‘स्टार्टअप’

‘स्टार्टअप’

विश्वासघात

कंपनीतील गैरव्यवहाराच्या त्या प्रकरणानंतर आमचे भागीदार जरा विथरल्यासारखे करू लागले. मला ते जाणवत होते. पण मी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली. या दरम्यान एके दिवशी आम्ही ऑफीसमध्ये बसलेलो असताना राऊत व डॉ. शिरोडे यांनी विषय काढला. “कंपनीच्या संचालक मंडळाची मीटिंग उद्या बोलवायची आहे. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असून या मीटिंगसाठी ताईंना (म्हणजे अधिकृतपण कागदोपत्री संचालक असलेली माझी पत्नी) पाठवा.” असे त्यांनी सांगितले. मी त्यांना म्हणालो, “आतापर्यंतच्या मीटिंगला मीच उपस्थित राहिलेलो आहे. सुनंदा फक्त नामधारी संचालक आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?” त्यावर ते म्हणाले, “आता तसं चालणार नाही. त्या संचालक असल्याने त्यांनीच मीटिंगला उपस्थित राहायला पाहिजे. तुम्ही कंपनीचे संचालक नाहीत. कायद्याने तुम्ही संचालक नसल्याने तुम्ही आमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. उलट आम्ही सांगू, त्याचप्रमाणे तुम्ही काम केलं पाहिजे.” भागीदारांनी अशी कायद्याची भाषा सुरू केल्यावर मी विचारात पडलो. मी एका हुशार वकिलाचा सल्ला घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “कायद्याने त्या तिघांची बाजू बरोबर आहे. कंपनी नियमाप्रमाणे संचालक मंडळाचा बहुमताचा निर्णय मान्यच करावा लागतो. त्यांच्या बाजूने तीन संचालक म्हणजे ७५ टक्के बहुमत आहे. दुसरी गोष्ट तुम्ही कायदेशीररीत्या कंपनीचे संचालक नाहीत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला तुम्ही साधा आक्षेपही घेऊ शकत नाही.” वकिलांचे हे मत ऐकल्यावर माझे डोळे खाडकन उघडले. कंपनी स्थापन करताना त्यांनी माझ्याऐवजी माझ्या पत्नीला संचालक करा असा आग्रह का धरला होता, याचे खरे कारण मला कळले. हा सरळसरळ विश्वासघात होता. मी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या बदल्यात मला विश्वासघात मिळाला. मी खूप निराश झालो. तशाच अवस्थेत घरी आलो. आता या कंपनीत आपले काही राहिले नाही, हे मला कळून चुकले, काय करावे, हे सुचेना. बऱ्याच मित्रांशी बोललो. माझे मेहुणे डॉ. प्रकाश जाधव हे डॉ. शिरोडे यांचे कॉलेजपासूनचे मित्र होते. ते त्यांच्याशी बोलले. पण डॉ. शिरोडे बघले नाहीत. ते नियम दाखवीत राहिले. मी माझे वकील मित्र अॅड. के. एम. देशपांडे यांच्याशी बोललो. त्यांनी सल्ला देताना मला सांगितलं, “तुम्ही अंधविश्वास ठेवला, ती तुमची चूक होती. तुमच्यासाठी हा मोठा धडा होता.”

मराठी माणूस नेहमी बोलतो की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जो काम करतो, निर्णय घेतो, तोच चुकतो. माझ्या वकील मित्राने या दोन्ही वाक्यांचे सविस्तर विश्लेषण करून मला खरा अर्थ सांगितला. Acceptance and correction of mistake are the first step towards the success. मला हे वाक्य पटले. याचा अर्थ असा की, झालेल्या चुकीचा स्वीकार करून त्यात सुधारणा करणारेच जीवनात यशस्वी होतात. कोणताही मनुष्य सर्वगुणसंपन्न नसतो. काम करताना, निर्णय घेताना काही ना काही कारणाने त्याच्या हातून चुका होणारच.
पण चुकांचा बाऊ करून नाउमेद व्हायचे की त्या चुका दुरुस्त करून पुढे जायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. चुकांतून माणूस शिकत जातो. एकदा चुकले म्हणजे प्रत्येकयेळी चुकतेब असे नाही. माझ्या वकील मित्राने मला स्थापणे सांगितले, “तुमच्यात जिद्द आहे, हिमत आहे. तुम्ही ती कंपनी सोडून द्या. नवीन स्वतःची एकटयाची कंपनी स्थापन करा.”

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!