१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

५. रोजच्या रोज व्यायाम आणि योग्य आहार घेणे :-

राजे आपण प्रत्येक दिवशी प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करून देणारी पाचवी शिस्त म्हणजे आपण रोजच्या रोज व्यायाम करणं आणि योग्य आहार घेणं. शेवटी तुम्ही खूप यशस्वी झालात पण ते होण्यासाठी जर तुम्ही आरोग्याची मोठी किंमत मोजली असेल तर त्या यशाचा काय उपयोग. इकडे कमावले आणि तिकडे गमावले असा त्याचा अर्थ. मग प्रगती ती काय झाली ? जर आपण काही न गमावता जर काही कमावले तर त्याला म्हणतात प्रगती. आणि तसे व्हावे असे वाटत असेल तर व्यायाम आणि आरोग्य, योग्य आहार आणि विहार याची काळजी घेतलीच पाहिजे. आरोग्यापेक्षा जगात दुसरी कोणती मोठी संपत्ती आणि प्रगती असू शकत नाही. जगाचे राज्य एका
बाजूला आणि आपले आरोग्य एका बाजूला असे निवड करण्याची वेळ आली तरी आपण आरोग्याचीच निवड केली पाहिजे. कारण आरोग्य नसेल तर मग आपण त्या जिंकलेल्या कमावलेल्या राज्याचा उपभोग तरी कसा घेणार? म्हणून चांगले आरोग्य हिच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तेव्हा आरोग्याला सर्वात प्रथम प्राधान्य द्या. चांगले निरोगी शरीर राहावे याला दोनच मार्ग असतात.

१) योग्य आहार

२) योग्य व्यायाम

योग्य आहार म्हणजे काय तर शरीराला जे पोषक आणि आरोग्यवर्धक असतील असेच पदार्थ खाणे. चांगले प्रोटीन, जीवनसत्व असणारा सकस आणि पोषक आहाराची आणखी एक चांगली व्याख्या म्हणजे जे तुमच्या प्रदेशात वातावरणात नैसर्गिक पद्धतीने पिकते अशी अन्नधान्ये आणि फळे. निसर्गाने त्या त्या प्रदेशातील लोकांच्या आरोग्यासाठी चांगली असणारी अन्नधान्य आणि फळे तयार केलेली असतात त्याचेच सेवन करावे. भरपूर पाणी प्यावे आणि शांत जीवन जगावे.

योग्य आहाराची एक दुसरी व्याख्या म्हणजे कोणतेही व्यसन करू नये. जे जे शरीराला अपायकारक ते ते व्यर्ज करावे. निर्व्यसनी राहणे हा सुद्धा एक चांगल्या आरोग्याचा राजमार्गच आहे. व्यसनामुळे माणसाचे प्रथम आरोग्य धोक्यात येते आणि मग यशदेखील. एकतर आरोग्यामुळे यशस्वी होता येत नाही आणि झाले तरी मग या व्यसनांचा जेव्हा प्रादुर्भाव जाणवतो तेव्हा मिळालेले यश उपभोगता न आल्यामुळे त्याची किंमत शून्य होते.

तेव्हा प्रगती करू इच्छीणाऱ्या माणसांनी प्रथम योग्य आहार घ्यावा आणि दुसरे म्हणजे निर्व्यसनी राहावे. अगदी मांसाहार देखील वर्ज्य करावा. मानवी शरीर मांसाहारासाठी बनलेले नाही तरी काही लोक हौस म्हणून कधी सोय म्हणून तर कधी संधी म्हणून तर कधी उत्सव म्हणून खाण्याची वेगवेगळी कारणे शोधून ते खात असतात. राजे तुम्ही आयुष्यात या तिन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. योग्य आहार, व्यसनमुक्त जीवन आणि वर्ज्य मांसाहार राजमाता
जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराज आयुष्यभर योग्य आहार घेणे निर्व्यसनी राहणे आणि शाकाहारी राहणे या तिन्ही शिस्तींचे पालन करतात. शिवाजी महाराजांच्या मोठ्या यशामागे या तिन्ही गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. शिवाजी महाराजांच्या यशस्वी जीवन आणि चारित्र्यसंपन्न कारकिर्द यामागे असलेल्या या तीन गोष्टी आपण नव्याने नीट समजून घेऊन आचरणात आणाव्या लागतील.

