एक सकारात्मक विचारधारा !

एक सकारात्मक विचारधारा !
(अग्रेषित) ….
वळण
✍️ डॉ. आशिष गुरव :
मोटिव्हेशनल स्पीकर व लाईफ कोच.

एक सुंदर, अर्थपूर्ण वाक्य माझ्या वाचनात आले. ‘A bend in the road is not the end of the road, unless you fail to take a turn.’
रस्त्याने चालताना शेवट आल्यासारखा वाटतो पण तो शेवट नसतो. फक्त रस्ता वळलेला असतो, आणि ते वळण घेणे आवश्यक असते. हे एक छोटेसे वाक्य बरेच काही सांगून जाते असे मला वाटते. रस्त्यातली वळण ही वाक्याची सुरवात आहे. जीवनाचा विचार केला तर असे दिसून येते की जीवनाचे रस्ते सरळ नसतात. वळणे घेत घेतच आपल्याला पुढे पुढे जायचे असते. ही वळणे म्हणजे जीवनातील अडचणी होय. या अडचणींकडे तुम्ही कसे बघता यावर तुमचे यश अपयश अवलंबून आहे. संकटे व अडचणी तुम्हाला त्रासासाठी येत नाहीत, तर तुम्हाला शहाणपण यावे यासाठी येतात. अशी सकारात्मक भावना मनाशी बाळगली पाहिजे. अनेक महान लोकांनी खूप संकटांवर मात करून मोठे यश मिळविले आहे. आदित्य बिर्ला हे महान उद्योगपती होते. त्यांनी मोठे मोठे कारखाने उभारले. त्यांच्या मंगलोर रिफायनरी या कारखान्या बद्दल एक कटू सत्य आहे. या कारखान्याला परवानगी मिळण्यासाठी किती काळ लागला असेल? दोन चार महिने नव्हे, एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल अकरा वर्षे फक्त परवानगी मिळण्यास लागली. आदित्य बिर्ला अकरा वर्षे एका मोठ्या वळणावरून प्रवास करीत होते.दुसरे असे की, जीवनात कधीही नाउमेद होऊ नये. रस्ता संपल्या सारखा वाटतो, पण संपलेला नसतो. कोणत्याही गोष्टीचा शेवट हा शेवट नसतो. रस्त्याने वळण घेतले की पुढे जाता येते. पुढे अनेक संधी वाट पहात असतात. सूर्यास्त झाल्यावर रडत बसणाऱ्याला तारे दिसू शकत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदय होणारच असतो. आशा ही मनुष्य जीवनातील अतिशय सुंदर गोष्ट आहे. मनुष्य आशेवर जगत असतो.
एका व्यापाऱ्याला खूप तोटा झाला. तो जीवनात अतिशय निराश झाला. एका साधूकडे आला, म्हणाला, महाराज माझे दिवस बदलले. काही राहिले नाही. मी काय करू?. महाराज म्हणाले, म्हणजे दिवस बदलतात हे तुला मान्य आहे. व्यापारी म्हणाला, होय महाराज. महाराज प्रेमाने हसले, म्हणाले, अरे म्हणजे हे दिवस पण नक्कीच बदलणारच. जरा वळण संपू दे. त्यानंतर सरळ रस्ता येईल. मग मार तुझी गाडी सुसाट.तिसरी गोष्ट अशी की, वळण घेणे ही प्रक्रिया लॅटरल थिंकिंगशी (lateral thinking) संबंधित आहे. लॅटरल थिंकिंग म्हणजे वेगळा विचार करणे. एखादी समस्या सोडविताना आपण त्यावर विचार करतो. त्या विचाराला एक दिशा असते. त्याला आपण सरळ दिशा म्हणजेच longitudinal direction म्हणू. काही वेळा त्या दिशेने विचार समस्या करून सुटत नाही. आपण तेथेच अडकून बसतो. त्यासाठी वेगळ्या दिशेने म्हणजेच lateral direction ने विचार करावा लागतो. यालाच लॅटरल थिंकिंग म्हणतात. सरळ रस्त्यावरुन जाताना वळण घेतले नाही तर आपण तेथेच अडकून बसू. जसे रस्त्यावर दिशा बदलणे अत्यावश्यक आहे तसेच समस्या न सुटल्यास विचारांची दिशा बदलणे आवश्यक आहे.एकुण काय, रस्त्याने चालताना वळणाचा त्रास करून न घेता त्याकडे सकारात्मक भावनेने पहिले पाहिजे. वळणावरून सायकल किंवा मोटार सायकल चालविताना काय होते? मस्तपैकी तिरकी होते, पण पडत मात्र अजिबात नाही. किती मजा आहे ना?

लेखक- डॉ. आशिष गुरव (मोटिव्हेशनल स्पीकर व लाईफ कोच.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!