२१. समाजाकडे मागे वळून पहा.
जॉन डी. रॉकफेलर ह्या एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या माणसाची ही गोष्ट आहे. या माणसाने आपल्या करीअरची सुरुवात केवळ ३.७५ डॉलर्स प्रतिआठवडा एवढ्या कमी उत्पन्नातून केली. या अल्पशा पगारातील ५०% पगार ते सामाजिक कार्याला दर महिन्याला दान करायचे. पैसे तसे म्हटले तर थोडेच होते पण त्यामागील भावना खूप मोठी होती. यातून आपणाला समाजाचे काहीतरी भले करता येईल असे त्यांना नेहमी वाटायचे.
त्यांनी आपला कठोर परिश्रमाचा प्रवास तसाच चालू ठेवला आणि वयाच्या ५२ व्या वर्षी ते प्रचंड श्रीमंत बनले आणि त्याचवेळी योगायोगाने ते आजारी देखील पडले. दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी सांगितले आपण जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकता. तेव्हा जॉन रॉकफेलर यांना लगेच सुरुवातीची गरिबीची आणि कष्टमय जीवनाची आठवण झाली. तेव्हा इतकी गरिबी असताना आपण ५०% दान करायचो तेव्हा आपणाला कितीतरी आनंद व्हायचा. आज कामाच्या व्यापात तो आनंदच हरवून गेल्याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी पुढील एकाच वर्षात कमावलेली सर्वच्या सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या कंपनीचे स्टैंडर्ड ऑईल कंपनीमधील अर्धा स्टॉक विकला व जगातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना ते पैसे वाटायला सुरुवात केली. त्यानंतर एक आश्चर्यकारक घटना घडली आणि ती म्हणजे त्यांनी जसे पैसे दान करण्यास सुरूवात केली तसतशी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. ते त्या आजारातून पूर्ण बरे झाले आणि वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत अत्यंत स्वास्थपूर्ण जीवन जगले.
त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे वय वर्षे ५२ ते ९१ या वर्षांमध्ये त्यांनी अब्जावधी डॉलर्स दान केले. मधल्या काळामध्ये स्टैंडर्ड ऑईलच्या त्यांच्याकडे ठेवलेल्या स्टॉकच्या किमती वाढत गेल्या आणि मरणाच्यावेळी त्यांच्याकडे अजूनच जास्त पैसे आले. जेव्हा डॉक्टरांनी ते एकच वर्ष जगणार असे सांगितले होते तेव्हा त्यांच्याकडे जेवढे पैसे होते त्याच्या कितीतरी पटीने अधिक पैसे त्यांच्याकडे आले आणि ते त्यांनी वाटत राहूनही काही कमी झाले नाहीत. हीच ती ताकद असते सामाजिक कार्याला मदत करण्याची, मागे वळून समाजाकडे पाहण्याची. माणसाने मरताना श्रीमंत असण्याची काहीच गरज नसते. त्याने जिवंतपणी त्याची श्रीमंती समाजासाठी वापरली तरच खऱ्या अर्थाने तो श्रीमंत राहतो. आपण मोकळ्या हातांनी येतो आणि मोकळ्या हातांनीच परत जातो. प्रश्न फक्त एवढाच उरतो की आपण जिवंत असताना किती लोकांना किती हाताने मदत करत असतो. आपल्या मृत्यूनंतरही आपले नाव अमर राहील असे काहीतरी समाजासाठी केल्याशिवाय मरणे म्हणजे जीवंतपणीच मरण पत्करणे होय. अमेरिकेच्या प्रगतीत अशा अनेक दानशूर उद्योजकांचा मोठा वाटा आहे. आपल्या भारतात अशाप्रकारे काम करणारे टाटा उद्योग समूह सोडला तर बाकी कोण आहेत?
आज आपल्या समाजाला शिवाजी महाराजांच्या अशा अनुयायांची गरज आहे जे कर्तृत्वातून खूप पैसे कमावतील आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यासाठी दान करू शकतील. आजही आपल्या समाजाला फक्त दोनच गोष्टीसाठी मदतीची गरज आहे आणि ती म्हणजे चांगले शिक्षण आणि चांगली आरोग्य सेवा. तेव्हा या पुस्तकाचा शेवट करताना मला आपणाला हिच विनंती करायची आहे की नवा समाज नवी पिढी घडविण्यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील किमान १०% संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करत चला. प्रत्येकाने आपआपले गाव, आपआपला राहता भाग जरी या कामी निवडला तरी खूप मोठी क्रांती होऊ शकते. तेव्हा गाव तेथे वाचनालय आणि गाव तेथे उत्तम शाळा, उत्तम दवाखाना ही तीनच तत्त्वे जरी आपण पाळली तरी शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य आपण पुढे नेले असे म्हणता येईल. आयुष्याच्या पुर्वार्धात भरपूर पैसे कमवा आणि उत्तरार्धात साठवलेले सर्व पैसे दान करायचे हा नियम पाळूया. कारण मरताना श्रीमंत असणं हे अपमानास्पद आहे. आपण मरताना आपला समाज, आपला देश श्रीमंत असणं हेच अभिमानास्पद आहे. तेव्हा तशी कामगिरी करण्याची आता आपली जबाबदारी ओळखून कामाला सुरूवात करूया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv
