परीसस्पर्श…
जाधव अण्णा सोडून गेले तेव्हा खूप हळवा झालो. एका एका आठवणीने डोळे पाणावले. एक आटपैलू व्यक्तिमत्त्व जाधव अण्णांच्या रूपाने माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठीच आले होते, असेच मला वाटते.
कै. दादासाहेब द. जाधव (अण्णा)
आपल्या आयुष्यात असंख्य माणसे येतात. काही रक्ताच्या नात्याने मिळतात, तर काही जीवनाच्या वाटचालीत आपल्याला भेटतात. त्यातील काही माणसे आपल्या आयुष्याला कलाटणी देतात, दिशा देतात. मला माझ्या आजी-आजोबा, आई-वडिलानंतर असे कोणी घडविले असेल, दिशा दिली असेल, तर ती म्हणजे के दादासाहेब द. जाधव ऊर्फ अण्णा यांनी। नात्याने म्हणाल, तर ते माझे सासरे, आम्ही सगळे त्यांना ‘अण्णा’च म्हणत असू. मी जावई असलो, तरी त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया केली. जीव लावला. माझ्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत त्यांनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. काळाची पावले ओळखणारे, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते त्यांचे. आधीच्या प्रकरणात उल्लेख केल्याप्रमाणे ते शासकीय सेवेत कृषी अधिकारी होते. कृषीविभागात कार्यरत असताना त्यांनी वीस वर्षे कृषी विभाग कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी नेतृत्व केले. त्यामुळे नेतृत्वगुण, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याची हातोटी त्यांच्यात होतीच. वृत्तीने ते अतिशय धार्मिक होते. आध्यात्मिक अधिष्ठान त्यांच्यात होते. अनेक जातिधर्मातील, गरीब-श्रीमंत वर्गातील लोकांचा संग्रह कसा करायचा, हे त्यांनी मला शिकविले. मी त्यांचा थोरला जावई कसा झालो, हेही आधीच्या प्रकरणात आलेले आहे. त्यांनी वडील व भावांचा विरोध पत्करून मला जावई म्हणून निवडले. नंतर अनेकांजवळ ते आपला तो निर्णय किती योग्य होता, हे अभिमानाने सांगायचे. त्या काळात त्यांच्या घरातील मुली मोठमोठ्या बागायतदारांच्या घरात दिलेल्या होत्या. तुलनेने आमची परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांनी मला स्वतःची थोरली मुलगी दिली. मुलगी देताना वराकडील फक्त संपत्ती न पाहता खानदान, चारित्र्य, संस्कार, मुलाचे कर्तृत्व पाहावे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुली बागायती पट्ट्यात न देता तुलनेने कोरडवाहू भागात पण होतकरू, जिद्दी आणि मेहनती मुलांना दिल्या. त्यांना एक मुलगा डॉ. प्रकाश व चार मुली. मुलीपैकी सर्वात थोरली माझी धर्मपत्नी सौ. सुनंदा. त्यानंतर सौ. सुनीता बाळासाहेब कुन्हे, सौ. प्रा. सुजाता बळवंत शेळके व सौ. वंदना तुकाराम शेळके. अण्णा कायम अनेकांजवळ अभिमानाने सगळे कर्तृत्ववान जावई लाभल्याचे सांगायचे.
कोणताही निर्णय घेताना तो कसा घ्यावा, याचाही वस्तुपाठ त्यांनी मला उदाहरणासह दिला. झाले असे की, माझ्या लग्नानंतर माझे मेहुणे डॉ. प्रकाश यांच्यासाठी ते स्थळ पाहत होते. एकदा त्यांनी डॉ. प्रकाश यांच्यावरोवर मला पुण्याला मुलगी पाहायला पाठविले. ती पिंपरी-चिंचवडच्या तत्कालीन आयुक्तांची मुलगी होती. आम्ही दोघे गेलो, मुलगी पाहिली व परत आलो. आल्यावर अण्णांनी मला विचारले, “कशी आहे मुलगी, प्रकाशला
करायची का?”
आता दुसऱ्यासाठी मुलगी पाहायला जाण्याचा हा माझ्यासाठी पहिलाच प्रसंग होता. मी त्यांना सांगितले, “मुलगी मला तर बरी वाटते, पण बाकीचं ते तुम्ही पहा.” हे ऐकून त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. निर्णय कसा घ्यायचा. मुलगी निवडण्याचाच नाही तर जीवनात कोणताही निर्णय कसा घ्यायचा, हेच त्यांनी शिकविले.
ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही मुलगी पाहण्यासाठी जाता, तेव्हा मुलगी पाहिल्यावर तुम्हीच तुमच्या मनाला पाच प्रश्न विचारायचे. प्रत्येक प्रश्नासाठी वीसपैकी मार्क द्यायचे. त्या पाच प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची व त्याप्रमाणे गुण द्यायचे. नंतर पास किंवा नापास, हेही तुम्हीच गुणांची बेरीज करून ठरवायचं. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे मुलीचं रंगरूप पाहायचं व त्याला वीसपैकी गुण द्यायचे. दुसरा प्रश्न मुलीचं शिक्षण… ती पदवीधर असेल, तर २० पैकी २० गुण, बारावीपर्यंत शिकलेली असेल, तर १५ गुण, दहावी झालेली असेल, तर १० गुण, आठवी असेल ५ गुण आणि त्यापेक्षाही कमी शिक्षण असेल, तर शून्य गुण. समजा मुलगी दिसायला खूप सुंदर, गोरीपान देखणी असेल आणि तुम्ही तिला सांगितलं की, ‘कर सही.’ आणि ती म्हणाली, ‘लावा अंगठयाला शाई।’ तर अशावेळी तुम्ही तिला स्वीकाराल का? यासाठी मुलीच्या रंगरूपाबरोबर शिक्षणही पाहायचं. तिसरा प्रश्न म्हणजे मुलीवरील संस्कार, कुटुंबाचं वळण कसं आहे, ते पाहायचं. समजा आपण मुलीला विचारलं, ‘तुझं नाव काय?’ त्यावर तिने स्वतःचं नाव सांगून प्रतिप्रश्न केला की, ‘तुझ्या बापाचं नाव काय?’ तर आपण ती मुलगी करू का? नाही करणार. चौथा प्रश्न कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती व पाचवा प्रश्न म्हणजे मुलीचे कलागुण, आवडनिवड, छंद वगैरे. आता या पाच प्रश्नांची मनातच उजळणी करून आलेल्या उत्तरांप्रमाणे गुण द्यायचे. सगळ्या गुणांची एकूण बेरीज एक्कावन्न टक्क्याच्या पुढे जात असेल, तर मुलगी पास… नाही तर रामराम.”
एक खुलासाही लगेच करतो की, मुलगी पाहतानाच नाही, तर वधूकडील मंडळींनीही मुलगा पाहायला जाताना अशाच प्रश्नांची यादी करावी. कारण मुली निवडण्याइतकाच मुलगा निवडण्याचा हक्कही मुलीकडच्यांना तितकाच असतो.
तर अशा उदाहरणांवरून अण्णांनी मला निर्णय घेताना काय केले पाहिजे, हे शिकविलं. कोणताही निर्णय घेताना त्यातील चांगले-वाईट गुण तपासा. निर्णयांची उंची खोली तपासा, चांगले गुण अधिक असतील, तर लगेच निर्णय घ्या व पुढे मार्गक्रमण करा. अण्णांची हीच शिकवण मी माझ्या आयुष्यात कायम आचरणात आणली. त्यामुळे निर्णय घेताना खूप त्रास झाला नाही. निर्णय घेण्याचे एक मुलखावेगळे सूत्रच त्यांनी मला शिकविले.
जाधव अण्णा नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही संघटनेसाठी कायम कार्यरत असायचे. ते जितके कडक शिस्तीचे होते, तितकेच मायाळूही होते. त्यांचे सामाजिक, धार्मिक अधिष्ठान खूप मोठे होते. समतानगर गृहनिर्माण सोसायटी स्थापताना त्यांनी अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले. त्यांचा मित्रपरिवारही सर्वदूर व मोठा होता. अनेक मुलींना त्यांनी बहीण, मुलगी मानून अडीनडीला मदत केली. पैठण, आळंदी, पंढरपूर या तीर्थस्थळी ते आवर्जून अन्नदान करायचे. गोरक्षनाथ गडावरील नूतन मंदिराच्या कार्यासाठीही त्यांनी सढळ हाताने मदत केली. निवृत्तीनंतर त्यांनी ‘चैतन्य गोरक्षनाथ दिंडी सोहळा’ सुरू केला. दरवर्षी ते पायी दिंडीने पंढरपूरला जायचे. वैष्णवांच्या मेळ्यात रमायचे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी वारीचा नेम चुकविला नाही. दिंडीतही त्यांनी शिस्तबद्धता आणली. सर्व सहभागी वारकऱ्यांना कपडे, साड्या वाटत. पंढरपूरला त्यांनी चैतन्य गोरक्षनाथ ट्रस्टसाठी अकरा हजार चौरस फूट जागा घेऊन मंदिर व मठ स्थापन केला. ग्रामीण भागातील लोकांची तिथे राहायची चांगली सोय निर्माण केली. वारकऱ्यांना त्यांनी व्यसनांपासून कायम परावृत्त केले. ते स्वतः तरुणपणी कुस्तीपटू होते. नियमित दंडबैठका वगैरे व्यायाम करायचे. त्यामुळे शरीरसंपदेबाबत ते कायम आग्रही असायचे.
