यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

अन्नछत्र : एक पुण्यकर्म

आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला प्रचंड महत्त्व देण्यात आलेले आहे. पुण्यप्राप्तीसाठी सत्पात्री दान महत्त्वाचे मानले जाते. त्यातही अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर समाजऋणातून उतराई होण्यासाठी मी ३१ जुलै २०१८ रोजी आईवडिलांच्या स्मरणार्थ सुवर्णम प्राईड हॉटेलच्या आवारातच अन्नछत्र सुरू केले. हे अन्नछत्र सुरू करण्यामागेही आईवडिलांकडून कळत नकळत मिळालेली प्रेरणाच कारणीभूत ठरली. साधारण दहा वर्षांपूर्वी मी गावी गेलो असता वडिलांशी सहज गप्पा मारत होतो. माझे वडील म्हणजेच दादा तेव्हा थकलेले होते. मी त्यांना सहज म्हणालो, “दादा, तुमची काही इच्छा असेल, तर सांगा, कुठे देवदर्शन करायचं, कुठे तीर्थयात्रा करायची का?” त्यावर दादा मला म्हणाले, “माझी इच्छा आहे की, आपण सगळेजण एकत्र पंढरपूरला जावं, विठुरायाचं दर्शन घ्यायचं व तिथे अनाथ, अपंग, दीनदुबळ्यांना गुलाबजामची पंगत द्यावी.” मी लगेच त्यांना होकार दिला. “मी लवकरच सगळ्यांना एकत्र आणतो व आपण दोन गाड्या करून पंढरपूरला जाऊ.” असे सांगून मी नगरला परतलो. नंतर कामाच्या धबडग्यात आज जाऊ, उद्या जाऊ असे करता करता अनेक महिने गेल या दरम्यान दादांचे (वडील) निधन झाले. १७ ऑक्टोबर २०१४ ला कार्तिकी एकादशीच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची पंढरपूरला अत्रदानाची इच्छा अपूर्ण राहिली. माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. जन्मदात्याची एक छोटी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, याची टोचणी माझ्या मनाला कायम सलत असे. एके दिवशी मी पत्नी व दोन्ही मुलांना घेऊन पंढरपूरला गेलो. तिथे दर्शन घेतल्यानंतर मी एकटाच विठ्ठलरुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात गेलो. तिथे मी एक ठरावीक रक्कम एफडीच्या रूपात देणगी म्हणून दिली. त्याच्या व्याजातून दरवर्षी माझ्या वडिलांच्या स्मृतिदिनी अन्नदान करण्याची विनंती मी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना केली. वडिलांची इच्छा त्यांच्यानंतर का होईना या मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला.

पुढे नगरला आलो. एकदा गावी गेल्यावर आईला मी पंढरपूरला देणगी दिल्याचे व दरवर्षी वडिलांच्या स्मृतिदिनी तिये अनदानाची व्यवस्था होईल, असे सांगितले, आई यावर खूप आनंदित झाली. “वडिलांनी तुला एकदा पंगत देण्याचं सांगितलं होतं, तू तर कायमस्वरूपी तशी व्यवस्था केलीस, लई मोठं काम केलंस.” असे कौतुक तिने केले. तिच्या डोळ्यात त्या दिवशी आलेले आनंदाश्रू माझ्या नजरेसमोर आजही आहेत. मी तिला म्हणालो, “दादांचे इतके मोठे उपकार आहेत की, मी नखाइतकीही परतफेड करू शकलेलो नाही.” यानंतर काही दिवसांनी माझी आईच आजारी पडली व तिला नगरला आमच्याच लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचारानंतर ती बरी झाली. ती गावी जायची तयारी करीत होती. तेव्हा मी तिला विचारले, “बाई, दादांची इच्छा ते हयात असताना माझ्याकडून पूर्ण होऊ शकली नाही, तुझी काही इच्छा असेल तर सांग.” त्यावर ती म्हणाली, “मला काही कुठे तीर्थयात्रा करायची नाही, पण तुझ्याकडून शक्य असेल तर एक गोष्ट कर. आपल्या हॉस्पिटलच्या परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. तिथे लांबच्या खेडेगावांतून सर्वसामान्य, गरीब लोक रुग्णाला घेऊन येतात. इथे आल्यावर त्या रुग्णाच्या नातेवाइकांची खूप ससेहोलपट होते, त्यांच्या भाकरतुकड्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यासाठी काही सोय करता आली तर पहा.” आईचे हे बोलणे माझ्याही मनाला भिडले. खरेच आमचा तारकपूर परिसर हॉस्पिटल्सचे मोठे हब आहे. लांब खेडेगावांतून लोक येथे येतात. रुग्ण अॅडमिट असल्यावर किती तरी दिवस त्यांना हॉस्पिटलच्या आवारातच राहवे लागते. आधीच दवाखान्याच्या खर्चाची चिंता, त्यात रोजच्या जेवणावर मोठा खर्च करायचा म्हणजे मोठीच अडचण. अशावेळी रस्त्यावर मिळणारा वडापाव, मिसळपाव खाऊन दिवस काढायचे म्हणजे खर्चिक काम असते.

