व्यवसायाचे बीजारोपण

व्यवसायाचे बीजारोपण

माझे पहिले ग्राहक… “भीक मागायचा धंदा कोणी केला होता का?”

सुरुवातीला मी ‘ए’ वर्गातील यादीकडे वळालो. त्यातही चांगला श्रीगणेशा करण्यासाठी एक व्यक्ती निवडली. ते होते माझ्या वडिलांचे मावसभाऊ स. ना. पोकळे. त्यांना मी ‘काका’ म्हणायचो. माझ्यासाठी ते अनेक बाबतीत आदर्श होते. ते औरंगाबादमध्येच एका मोठ्या कॉलेजचे प्राचार्य होते. माझ्या शिक्षणावेळी त्यांनी मला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले होते. त्यामुळे मी असा बिझनेस सुरू करतो म्हटल्यावर ते मला प्रोत्साहन देतील असेच मला वाटत होते. किंबहुना तसा मला विश्वास होता. त्यांच्या घरात तिघेच होते. त्यांच्या पत्नीही एका शाळेत मुख्याध्यापिका होत्या. मुलगा त्यांच्याच कॉलेजात प्राध्यापक होता. चांगले सुखवस्तू, खातेपिते घर होते. मला ते हक्काचे वाटत होते. परीक्षेत आपण जसे प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सोप्या प्रश्नापासून सुरुवात करतो, तसेच मी पहिले ग्राहक म्हणून काकांपासून सुरुवात करायचे ठरविले.

रविवारचा दिवस पाहून मी त्यांच्या घरी गेलो. काका पेपर वाचत होते. मला पाहताच त्यांना नेहमीप्रमाणे आनंद झाला. मी ‘नको’ म्हणत असतानाही माझ्यासाठी चहापोहे करायला लावले. त्यांनी आपुलकीने बँकेची, माझ्या नोकरीची, संसाराची चौकशी केली. गावाकडे काय चालले आहे, ते विचारले. दादा (माझे वडील) काय करतायत, भावांचे काय चाललेय अशी सगळी चौकशी केली. सगळे झाल्यावर मी त्यांना म्हणालो, “मी तुमच्याकडे एका कामासाठी आलोय. मी एका अशा अशा कंपनीचा एजंट झालो आहे. कंपनी खूप चांगली आहे, खात्रीशीर आहे. मी सगळा अभ्यास केला आहे.” असे सांगून मी त्यांना फायलीमधील एक एक कागद दाखवत होतो. ते सगळ्याला ‘छान, छान’ असे म्हणत असल्याने माझाही उत्साह वाढला होता. माझ्या सिनियरने शिकविल्याप्रमाणे मी सर्व गोष्टी त्यांच्यापुढे मांडत होतो. तवा गरम असेल, तर लगेच पोळी भाजून घ्यायची, हे आमच्या मीटिंगमध्ये आम्हाला नेहमीच शिकविले जायचे. काकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मीसुद्धा हीच ती वेळ असे मानून काकांचा होकार मिळालाच, असे समजत होतो. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. एका झटक्यात माझा कोटा पूर्ण होणार, असा विश्वास मनात तयार झाला, समळे बोलणे झाल्यावर मी काकांना म्हणालो, “तुमचा एक फॉर्म भरतो, चालेल ना?” आता त्यांचा एक होकार आणि माझ्या बिझनेसचा ‘श्रीगणेशा’ तो होकार ऐकण्यासाठी मी सावरून बसलो. तोच काका म्हणाले, “तू फॉर्म भरायचा तर भर, पण मला एक सांग की, आपल्या खानदानीत कोणी कधी भीक मागायचा धंदा केला का?” मी चक्रावून गेलो, पण त्यांना म्हणालो नाही, “असं कोणी केलं नाही.” ते चटकन म्हणाले, “मग तुला असला भिकारचोट धंदा करायला कोणी सांगितलं?” मी खजिल झालो, “भिकारचोट म्हणजे काय?” ते म्हणाले, “भिकारचोट नाही तर काय आहे? आज माझ्या दारात, उद्या आणखी कोणाच्या दारात. प्रत्येकाला विचारायचं, पॉलिसी घेता का? अरे, मला तुझा खूप अभिमान वाटत होता.

आपल्या पाटलांच्या पोरांची मजल जास्तीत जास्त डी. सी. सी. (जिल्हा बँक) बँकेपर्यंत, तू जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेट बँकेत नोकरीला लागलास. तुझ्या आजोबांचं नाव किती मोठं आहे. वडिलांचं नाव मोठं आणि तू असला धंदा करतोस. मला वाटलं, उद्या बँकेत मोठा मॅनेजर होशील, धुमाळ खानदानाचं नाव रोशन करशील. तू तर घराण्याच्या नावालाच कलंक लावायला निघालास. असला धंदा करण्यापेक्षा कपभर पाण्यात जीव का दिला नाहीस?” एकामागून एक काकांचे तोफगोळे चालू होते. हे सगळे ऐकून माझा थरकाप उडाला. मी काय स्वप्ने रंगवून आलो होतो आणि हे काय होऊन बसले? मी भीत भीतच काकांना म्हणालो, “काका, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला, खानदानीला कलंक लागला. तुमच्या पाया पडतो, मी पुन्हा असला धंदा करणार नाही.” काका म्हणाले, “असं शहाण्यासारखं बोल ना.” आता त्यांना पॉलिसी द्यावी लागणार नसल्याने त्यांनीही मला लगेच सावरून घेतले. विमनस्क अवस्थेत मी घरी आलो. घरी पाहतो, तर माझे व्यवसायातील सिनियर मामेसासरे घरीच आलेले होते. मी त्यांना कंपनीची फाईल, फोल्डर दिले. म्हणालो, “बरं झालं तुम्हीच आलात. तुमची फाईल परत घ्या, मी असला भिकारचोट धंदा अजिबात करणार नाही.” मी त्यांना काकांशी झालेलं बोलणे सगळे सांगितले. पुन्हा या धंद्याचे नाव नको, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यांनी माझे सगळे शांतपणे ऐकून घेतले. ते मला म्हणाले, “जाऊ द्या सगळं, नका करू व्यवसाय, आपण पिक्चर पाहायला जाऊ.”

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!