२०. १००० पटीने विकास करा

२०. १००० पटीने विकास करा

४) वेळेचा सर्वात छान उपयोग करण्यासाठी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

शिवबाराजे आपणाला एक हजार पटीत प्रगती करायला लावणारी ही चौथी पायरी होय. जर आपणाला एक हजार पटीत प्रगती करायची इच्छा असेल तसे ध्येय ठरले असले तर मग आपण वेळेचा दुरुपयोग करून ते कसे शक्य होईल, तेव्हा आपणाकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेचा सर्वात चांगला उपयोग करणे हीच तर आपली सर्वात मोठी जबाबदारी होय.

वेळेचा सर्वात छान उपयोग करायचा म्हणजे काय तर आपण आपल्या कामावर कायम आपले लक्ष केंद्रित करणं. आपण आजच्या दिवसासाठी जी ध्येय ठरविली आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणती महत्त्वाची कामे करावी लागतील याची यादी बनवा आणि मग त्याच महत्त्वाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित करा. म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या कामांवर लक्ष द्या. नको ती कामे डोक्यावर घेऊ नका आणि नको त्यांची कामेही करत बसू नका. आपले संपूर्ण लक्ष आपल्या महत्वाच्या कामांवर असू द्या. लक्षात ठेवा वेळ हीच जगातील सर्वात अमूल्य अशी संपत्ती आहे. आणि वेळ ही वाढवता देखील येत नाही. आणि साठवता सुद्धा येत नाही. अशा प्रसंगात एकच गोष्ट शक्य आहे आणि ती म्हणजे या वेळेचा पर्यायी उपयोग करा. एकावेळी एकच काम करणे शक्य आहे मग ते काम महत्त्वाचेच करा. उगाचच इतर कमी महत्त्वाची किंवा बिनकामाची, बिनउपयोगाची व्यर्थ निरर्थक कामे का करत बसायचे? वेळेचा सर्वात छान उपयोग आपण केला किंवा करत आहोत असे म्हणायला तेव्हाच जागा असेल जेव्हा आपण त्या वेळेचा उपयोग केवळ आणि केवळ महत्त्वाच्या कामांची पूर्तता करण्यासाठी करू. तेव्हा लक्षात ठेवा वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःला वाया घालवणं, वेळ वाया घालवणं म्हणजे ध्येय मातीत घालवणं, तेव्हा जो वेळ मातीत घालवेल त्याला वेळच मातीत घालवेल, जो वेळ वाया घालवेल त्याला वेळच वाया घालवेल. म्हणून वेळ जपा, वेळ पाळा आणि वेळेचा सर्वात छान उपयोग करण्यासाठी महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा.

राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी आयुष्यात कधीही कुठेही टाईमपास केला नाही. महाराजांनी सतत आपल्या वेळेचा उपयोग स्वराज्य वा ध्येयप्राप्तीसाठी केला. आपणाला वेळेचे हे गणित आणखी नीट समजून घ्यावेसे वाटत असेल तर आमचे “प्राईम टाईम मॅनेजमेंट” हे पुस्तक आवर्जुन वाचा आणि वेळेचा सर्वात चांगला उपयोग कसा करायचा ते नीट समजून घेऊन कृती करा. आपणही एक हजार पटीत प्रगती करू शकतो याचा याची देही याची डोळा अनुभव घ्या.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!