मी ठरविले, या लोकांच्या जेवणाची सोय करायची. आमचे हॉटेल तयार झालेच होते. मी हॉटेलच्या आवारातच आईवडिलांच्या नावाने अत्रछत्र सुरू करायच ठरविले. मी सर्वांसाठी येथे मोफत भोजनव्यवस्था करण्याचे ठरविले. पण आमचे मित्र सी. ए. हेमंत काळे, डॉ. विनोद मराठे यांनी मला सल्ला दिला, “फुकट काही दिलं, तर त्याची किंमत राहत नाही. नाममात्र का होईना पैसे घेऊनच अन्नछत्र सुरू करा. तरच कायम टिकेल. मीसुद्धा यावर विचार केला आणि अतिशय नाममात्र दरात या अन्नछत्रात चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली. नगरच्या सामाजिक, सहकार क्षेत्रांत कार्यरत असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हस्तीमलजी मुनोत व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक पराग नवलकर यांच्या हस्ते या अन्नछत्राचा शुभारंभ केला. यावेळी मी अनामप्रेम संस्थेतील अंध मुलांच्या ऑर्केस्ट्राचाही कार्यक्रम ठेवला होता.

अन्नछत्र चालविताना एक गोष्ट कटाक्षाने पाळली. ती म्हणजे स्वच्छता. आरोग्यपूर्ण व सकस अन्नच द्यायचे. हॉटेलमध्ये ज्या हायजेनिक वातावरणात अन्न तयार होते, तेच अन्नछत्रातूनही दिले गेले पाहिजे, हे ब्रीद कायम जपले आहे. या ठिकाणी आजही फक्त पाच रुपयांत चहा, दहा रुपयांत गरमागरम नाष्टा व वीस रुपयांत जेवण दिले जाते. हॉस्पिटलमधील रुग्णांचे नातेवाईक आवर्जून या ठिकाणी येऊन चांगले भोजन घेतात. मधल्या काळात राज्य सरकारने ‘शिवभोजन योजना’ सुरू केली. तेका जिल्हा प्रशासनाने स्वतःहून आमच्या अनछत्रात शिवभोजन केंद्र सुरू करण्यास सांगितले. शासन निर्देशाप्रमाणे या ठिकाणी शिवभोजन थाळीचीही व्यवस्था करण्यात आलेली दोनशे लोकांना मोफत भोजन देण्यात येत आहे. सकस अन्न तेही आहे. २६ जानेवारी २०२० पासून येथे दररोज दोन मोफत मिळाल्यानंतर अत्रग्रहण करणाऱ्यांकडून मनातून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत. अमुळे अनेकांची पोटाची भूक भागतेच, पण आमच्या या उपक्रमातून काहींना प्रेरणाही मिळते. असाच एक प्रसंग आवर्जन सांगण्यासारखा आहे. एके दिवशी मी हॉटेलमध्ये पाचव्या मजल्यावरील माझ्या ऑफीसमध्ये बसलो असताना मला रिसेप्शनवरून फोन आला, “एक व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी रोज येत आहे. ती तुम्हालाच प्रत्यक्ष भेटायचं म्हणतेय, तिला वर पाठवू का?” मी जरा कामाच्या गडबडीतच होतो, पण महटलो रोज येतोय तो माणूस तर एकदा भेटून घ्यावे. आमच्या कर्मचाऱ्याने लिफ्टने त्या माणसाला वर माझ्या बिनमध्ये आणले, आल्याआल्या तो माझ्या समोर झुकला व माझ्या पाया पडला. मी जरा दचकलोच. त्यावर हो महणाला, “तुमच्यामुळे आज माझे वडील जिवंत आहेत, त्यांना नवीन जीवन मिळालं.” मला काही कळेना, मी त्यात्ा पहिल्यांदाच पाहत होतो. मी आश्चर्याने त्याला विचारले, “तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?” त्यावर त्याने मला त्याची कहाणी सांगितली.

