१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा
४) कार्यपुर्तता – Completition of work
शिवबाराजे यशस्वी लोकांची आणखी एक चांगली महत्त्वपूर्ण सवय म्हणजे कार्यपूर्तता. हाती घेतलेलं काम ते पूर्णच करतात. यशस्वी होणारे लोक कामाच्या बाबतीत धरसोड करत नाहीत. ते जे काम हाती घेतात ते पूर्णच करतात. मध्ये किती अडचणी आल्या किंवा किती अडथळे आले तरी ते काम मध्येच सोडून देत नाहीत. हे काम अवघड वाटते असे म्हणून ते काम सोडून दुसरे सोपे काम हाती घेणे हा त्यांचा स्वभावच नसतो. यशस्वी होणारे लोक अवघड कामांनाच हात घालतात आणि पूर्णच करतात. सोपे काम हाती घेऊन ते पूर्ण करणाराला यशस्वी कसे म्हणता येईल. सामान्य काम हाती घेणाराला सामान्यच यश मिळते आणि तो सामान्य माणसातच मोजला जातो. याउलट असामान्य माणसं, जगावेगळी माणसं, जगावेगळं धाडसी काम हाती घेतात आणि ते अशक्य कोटीतील काम पूर्ण करून ते असमान्य असे यश देखील मिळवतात.
तेव्हा अवघड काम हाती घेणं आणि ते पूर्णच करणे हीच तर यशस्वी माणसांची खरी ओळख असते आणि याच गोष्टीची ते स्वतःला सवय लावून घेतात. राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणेच शिवाजी महाराजांनी अशक्य कोटीतील स्वराज्य निर्मिती हे काम हाती घेतले आणि ते पूर्णच करून दाखवले. याच पद्धतीने अनेक मावळ्यांनी अशाच नियमाला अनुसरून अनेक अशक्य कामे हाती घेतली आणि ती पार पाडली. तुम्हाला आयुष्यात यशस्वी माणूस म्हणून उदयाला यायचे आहे का? मग हाती घेतलेलं काम कोणतीही किंमत मोजून पूर्ण करायचंच ही सवय स्वतःला आजपासून लावून घ्यायचीच
हे लक्षात ठेवा.
मोठी कामे, अशक्य कामे, अवघड कामे, धोकादायक कामे हाती घ्यायची आणि ती पूर्णच करायची. जगाच्या कपाळावर यशाचा आपला इतिहास कोरायचा आणि अमर व्हायचे. फक्त एकच सवय स्वतःला लावायची आणि ती म्हणजे हाती घेतलेलं काम पूर्णच करायचं
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv
