‘स्टार्टअप’
मी आता स्वतः बिझनेसमन झालो होतो. विमाव्यवसायाचे आवश्यक लायसन्स मिळवून आम्ही जोमात कामाला सुरुवात केली. ‘कर लो दुनिया मुड्ठी में असाच माझ्या सूर होता.
मनाशी एक निश्चय करून मी स्टेट बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. विमाव्यवसायात उतरण्याचा निर्णय एक्का केला होता. तत्पूर्वी मी औरंगाबाद येथून अहमदनगरला स्थलांतर केले. नवीन झेप घ्यायची होती, पण त्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक होते. मी विमाव्यवसायाचा अभ्यास करीत होतो, अनेकांशी चर्चा चालू होत्या. मी आधी ज्या कंपनीचा साईड बिझनेस करीत होतो, त्या कंपनीमुळे मला काही मित्र मिळाले होते. त्यांच्यापैकी नगरचेच सुरेश राऊत व नाशिकला स्थायिक झालेले डॉ. सुनील शिरोडे यांना मी व्यवसायात भागीदार होण्याचे निमंत्रण दिले. माझे कौशल्य त्यांनी आधीच्या कंपनीत जवळून अनुभवले होते. सुरुवातीला ते अशा स्वतंत्र व्यवसायास तयार नव्हते. माझ्या घरी आमच्या अनेक बैठका झाल्या. मी त्यांना सांगायचो, “तुम्ही मला साथ द्या, पैसे मी लावतो, तुम्ही फक्त बरोबर रहा.” अखेर ‘हो-नाही’ करता करता ते राजी झाले. दरम्यान मला कळले की, मी करणार असल्यासारखाच विमाव्यवसाय गुजरातमध्ये एक कंपनी करते.
मी आमच्या या दोन्ही भागीदारांना घेऊन अहमदाबादला गेलो. तेथील कंपनीप्रमुखांना भेटलो. त्यांना सांगितले की, आम्ही महाराष्ट्रात असा विमाव्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहोत. त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद देत व्यवसाय समजावून सांगितला. त्यांची कार्यपद्धतीही सांगितली. बोलताना त्या कंपनीच्या प्रमुखांनी आम्हाला ऑफर दिली की, ‘तुम्ही स्वतंत्र कंपनी न काढता माझ्याच कंपनीचे महाराष्ट्रातील काम पहा.’ ते मला म्हणाले, “मी तुम्हाला आमच्या कंपनीच्या डायरेक्टर बॉडीत घेतो. तुमचे दोन मित्र कंपनीसाठी अधिकारी म्हणून काम करतील.” पण मित्रांना असे मध्येच सोडणे मला काही पटले नाही. मी प्रस्ताव दिला, “तुम्ही आम्हा तिघांनाही डायरेक्टर करा.” त्याला त्या कंपनीप्रमुखांची तयारी नव्हती. मीसुद्धा त्यांची ऑफर नाकारली व स्वतःचीच कंपनी बरी, असे म्हणून नगरला आलो. या काळात आम्ही विमाक्षेत्रातील ज्या सरकारी कंपन्या आहेत, त्यांच्या दिल्लीतील व मुंबईतील मुख्य कार्यालयांस भेट दिली. सरकारच्या अपघातविम्याच्या पॉलिसी ज्यांच्यासाठी तयार केल्यात, त्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले, शेतकरी, शेतमजूर, महिला विशेषतः ग्रामीण भागात सर्वदूर या पॉलिसी पोहचवून व्यवसाय करू, अशी ग्वाही त्यांना दिली. यातून सर्वसामान्यापर्यंत विमा पोहचवितानाच पॉलिसी विकण्याच्या माध्यमातून स्वयंरोजगारालाही चालना देण्याचा माझा प्रयत्न होता. कंपनीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आम्ही आमच्या कंपनीस्थापनेच्या कामाकडे वळलो, कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करायची व आम्ही तिघे भागीदार असे ठरले होते. डॉ. सुनील शिरोडे हे माझे मेहुणे डॉ. प्रकाश जाधव यांचे बॅचमेट होते व त्यांची माझी चांगली जुनी ओळख होती. ते म्हणाले, “आपण आपल्या कंपनीसाठी आणखी एक पार्टनर घेऊ. तो त्यांचा मुंबईतील मित्र होता. त्याला घेण्याचे कारण की, तो गुंतवणूक करेल पण प्रत्यक्ष काम करणार नाही. तो स्लीपिंग पार्टनर असेल. त्याला कंपनी कायदे तसेच इतर तांत्रिक गोष्टींची चांगली माहिती आहे. कंपनी चालविताना त्याचा आपल्याला फायदा होईल.’ असे बरेच काही डॉ. शिरोडे यांनी मला पटवून दिले. माझ्यासाठीसुद्धा कंपनी स्थापन करणे नवीनच होते, मी त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला. एवढे सगळे होत असताना माझ्या भागीदारांनी आणखी एक वेगळा प्रस्ताव मांडला. त्यांनी सांगितले, “या आधीच्या कंपनीत तुम्ही प्रचंड मेहनत घेऊन काम केलं. देशपातळीवर रेकॉर्डब्रेक बिझनेस तुम्ही केला. या कंपनीतही तुम्हीच नेतृत्व करणार, हेही नक्की आहे. पण मागच्या कंपनीत कागदोपत्री बिझनेस सौ. सुनंदा नयनाथ धुमाळ यांच्या नावावर होता. त्यांचं नाव तुमच्यासाठी लकी उरलेलं आहे. याशिवाय आता आम्ही दोघे सुरेश व सुनील आहोत. त्यात सौ. सुनंदा आल्यास आमची तिांची कुंभ रास एकत्र येऊन कंपनी मोठी झेप घेईल.” असे बरेच काही त्यांनी मला सांगितले. “आता नव्या कंपनीतही तुमच्याऐवजी त्यांच्या नावाने भागीदारी केली, तर ते ‘गुडलक’ आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. मला त्यांच्या सांगण्याचा हेतू प्रांजळ वाटला. त्यांचे माझे संबंधही मित्रासारखेच होते. त्यामुळे मी तोही प्रस्ताव क्षणाचाही विलंब न करता मान्य केला. पूढे या प्रस्तावानेच मला मोठा हादरा दिला. पण ते पुढे सांगतो. तर आम्ही कंपनी स्थापनेचे सगळे सोपस्कार पूर्ण केले व आमची ‘लाईफ लाईन मल्टिसर्व्हिसेस प्रा. लि.’ स्थापन झाली ती १३ ऑगस्ट १९९७ ला. मी आता स्वतः विझनेसमन झालो होतो. दोन दिवसांनी देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार होता. त्याआधी मी एका कंपनीचा चालकमालक बनलो होतो. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी माझा उत्साह जरा जास्तच होता. विमाव्यवसायाचे आवश्यक लायसन्स मिळवून आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली. ‘कर लो दुनिया मुष्ठी में’ असाच माझा सूर होता. हा व्यवसाय माझ्यासाठी एक आव्हानही होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या एका प्रसंगाने माझ्यात विमाव्यवसायाचे बीजारोपण झाले, त्याची जाणीव मनात खोलवर रुजली होती. सर्वसामान्यांपर्यंत विमा पोहचविला, तर संकटप्रसंगी अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडणार नाहीत, यासाठी आपण मनापासून काम करायला हवे. हे सगळे ठरवून मी कामाला सुरुवात केली. बँकेत नोकरी केली असल्याने अकाउंटिंगचे चांगले ज्ञान होते. एल. एल. बी. ची पदवीही घेतली असल्याने कायदेशीर बाबींचेही ज्ञान होते. याशिवाय सेल्स मार्केटिंगचा तेरा ते चौदा वर्षांचा अनुभव होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही विकत असलेला विमा भारत सरकारचा होता. माझे भागीदारही मार्केटिंगमधील अनुभवी होते. आधीच्या कंपनीमुळे मी व्यापक जनसंपर्क केलेलाच होता. अशा तन्हेने नगरमधील मुख्य कार्यालयातून आमची घोडदौड सुरू झाली. दोन-अडीच वर्षांत आम्ही मोठा विझनेस केला. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील वाडा, खानदेशातील मोठ्या शहरांमध्ये आमच्या कंपनीची शाखा कार्यालये उघडली. सर्वकाही सुरळीत चालू होते. अशात एके दिवशी सुरेश राऊत यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बी. पी., मधुमेहाचा त्रास पूर्वीपासूनच होता. तो वाढत जाऊन त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दुसरे भागीदार डॉ. शिरोडे यांचेही घशाचे दुखणे याच काळात सुरू झाले. त्यांना बोलताना खूप त्रास व्हायचा. तिसरा भागीदार पहिल्यापासून स्लीपिंगच होता. मी आजारी भागीदारांना सांगितले, “तुम्ही पूर्ण बरे व्हा, कंपनीची काळजी करू नका. मी एकटा व्यवस्थित सांभाळतो.” अशी सगळीच जबाबदारी माझ्या खांद्यावर आली.