तो माणूस सर्वसामान्य शेतकरी होता. पाथर्डी तालुक्यातील एका गावात त्याचे वडील एका मोठ्या शेतकऱ्याकडे सालदार होते. एके दिवशी खिलारी बैलजोडीला दावे बांधत असताना एका बैलाने उसळी घेतली व त्याचे टोकदार शिंग त्यांच्या गळ्यातून आरपार गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी पाथर्डीत व नंतर नगरच्या साईदीप हॉस्पिटलमध्ये आणले. तिथे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. जवळपास तीन लाख रुपये खर्च आला. काही दिवसांनी त्यांना बरे वाटू लागले. याच दरम्यान डॉक्टरांनी आणखी एक बाँब टाकला, “तुमच्या वडिलांचं आणखी एक ऑपरेशन करावं लागेल, तरच ते जगतील. त्यासाठी आणखी लाखभर रुपये खर्च येईल.” या गरिबाने आधीच तीन एकर पैकी एक एकर शेत विकले होते. आता पुन्हा ऑपरेशन म्हटल्यावर उरले सुरले शेतही त्याला विकावे लागणार होते. त्याच्या वडिलांनी हे ऐकल्यावर ते म्हणाले, “बाबा, आता नको खर्च करू, मी पिकलेलं पान आहे. अजून जमीन विकशील, तर पुढं काय होईल?” नातेवाइकांनीही आता आणखी ऑपरेशनचा खर्च नको असे म्हटले.

“मीसुद्धा विचार केला व उरलेले पन्नास हजार रुपये भरून आहे तसेच वडिलांना घरी नेण्याचं ठरविलं. काही कारणांनी पन्नास हजार रुपये घेऊन येणारा माझा मेहुणा आला नाही. त्यामुळे डबाही आला नव्हता. दुपारची वेळ होती. मी जेवण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर आलो. फिरत फिरत सुवर्णम प्राईड हॉटेलजवळ आलो. रस्त्यावर मिसळपावची गाडी होती. त्याला म्हणालो, ‘माझ्याकडे वीस रुपये आहेत, मला मिसळपाव दे.’ तो म्हणाला, ‘चाळीस रुपये असतील, तर देईन.’ माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. तेवढ्यात एक इसम माझ्याकडे आला व म्हणाला, ‘तुम्हाला जेवायचं आहे ना? मग या शेजारच्या रस्त्यावर जा. तिथे अन्नछत्र आहे. वीस रुपयांत जेवण मिळेल.’ मी अन्नछत्रात गेलो. इतकं चांगलं जेवण, तेही फक्त वीस रुपयांत मिळाल्याने मी पोटभर जेवलो. मी बारकाईने चौकशी केली, तेव्हा कळलं की, धुमाळसाहेब म्हणून आहेत, त्यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोरगरिबांसाठी हे अन्नछत्र चालविलं आहे. हे ऐकून माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. मी विचार केला, जी व्यक्ती आपल्या हयात नसलेल्या आईवडिलांसाठी इतकं मोठं काम करू शकते, मग मी का काही करू शकत नाही? माझे वडील तर आज हयात आहेत. केवळ पैशासाठी मी त्यांचं ऑपरेशन न करता त्यांना मृत्यूच्या खाईत लोटत आहे. मला माझीच लाज वाटू लागली. मी निश्चय केला… काहीही झालं, तरी वडिलांचं ते दुसरं ऑपरेशन करायचेच. त्याचं तिरमिरीत मी उठलो. साईदीपमध्ये गेलो व डॉक्टरांना दुसरे ऑपरेशन करायला सांगितलं. इकडून तिकडून पैसे जमविले व हॉस्पिटलमध्ये भरले. आज माझे वडील अतिशय आनंदात आहेत. हे सर्व तुमच्या प्रेरणेमुळेच घडलं. म्हणून मी आवर्जून तुम्हाला भेटायला, तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला

