधून सापडली तरी नशीबच समजावे. ही लोक जशी श्रद्धावान असतात तशीच ती विश्वासाला पात्र देखील असतात. आपल्या राजावर अनन्य श्रद्धा ठेवून आपल्या राजाच्या ध्येयावर अनन्य विश्वास ठेवून काम करणारे लोक तर स्वराज्याचे खरे शिलेदार, स्वराज्याचे खरे मानकरी आणि स्वराज्याचे खरे आधारस्तंभच.

हे लोक कधीही पैशासाठी, वतनासाठी, स्वार्थासाठी काम करणार नाहीत. ते काम करतील तर आपल्या स्वराज्य या ध्येयापोटी. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. या म्हणीप्रमाणे हे लोक आपल्या राजाला प्राणापलीकडे जपणारे असतात. अशा लोकांसाठी आपला जीव ओवाळून टाकला तरी कमीच. दूरदृष्टी ठेवून, स्वतःच्या जबाबदारी ओळखून राजावर आलेला प्रसंग पाहून हे लोक बिकटात बिकट प्रसंगात देखील काम करत आपले राज्य आणि राजा या दोघांचेही प्राणपणाने रक्षण करतात.

शिवबाराजे अशी माणसे निर्माण करणं हीच आपली प्राथमिकता ठेवा. अशी पाणसं जिथे असतील तिथून शोधून स्वराज्यात आणा. आणि अशी माणसं आता शत्रूच्या गोटात, फौजेत असली तरी त्यांना कौल द्या, त्यांना निमंत्रण द्या. त्यांना आपल्या बाजूने वळवा. कारण ही लोकं ध्येयासाठी, उदाल ध्येयासाठी, जगण्यासाठी आणि त्या ध्येयापोटीच मरण्यासाठी जन्माला आलेली असतात, पर्याय नसल्यामुळे ती आतापर्यंत इतरांकडे पोटासाठी काम करीत असतील त्यांना संपर्कात घ्या आणि एकदाचे आपलेसे करा. ते परत कधीही सोडून जाणार नाहीत. अशा माणसांना एकदा का ध्येयवादी माणूस, राजा मिळाला की मग ते आयुष्यभर त्याची साथ सोडणार नाहीत. ध्येयावर, आदर्शावर काम करणारी असली माणसं हीच तर स्वराज्याची खरी दौलत. शिवाजी महाराजांनी १२ मावळच्या मुलुखात फिरताना सगळीकडे अशा माणसांचा शोध घेतला. जीवाला जीव देणारी आणि प्रसंग पडला तर स्वराज्यासाठी जीव देणारी आणि शत्रूचा जीव घेणारी माणसे शोधून काढली. त्यांना प्रेमानं जपलं, ध्येयानं प्रेरित केलं आणि स्वराज्याच्या कामी तयार केलं. अगदी कमी कालावधीत स्वराज्य वाढले, विस्तार पावले ते महाराजांच्या या गुणग्राहकतेमुळे आणि रत्नपारखी नजरेमुळे.

