चौफेर घोडदौड

चौफेर घोडदौड

औरंगाबाद ते मुंबई बसप्रवास

या काळात माझे काम इतके वाढले होते की, विचारायची सोय नाही. माझ्या टीमने तयार केलेला ‘व्यवसाय’ म्हणजे पैसे जमा करण्यासाठी तेव्हा मला स्वतःला टीमचा प्रमुख म्हणून कंपनीच्या मुंबई ऑफिसला जावे लागायचे. माझ्या टीममधील लोकांची कागदपत्रे, त्यांची जमा रक्कम घेऊन मी एस. टी.ने औरंगाबाद ते मुंबई प्रवास करायचो. बरं हा काही नुसता प्रवास नव्हता. मी सिडको परिसरात राहत असल्याने सिडको बसस्थानकातून संध्याकाळी सात वाजता सुटणाऱ्या अंबड-मुंबई बसमध्ये तिकीट आरक्षित करीत असे. ती सीटही मी कंडक्टरच्या जवळची निवडत असे. ही बस औरंगाबादचे मुख्य स्टँड, गंगापूर, वैजापूर, येवला, निफाड, नशिक मार्गे मुंबईला जायची. या प्रत्येक चांब्यावर माझ्या टीममधील लोक येऊन थांबायचे. बसचे टायमिंग सगळ्यांनाच माहिती होते. त्यामुळे माझी बस आली की, ते माझ्याकडे पैसे व त्यांची कागदपत्रे, फॉर्म वगैरे द्यायचे. नाशिकला रात्री दोन वाजता लोकं बसस्टँडवर थांबलेले असायचे. या सगळ्यांकडून पैसे घेताना मो ते एका साध्या कोंबडा छाप बिडीच्या पिशवीतून घेत असे. हेतू हाच की, अशा साध्या पिशव्यांमध्ये लाखोची रोकड आहे, असा संशय कोणाला येऊ नये.

लाखो रुपये असे जमा करीत करीत मी मुंबईला पोहचत असे. आमच्या कंपनीचे ऑफीस नरीमन पॉइंटला होते. सकाळी सहा वाजता बस मुंबई सेंट्रलला पोहचायची. बस स्टँडवरच तोंड वगैरे धुवायचे, वडापाव व एक कटिंग चहा प्यायचा व ऑफीसजवळच्या बागेत जायचे. तिथे सगळ्यांच्या पिशव्या उघड्या करून हिशेबाची जुळवाजुळव करायची. तसे कलेक्शन आम्ही डिमांड ड्राफ्टनेच मागवायचो. पण तरीही अनेक जण कॅशच द्यायचे. ती पैसे असलेली पिशवी कोणाला दिसू नये, म्हणून बागेत बसल्यावर फक्त फॉर्म व इतर कागदपत्रेच बाहेर काढायचो. अशी कसरत करीत सगळे पैसे जमा करणे, पावत्या घेणे, कोणाच्या कमिशनचे व्हाऊचर असतील तर ते घेणे व ज्याच्या ताच्या पिशवीत त्या टाकणे इत्यादी कामे आटोपून माझा परतीचा प्रवास सुरू व्हायचा. परतीच्या प्रवासाचेही मी आधीच आरक्षण करून ठेवायचो. मुंबईतून औरंगाबादला सुटणारी बस मध्यरात्री बारा वाजता नाशिकला पोहचायची. तिथल्या लोकांना त्यांच्या पिशव्या द्यायच्या. पुढे औरंगाबाद येईपर्यंत प्रत्येक थांब्यावर संबंधितांच्या पिशव्या त्यांना सुपूर्द करायच्या. असा प्रवास करून पहाटे साडेपाचच्या सुमारास बस औरंगाबादेत दाखल व्हायची. घरी येऊन जेमतेम तासभर झोपायचे. आठ साडेआठला औरंगाबादमधील टीम मेबर घरी यायचे. त्यांना त्यांच्या पावत्या वगैरे द्यायच्या. नंतर जेवण करून बरोबर दहा वाजता मी बँकेत जायचो.

प्रवासामुळं झोप अर्धवट व्हायची. परत बँकेत जाऊन नेटाने काम करायचे. संध्याकाळी घरी आल्यावर परत मीटिंग. असे सगळे चालू होते. पण या गोष्टीचा कंटाळा कधी आला नाही. शारीरिक थकवा जाणवायचा, पण मनाने कायम फ्रेश असायचो. आपल्याला खूप मोठे व्हायचेय, ही खूणगाठ कधी निसटू दिली नाही. मला काही तरी जगावेगळे करायचे होते. करोडपती व्हायचे होते. त्यामुळे या धावपळीचा कधीही त्रास वाटला नाही. उलट यातून आणखी ऊर्जा मिळायची. तुमच्या मनात प्रचंड अशी ताकद आहे. तुम्ही मनाने एखादी गोष्ट ठरविली ना. तर कोणतीच ताकद तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. इंग्रजीत म्हणतात ना, Everything is Possible, Nothing is Impossible. यातील Impossible या शब्दाची फोड केली तर काय होते I’m possible. लोकांसाठी कदाचित ते अशक्य असेल, पण माझ्यासाठी ते शक्य आहे, असा त्याचा अर्थ.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!