माझी धावपळ खूप वाढली. पण धंद्याची मजा घेत मी काम करीत होतो, जवळपास एक वर्ष मी एकटाच खिंड लढवीत होतो. या दरम्यान राऊत आणि डॉ. शिरोडे दोघेही उपचारांनी बरे झाले. ते पूर्वीप्रमाणे काम करू लागले. आमच्या कामाचा पसाराही वाढला होता. आम्ही मन लावून काम करीत होतो. पण राऊत व डॉ. शिरोडेंची लक्षणे मला ठीक दिसत नव्हती. दोघांनाही दारूची आवड नि व्यसन होते. मला स्वतःला व्यसनांचा तिटकारा होता. पण मी त्या दोघांकडे दुर्लक्ष करायचो. या दरम्यान आमच्या कंपनीचे स्वमालकीचे औरंगाबादचे शाखा कार्यालय तयार होत होते. एके दिवशी मी औरंगाबादला कार्यालयाचे काम पाहण्यासाठी अचानक गेलो. कार्यालयाचे फर्निचर, रंगरंगोटीचे काम सुरू होते. मी सहज चौकशी केली. मला रंगकामाचा खर्च जरा जास्त वाटला. मी ठेकेदाराकडे चौकशी केली. त्याने मला सांगितले, “मला ४० टक्क्यांनी बिल वाढवून कंपनीला द्यायचं आहे. सर्व संचालकांची अॅडजस्टमेंट आहे त्यात.” मी चक्रावून गेलो. मीसुद्धा कंपनीचा संचालक होतो.
मला काहीच माहिती नव्हते. ही बाजू आमचे दोन भागीदारच पाहायचे. मी ठेकेदाराला जास्त काही न बोलता पुढे माझ्या दौऱ्यांवर गेलो. तिथून परत आल्यावर मी आमच्या भागीदारांना बैठकीला बोलाविले, ते दोघे आले. मी त्यांना विचारले, “औरंगाबाद शाखा कार्यालयाच्या फर्निचर, रंगरंगोटीचा माझा हिस्सा द्या.” त्यांना मोठा धक्का बसला. आपले बिंग फुटल्याचे त्यांना कळले. पण त्यांनी उलटा कांगावा केला. मीसुद्धा खूप संतापलो होतो. मी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली, त्यांना खडसावून जाब विचारला, “आपल्याच कंपनीत आपणच चोरी करायची, हे चांगले नाही।” असे स्पष्टपणे सांगितले. माझा पारा चढल्याचे पाहून ते गांगरून गेले. त्यांनी माझे पाय धरून माफी मागितली. पैशाची गरज असल्याने असे केल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, “पैसे लागत होते, तर मला मागायचे, अशी चोरी करण्याची काय गरज होती?” त्यांनी माफी मागितल्यानंतर मी तो विषय सोडून दिला. परंतु मला नंतर समजले की, त्या तिघा भागीदारांनी संगनमतानेच हा उद्योग केला होता. अस्तनीतील निखारे म्हणतात ते हेच!
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
