व्यवसायाचे बीजारोपण

व्यवसायाचे बीजारोपण

ये भी दिन जायेंगे

मला चतुर बिरबलाची एक गोष्ट आठवली. ये भी दिन जायेंगे. अकबराच्या दरबारात नऊ रत्न होती. त्यामध्ये बिरबल एक होता. तो फारच चतुर, हुशार व चलाख होता, त्यामुळे अकबराचा लाडका होता. बाकीचे दरबारी त्याचा मत्सर करीत, द्वेष करीत, त्याला सतत पाण्यात पाहत. अकबर बादशहाला एकदा हुक्की आली व त्याने बिरबलाची परीक्षा घेण्याचे ठरविले, त्याने बिरबलाला बोलावून घेतले व विचारले, “तू स्वतःला जास्त हुशार समजतोस का?” बिरबल म्हणाला, “तसं काही नाही, महाराज.” त्यावर अकबर म्हणाला, “नाही काय, बरेच लोक म्हणतात बिरबल अतिशय हुशार व चलाख आहे.” बिरबल गडबडून गेला. काय बोलावे, हे त्याला कळेना. अकबर महणाला, “मी तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे. मी तुला एक प्रश्न विचारेन. त्याचं योग्य उत्तर मिळालं, तर ठीक, नसता तुझं शिर व माझी तलवार।” दरबारी खूश झाले. त्यांना वाटले, आता बिरबल बरोबर कचाट्यात सापडला, अकबराने प्रश्न विचारला, “बिरबला, माणसाने जीवनात नेहमी यशस्वी होण्यासाठी व यशस्वी राहण्यासाठी काय केलं पाहिजे?” बिरबलाने प्रश्न ऐकला व उत्तर दिले, “महाराज, तुम्ही महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्‌गीता वाचा, तुम्हाला उत्तर मिळेल.” यावर अकबर संतापला, “तू मला वाचायला सांगतोस? मी राजा आहे. मला तुझ्याकडूनच उत्तर हवं आहे व तेही एका वाक्यात. त्यावर बिरबल म्हणाला, “महाराज, मला थोडा वेळ द्या, मी उत्तर देतो.” अकबराने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी दोन प्रहरपर्यंतचा वेळ दिला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. बिरबलाचा द्वेष करणारे आनंदी झाले, आता बिरबलाची खैर नाही, असेच त्यांना वाटू लागले. इकडे बिरबल चिंताग्रस्त झाला. एका वाक्यात या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे? बरे, ते उत्तरही सगळ्यांना पटले पाहिजे, नाही तर आपले शिर धडावेगळे होण्याची वेळ, बिरबलाने अनेक धार्मिक ग्रंथ चाळायला सुरुवात केली. अख्खी रात्र तो उत्तर शोधत होता. अचानक पहाटे पहाटे त्याला काही तरी गवसले. तो पहाटेच ओरडत सुटला, “मिल गया, मिल गया.” त्याची बायको दचकून जागी झाली. तिने विचारले, “क्या मिल गया?” बिरबलाने सांगितले, “बादशहाके सवाल का जवाब मिल गया. अब मैं वो जवाब दरबारमेंही बताऊंगा.” ठरलेल्या वेळेनुसार बिरवल दरबारात पोहचला. खूप गर्दी झाली होती. अनेक जण बिरबलाची फटफजिती पाहण्याच्या अपेक्षेने आले होते. अकबर दरबारात आला व त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला, “बोल, बिरबल, सफलता का राज क्या है?” त्यावर बिरबलाने अतिशय नम्रपणे उत्तर दिले, “प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना एक वाक्य नेहमी बोलायचं ते म्हणजे, ये भी दिन जायेंगे.”