लक्षात ठेवा तुम्हालासुद्धा आयुष्यात आपले ध्येय प्राप्त करायचे असेल तर अशा आपल्या मालकावर आपल्या कंपनीवर विश्वास ठेवणारी, श्रद्धावान आणि ध्येयासाठी लढणारी माणसं गोळा करावी लागतील ती जपावी लागतील, बाढवावी लागतील. अशी ध्येयासाठी जगणारी आणि दूरदृष्टी ठेवणारी माणसं ज्याला मिळाली तोच खरा श्रीमंत आणि भाग्यवान माणूस म्हणावा. लोकांकडून काम करून घेणं ही जगातील एक सर्वात अवघड अशी कला. परंतु जेव्हा अशी ध्येयवादी माणसं आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपणासाठी ध्येयप्राप्ती ही सहज होणे शक्य होते. जगातील सर्वात अमूल्य संपत्ती म्हणजे माणसं आणि अशी ध्येयबादी माणसं जर त्याहून अधिक अमुल्य आणि तेवढीच महत्त्वाची देखील. तेव्हा जिकडे जाल तिकडे अशा माणसांचा शोध घ्या. तुमच्या उत्कर्षाचा हाच एक पाया आहे. चांगली माणसं शोधा, ती जोडा, ती जपा आणि ध्येयप्राप्ती करा.
जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे काम करत महाराजांनी अशी अनेक नररत्ने गोळा केली. काही स्वराज्यातून तर काही शत्रूच्या गोटातून देखील. जो कोणी चांगला माणूस महाराजांच्या संपर्कात येई महाराज त्याला कायमचे आपले करून घेत. मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे ही दोन माणसे महाराजांच्या विरोधात आपल्या मालकासाठी लढत होती. महाराजांनी त्यांना कौल दिला त्यांना स्वराज्यात येण्याचे महत्त्व सांगितले, ते स्वराज्यात आले आणि पुढचा इतिहास घडला. अशी गुणग्राहकता आपणही ठेवा आणि माणसं गोळा करा आणि इतिहास घडवा. १०० ध्येयहीन माणसं गोळा करण्यापेक्षा एक ध्येयवादी माणूस गोळा करा तो तुमच्या कामाला येईल. बाजारबुणगे आणि टंगळमंगळ लोकांना आपल्या आयुष्यात काही स्थान देऊ नका. संगत माणसाला घडविते तशी ही ध्येयवादी माणसं एका ध्येयासाठी माणसाच्या संपर्कात आली की दोघांच्याही आयुष्याचे सोने होते. महाराजांच्या आयुष्यात असा एक माणूस आला की जो सलग ३० वर्षे पायदळाचा सेनापती राहीला आणि त्यांचे नाव येसाजी कंक. १६५९ ते १६८९ अशी तीस वर्षे ते सेनापती होते. राजगडाच्या पायथ्याला भुतोंडे नावाच्या गावचा हा माणूस. तीस वर्षात वीस वेळा देखील घरी गेला नसेल, एवढ्या जवळ घर असून वर्षानुवर्षे घरी न गेलेली ही माणसे किती ध्येयवादी असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी.

शिवाय ही माणसं तेवढीच प्रामाणिक देखील होती. गोवळकोंडा दरबारात जेव्हा कुतुबशहाला महाराज म्हणाले की माझे सर्व मावळे हत्तीच्या ताकदीचे आहेत तेव्हा कुतुबशहाने परीक्षा घेतली. महाराजांनी वय वर्षे १४ ते ४० या गटातील १० मावळे समोर उभे केले आणि सांगितले यातील कोणीही पराक्रम करून दाखवेल. तेव्हा कुतुबशहाने ४० वर्षे वयाच्या माणसाकडे इशारा केला आणि हत्ती मारायला सांगितला. हिच ती व्यक्ती येसाजी कंक.

हत्ती तर मारला गेला मग काय कुतुबशहाला खात्री पटली आणि त्याने येसाजीचा सत्कार करायचे ठरविले, इनाम म्हणून ५ गावची जहागीर देऊ केली. तेव्हा ईमानी येसाजीने सांगितले मला इनाम देणारे आपण कोण? माझा सन्मान करण्यासाठी माझा राजा सक्षम आहे. मी हत्ती मारला तो माझ्या धन्याचा मान राखला जावा म्हणून आणि तेही धन्याच्या आदेशानुसार, तेव्हा मला माफ करा मला तुमचे बक्षीस इनाम घेता येणार नाही. मला जे काही बक्षीस द्यायचे ते माझा राजा देईल. असली श्रद्धावान, इमानदार माणसं महाराजांनी काही हजारात जोडली. आपण शेकडो तरी जमा करायचा प्रयत्न करूया.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

error: Content is protected !!