नोकरीचा राजीनामा : नवी मुहूर्तमेढ

नोकरीचा राजीनामा : नवी मुहूर्तमेढ

कर्जदार शेतकरी अचानक मरण पावल्यावर त्याच्या कुटुंबीयांसमोर येणाऱ्या अडचणी किती वेदनादायी असतात, हे जवळून पाहिले. अडीअडचणीत विमाच कामाला येऊ शकतो, हे उमगले…

माझा मूळ स्वभाव प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. एखादे कार्य हातात घेतले ना, तर ते तडीस जाईपर्यंत मला चैनच पडत नाही. जे करायचे, त्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे. यशापयशाची तमा न बाळगता जास्तीतजास्त प्रयत्न करायचे. अगदी पराकोटीची जिद्द ठेवायची. हा माझा स्वभाव व्यवसायात आल्यावर आणखीच घट्ट होत गेला. याच काळात माझ्यात नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची महत्त्वाकांक्षा तयार झाली होती. पण व्यवसाय कोणता करावा, कसा सुरू करावा, याचा निश्चय होत नव्हता, दिशा मिळत नव्हती.

पण म्हणतात ना, इच्छा असेल, तर मार्ग दिसेल, अशीच एक घटना घडली. बँकेचे कार्य काय असते, तर लोकांकडून त्यांचे पैसे ठेवीच्या रूपात स्वीकारायचे. गरजू लोकांना विविध कारणांनी ते पैसे व्याजाने द्यायचे. त्याची व्याजासकट वसुली करून त्यातून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर व्याज व मुद्दल देणे. ठेवी व कर्ज या दोन्हींच्या व्याजदरात मोठा फरक असतो. हा फरकच बँकेचे उत्पन्न असते. ठेवी कितीही असल्या, तरी बँकेच्या चांगल्या सांपत्तिक स्थितीसाठी चांगले कर्जदारही महत्त्वाचे असतात. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेवर जमा होत नाही, असा बँकांचा सार्वत्रिक अनुभव असतो. आता शेतकरी कर्ज नियमित का फेडू शकत नाहीत, यालाही अनेक कारणे आहेत. कोणालाच कर्जबाजारी म्हणवून घेण्याची इच्छा नसते. माझ्या नोकरीवेळी बँकेकडून नोटीस आल्याचे समजून वडिलांनी जिवाला किती घोर लावून घेतला होता, हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिलेलेच आहे. तर शेतकरी कर्जबाजारी होतो, त्याला अनेक कारणे असतात. अनेकदा लहरी हवामान, जास्तीचा उत्पादनखर्च, मालाला योग्य भाव न मिळणे अशा कारणांनी शेतीव्यवसाय नुकसानीचा ठरतो. इच्छा असूनही त्याची कर्ज फेडण्याची ऐपत राहत नाही. त्यातच सावकाराकडून घेतलेले जादा व्याजदराचे कर्ज असते. यातून तो आणखी चक्रव्यूहात अडकतो. हताश होतो, हतबल होतो. यातून शेतकरी आत्महत्येच्या दुर्दैवी घटनाही घडतात.

शेतकऱ्याकडील कर्ज थकण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले, त्यासाठीच ते वापरले न जाणे. कर्ज मिळाल्यावर ते पैसे दुसऱ्याच अनुत्पादक कार्मावर खर्च करण्याची मानसिकता असते. अनेकदा शेतकरी कर्ज मागायला बँकेत आल्यावर त्याला विचारले जाते, “बाबा, कर्ज कशासाठी पाहिजे?” त्यावर त्याचे म्हणणे असते, “तुम्ही कशासाठी कर्ज देता? तेच कारण अर्जात लिहितो, फक्त तेवढं लगेच मंजूर करा.” मुलाबाळाच्या लग्नासाठी शेतकरी अशा पद्धतीने बँकेकडून कर्ज घेतात. तो पैसा लग्नकार्यातील थाटमाट, जेवणावळी, वरदक्षिणा अशा गोष्टींवर खर्च होतो. साहजिकच अनुत्पादक गोष्टींवर खर्च झालेल्या पैशाचा परतावा मिळणे अशक्य असते. अशा वेळी कर्ज थकबाकी वाढते. वसुलीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांवर वरतून दबाव येतो. मग ते शेतकऱ्याच्या मागे तगादा लावतात.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!