आलोय.” हा प्रसंग आजही आठवला, तरी माझ्या मनाला खूप समाधान लाभते. आपल्या कार्यातून कळत नकळत अशा किती लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होत असतील, याची जाणीव होते. अनतवाच्या माध्यमातून आम्हाला कोरोना महामारीच्या काळातील कडक लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करता आली. २४ मार्च २०२० ला सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला. प्रत्येकाला घरातच कोंडून घ्यावे लागले. अशा वेळी हातावर पोट असणाऱ्यांसमोर भुकेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आम्ही विचार केला व अशा गरजूंना थेट घरपोच अत्र देण्याचे ठरविले. अन्नछत्राचा सेटअप होताच, मग काय जवळपास चार महिने आमचे मोफत अन्नछत्र सुरू होते. या काळात जवळपास पन्नास हजार डबे श्री. महेश धुमाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गरजूंना घरपोच दिले. अडचणीच्या काळात त्यांच्या पोटाला आधार दिला. या काळात अन्नछत्रासाठी जवळपास पंचवीस लाख रुपये खर्च केले. हे सर्व परमेश्वरानेच आमच्या हातून करवून घेतले, त्यानेच सद्बुद्धी दिली, असेच मी मानतो.

आपल्या कामातून आपल्याला आनंद मिळायला हवा आणि इतरांना अल्पस्वल्प आधार मिळायला हवा, हेच ध्येय समोर ठेवून मी कोणतेही कार्य हाती घेत असतो. माझ्या वाढदिवसाला (१३ सप्टेंबर) दरवर्षी मी स्नेहालय संचालित अनामप्रेम या अंध, अपंग, अनाथ मुलांच्या संस्थेत अन्नदान करतो. त्या मुलांशी संवाद साधून त्यांना मिष्टात्र भोजन देतो. यावेळी मी त्या मुलांशी व्यक्तिमत्त्वविकास, जीवनाचा अर्थ या विषयावर तास-दीड तास बोलतो. मुले तल्लीन होऊन ते ऐकतात. अनेकवेळा ती सांगतात, “आम्हाला तुम्ही चांगलं भोजन देता ते आवडतंच, पण त्यापेक्षाही जीवनात उपयोगी पडणारी वैचारिक शिदोरी देता, ती आमच्यासाठी खूप मोलाची आहे.” शब्दरूपी विचारधनाची ताकद यातून जाणवते. नगरमधील रिमांड होममधील वंचित मुलांसाठीही मी वेळोवेळी उपक्रम राबवीत असतो. समाजऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत असतो. अनंत चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी या नात्याने मी समाजकार्य करीत असतो. उरलेल्या आयुष्यात मी एन. बी. धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना व दुर्बल घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!