१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

७) कृती करण्याची कटिबद्धता :-

शिवबाराजे यशस्वी होणाऱ्या लोकांमध्ये असणारी ही सर्वात महत्त्वाची आणि शेवटची सवय म्हणजे कृती करण्याची कटिबद्धता. यशस्वी होणारे लोक दृढनिश्चयी असतात. आणि संकटे आली, अडचणी आल्या म्हणून हाती घेतलेले कोणतेही काम मध्येच सोडून देत नाहीत. यशस्वी माणसे आणि अपयशी माणसे यांच्यात हाच एक फरक असतो की अपयशी माणसे एखादे काम अडचण आली की ते काम अर्धवट सोडून निघून जातात. परंतु यशस्वी होणारी माणसे काम करण्याच्या बाबतीत कटिबद्ध असतात. दृढनिश्चयी असतात. ते परिस्थितीसमोर हात जोडत नाहीत किंवा संकट आले म्हणून गुडघे देखील टेकत नाहीत. हाती घेतलेले काम कितीही कष्ट पडले, कितीही संकटे आली किंवा कितीही अडचणी आल्या तरी ते अर्धवट सोडून देत नाहीत. यशस्वी होणारी लोकं सर्वस्व पणाला लावतात पण ते काम काही केल्या अर्धवट सोडत नाहीत.

कृती करण्याची कटिबद्धता म्हणतात ती यालाच. राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे अवघड, अशक्य काम तर हाती घेतलेच परंतु अनेक वेळा अवघड, जीवघेणे प्रसंग आले म्हणून कधी अर्ध्यावरच आपले स्वराज्य निर्मितीचे ध्येय सोडून दिले नाही. ध्येयवादी माणसेच हे करू शकतात. ध्येयवादी माणसं केवळ स्वप्नं पहात नाहीत तर ती सर्व प्रसंगांना पुरुन उरून ती स्वप्न पूर्ण देखील करतात. तसेच ती आपले ध्येय देखील आपल्या आयुष्याचा जगण्याचा ध्यास बनवून ते अविरत ते ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणारी कृती करत असतात. जी कामे ध्येयपूर्तीकडे नेत नाहीत ती कामे यशस्वी माणसे कधी करत नाहीत. आणि जी कामे ध्येयपूर्तीकडे जातात ती कामे केल्याशिवाय यशस्वी माणसे राहत नाहीत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

 

error: Content is protected !!