अकबराला काही कळले नाही. त्याने विचारले, “नेमकं काय? ‘हेही दिवस निघून जातील.’ जे आज गरीब, दुःखी आहेत, त्यांच्यासाठी हे ठीक आहे. पण जे मुळातच श्रीमंत आहेत, आनंदी आहेत. त्यांचं काय? त्यांना हे वाक्य कसं लागू होतं?” बिरबल म्हणाला, “सर्वांसाठीच हे वाक्य आहे, तुम्हीही म्हटलं पाहिजे.” हे ऐकून अकबर कडाडला, “मूर्खा, मी जर असं बोललो की, ये भी दिन जायेंगे, याचा अर्थ काय होईल? मी राजाचा रंक होईन, अशीच तुझी इच्छा आहे का?” त्याने संतापून सेवकांना तलवार आणायला सांगितली, त्यावर बिरबलाने सविस्तर उत्तर दिले, “महाराज, हे वाक्य गरिबांसाठी, दुःखी, पीडितांसाठी जितके महत्त्वाचं आहे, तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त श्रीमंत, आनंदी, राजे लोकांसाठी महत्त्वाचे आहे. हे यासाठी की, माणूस गरिबीतून श्रीमंत होतो. जेव्हा त्याच्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती, पद येते, तेव्हा अशा लोकांचा भेजा (मेंदू) डोक्यातून गुडघ्यात येतो. म्हणजे पदाचा, सत्तेचा, पैशाचा माज येतो व त्या नादात तो अनेक चुका करू लागतो. गरिबांवर अन्याय करतो. त्यामुळं कालांतराने त्याच्याकडील वैभव जातं व तो परत गरीब, दुःखी होतो. हे होऊ द्यायचं नसेल, तर प्रत्येकाने रोज सकाळी व रात्री ‘यह भी दिन जायेंगे नहीं तो जा सकते हैं’ असं म्हणावं, असं म्हटल्यास श्रीमंत सत्तापर्द असतानाही गरिबांवर अन्याय करण्यास धजावणार नाही, नीतीने राहील. महाराज, तुम्हीही हे वाक्य रोज बोललात, तर तुमच्याकडूनही प्रजेवर कधी अन्याय, अत्याचार होणार नाही. त्यामुळे तुम्ही कायम महाराजच राहाल.” या उत्तराने अकबर बादशहा खूश झाला. त्याने मोत्याची माळ काढून बिरबलाला बक्षीस म्हणून दिली. बिरबलाचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. सगळ्या दरबाऱ्यांनी ते मान्य केले, मला ही गोष्ट खूप आवडते. त्यामुळे मी जेव्हा रुबाबात विमानात बसणाऱ्या लोकांकडे पाहत होतो, तेव्हा मीही मनोमन ठरविले, ‘ये भी दिन जायेंगे.’ मीसुद्धा एक दिवस विमानातून प्रवास करणार. यासाठी मग कितीही कष्ट करावे लागले, तरी चालतील. मी एक दिवस यशस्वी बनणारच. त्यासाठी अफाट मेहनत घेईन, पैसे कमावेन आणि कुटुंबासह विमानात बसून हवाई सफर करीन.

अशा प्रकारे माझ्यात जास्त यशस्वी होण्याची एक इच्छा प्रबळ झाली. ‘इच्छा असेल, तिथे मार्ग दिसेल’ अशीही एक म्हण आहे. माझ्यात जी जिद्द तयार झाली, त्यानुसार भाग्याचे दान पडू लागले. बऱ्याच वेळा अशी गोष्ट होत असते. आपण एखाद्या गोष्टीचा मनातून ध्यास घेतो. फक्त त्याचाच विचार करतो. कालांतराने तशीच गोष्ट आपल्या जीवनात घडू शकते. यासाठी मी नेहमी सांगतो सकारात्मक विचार केला पाहिजे. स्वतःबद्दल, स्वतःच्या भविष्याबद्दल कायम चांगल्या गोष्टी नजरेसमोर आणल्या पाहिजेत. एकदा आपण असा विचार करू लागलो की आजूबाजूची परिस्थितीही तशी बदलते व आपले स्वप्न प्रत्त्यक्षात उतरते. अर्थात ही काही चमत्कारासारखी गोष्ट नाही. स्वप्न पूर्ण करताना त्याला कष्टाची, मेहनतीचीही जोड द्यावीच लागते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!