‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

अनुभवांची शिदोरी

या व्यवसायात मार्केटिंगचे अनेक नवनवीन फंडे मी कागदावरून प्रत्यक्षात उतरविले. पुढे हे फंडे अनेकांसाठी वहिवाट झाले. या व्यवसायातून अनेक कर्तृत्ववान व्यक्तीशीही माझा परिचय झाला. त्यातलेच एक म्हणजे दै. पुण्यनगरी समूहाचे संस्थापक स्व. मुरलधीर तथा बाबा शिगोटे, शिंगोटे यांचा जीवनप्रवासही शून्यातून सुरू झालेला. २००० च्या आसपास त्यांनी पुण्यनगरीचा भलामोठा विस्तार साध्य केला. स्वतः फारसे शिकलेले नसले तरी अनुभवाचे शहाणपण त्यांच्याकडे खूप मोठे होते. एकदा जालना येथे आमच्या एका कार्यक्रमाला त्यांना मी निमंत्रित केले होते. त्यांच्याच हस्ते विम्याचे चेक लाभार्थी महिलांना वाटले. तिथे मोठ्या जनसमुदायासमोर माझे भाषण झाले. त्या भाषणाने बाबा खूप प्रभावित झाले होते. तेथून पुढे आमचे ऋणानुबंध चांगलेच जुळले. पुढे पुण्यनगरीच्या सर्व आवृत्त्यांत माझे भाषण असलेले लेख, बातम्या, आमच्या कंपनीच्या जाहिराती यायच्या. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दलचे विशेष लेखही पुण्यनगरीच्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होत असत. यातून आम्हा दोघांचाही चांगला व्यवसाय झाला.

आमच्या कंपनीत मी विम्याला ‘लाईफ केअर कार्ड’ची जोड दिलेली होती. याशिवाय एजंट मंडळींसाठी ‘फिल्ड केअर प्लॅन’ही केला होता. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही दुचाकी, चारचाकी बक्षीस द्यायचो. सहा महिन्यांतून एकदा आम्ही एजंटांचा सत्कार, मीटिंग व गाड्यांच्या वितरणाचा मोठा कार्यक्रम घ्यायचो. त्याला आम्ही ‘महाइनामी सोहळा’ म्हणायचो. प्रचंड गर्दी व्हायची या कार्यक्रमांना. यातून कंपनीच्या नावाचीही चर्चा व्हायची. या कार्यक्रमातील एजंटांचे सत्कार पाहून अनेकांना प्रेरणा मिळायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास आणखी वृद्धिगत व्हायचा. या कार्यक्रमांवेळी अनेक चांगले अनुभव मला आले. एकदा औरंगाबादला मिलिंद कॉलेजच्या क्रिकेट स्टेडियमवर असाच महाइनामी सोहळा आयोजित केला होता. आम्ही अशा सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार आमदार, नगरसेवक, प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवायचो. औरंगाबादच्या त्या कार्यक्रमासाठी नगरहून आमचे स्नेही व नगरचे माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले आले होते. औरंगाबादचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेही आले होते. तिये हा भव्यदिव्य सोहळा, माझे काम पाहून शंकरराव घुले खूपच प्रभावित झाले. त्यांनी आपल्या भाषणात मला पांडुरंगाची उपमा दिली. आम्ही या कार्यक्रमात विमाधारकाच्या कुटुंबीयांना, वारसांना क्लेमचे धनादेश वितरित करायचो. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यावर उ‌द्ध्वस्त झालेल्या कुटुंबासाठी ही विम्याची रक्कम खूप मोठी असायची. त्यांच्या विधवा पत्नी, म्हातारे आईवडील ही रक्कम स्वीकारताना भाबुक व्हायचे. त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. खूपच भावनिक व हळवे क्षण असायचे ते. माझे हे दुःखी, पीडितांना आधार देण्याचे काम देवदूताप्रमाणे असल्याचे घुले यांनी जाहीर भाषणात सांगितले. माझ्यासाठी हा क्षण लाखमोलाचा होता. एक प्रकारे घुले यांनी

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेघेचि जाणावा।।

हे संत तुकोबारायांचे तत्त्वज्ञान आपल्या शैलीतून सांगितले. आपणही तुकोबारायांनी सांगितलेल्या मागनि थोडेबहुत तरी जात आहोत, याचा मला आनंद झाला.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!