शिवाजी महाराजांच्या सैन्याचा मोठा भाग हा वारकरी संप्रदायातून तयार होऊन येई. धारकरी होणारा व्यक्ती अगोदर वारकरी झाला पाहिजे आणि यातूनच चारित्र्यवान, निर्व्यसनी सैनिक ही परंपरा पुढे आली. तुकोबांचे वारकरीच प्रबोधन झाले की पुढे स्वराज्याचे धारकरी होत असत. वारकरी संप्रदायाचा अशा प्रकारे स्वराज्य निर्मितीत सिंहाचा वाटा आहे असे म्हणता येईल. याची आठवण म्हणूनच महाराजांनी आपल्या सैन्याचा गणवेश पांढऱ्या रंगाचा ठेवला. निर्व्यसनी आणि चारित्र्यवान युवक हेच स्वराज्याचे सैन्य आणि निष्कलंक वाटचाल हिच स्वराज्य निर्मितीचे ध्येय आणि ते शक्य होते केवळ योग्य आहार आणि निर्व्यसनी, शाकाहार जीवनपद्धतीमुळेच.

तर आता प्रगतीसाठी लागणारी दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे योग्य व्यायाम. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा किंवा ५ किलोमीटर वेगाने चाला. यापैकी एकतरी गोष्ट करा आणि जमले तर दोन्हीही करा. पण कोणत्याही परिस्थितीत कोणतेही कारण देऊन व्यायाम करायला टाळाटाळ करू नका. असे केल्यास तुमच्या आरोग्याला आणि पर्यायाने भाग्यालाच टाळा लागू शकतो. तेव्हा योग्य आहार आणि योग्य व्यायाम हाच यशाचा पाया आहे हे लक्षात ठेवा.

राजमाता जिजाऊंच्या या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळेच महाराजांनी आपल्या दिनचर्येत किमान एक तास व्यायामासाठी राखीव ठेवला आणि कायम आरोग्यदायी जीवन जगण्याची शिस्त पाळली. याचा परिणाम आणि पुरावा म्हणजे पन्हाळा ते विशाळगड हा सत्तर किलोमीटरचा प्रवास करणारे ६०० मावळे आणि सोबतचे शिवाजी महाराज. अफजलखानाला वन टू वन
भेट देऊन त्याचा वन टू का फोर करणारे शिवाजी महाराज. आग्रा ते राजगड असा सलग प्रवास घोड्यावरून करणारे शिवाजी महाराज ही उदाहरणे महाराजांच्या निरोगी जीवनशैलीचा परिणाम होय. महाराजांनी स्वतःला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या तयार केल्याचा हा पुरावा होय. म्हणूनच यशस्वी होऊ इच्छीणाऱ्या दररोज प्रगती करू पाहणाऱ्या प्रत्येकाने ही शिस्त पाळायचीच की आठवड्यातील किमान पाच दिवस कोणतीही सबब न सांगता अर्धा तास तरी व्यायाम हा करायचाच आणि यशाचा उपभोग घेण्यासाठी निरोगी शरीर कमवायचे. “शरीरं आद्य खलु साधनम्” असे म्हणतात ते उगाच नाही. जगातील सर्व यशाचे मूळ हे निरोगी शरीर असते तेव्हा आरोग्याची सर्वात जास्त काळजी घ्या म्हणजे यशाची काळजी करत बसावे लागणार नाही. तेव्हा व्यायामाची तडजोड करू नका. नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल आणि भविष्य अंधःकारमय होईल. उज्वल यशाचा पाया म्हणजेच आरोग्य ते जपा आणि आपण दररोज व्यायाम करत आहोत की नाही याची खात्री करा. आपली प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण योग्य आहार आणि योग्य व्यायाम करत आहोत याची आपणाला खात्री देता येईल. आपल्या दररोजच्या प्रगतीचा हा एक मानदंडच आहे. तेव्हा तो जरूर जपा, तपासा आणि कायम ठेवा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!