शेतकरी व शेतीचा विकास हा त्यांचा आवडता विषय होता. कृषिक्षेत्रातील नवनवीन शोध, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ते कायम दौरे करायचे. गावोगावी फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे.
स्व. व्ही. एम. पांडव सर शिस्तवन्द, कार्यकुशल अधिकारी
मी स्वतःची विमासेवा देणारी कंपनी काढली. या कंपनीचा प्रचंड असा विस्तार झाला. खूप मोठे व्यावसायिक यशही मी मिळविले. या यशाचे अनेक भागीदार आहेत. त्यात माझ्या कंपनीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही तितकाच वाटा आहे. यातील एक व्ही. एम. पांडव (विठ्ठल महारुद्र पांडव) यांचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. पांडव सर इंडियन डिफेन्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस (आयडीएएस) मधून सुपर क्लास वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर योगायोगाने आमची भेट झाली. त्यांना मी कंपनीत जनरल मॅनेजर (सरव्यवस्थापक) म्हणून नियुक्त केले. मूर्ती लहान, पण कीर्ती महान ही म्हण त्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. मुळात लष्कराच्या सेवेची पार्श्वभूमी असल्याने शिस्त, कामाप्रती प्रचंड निष्ठा हे गुण त्यांच्या अंगी होतेच. इंग्रजी भाषेवर त्यांची प्रचंड हुकमत होती. वागण्या-बोलण्यात अतिशय नम्रपणा, आध्यात्मिक विचारांचे अनुष्ठान व प्रामाणिकपणा हे त्यांच्यातील गुण मला प्रचंड भावले, अतिशय हुशार व नग्न स्वभावाचे असल्याने मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटायचा. आपल्या हुशारीने व स्वभावाने ते समोरच्याला जिंकून घेत. कंपनीत कार्यालयीन व्यवस्थापन त्यांनी इतक्या कुशलतेने सांभाळले की, मला त्या आघाडीवर कधी विशेष लक्ष देण्याची गरजच लागली नाही. स्वतः शिस्तीला महत्त्व देणारे असल्याने इतरांकडूनही ते तशीच अपेक्षा ठेवायचे, गुणी माणसे हेरून त्यांच्याकडून काम करवून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. कार्यालयीन तसेच फिल्डवरील स्टाफवर त्यांचा दरारा होता. त्यांचे सामान्यज्ञान अतिशय उच्च कोटीचे होते, कायद्याचे ज्ञानही प्रचंड असल्याने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये चूक क्वचितच होत असे.
मी आठवड्यातील तीन-चार दिवस व्यवस्थापन व उर्वरित दिवस मार्केटिंगचे काम पाहत असे. आदर्श व्यवस्थापन कसे करावे, हे मी पांडव सरांकडून शिकलो. एकदा मी बाहेरगावचा दौरा करून आल्याने सकाळी १०.४५ वाजता ऑफीसमध्ये आलो. त्या दिवशी नेमके पांडव सर सुट्टीवर होते. मी ऑफीसमध्ये पोहचलो व पाहिले की, कर्मचाऱ्यांनी अजून कामाला सुरुवात केली नव्हती. मी आश्चर्यानेच विचारले, “काय झालं?” त्यावर एका कर्मचाऱ्याने सांगितले, “ऑफीसची साफसफाई करणारी बाई आलेली नाही, एक शिपाईपण सुट्टीवर आहे, दुसरा कुरियर आणण्यासाठी गेला आहे. त्यामुळे साफसफाई राहिली असून एक जण दुसरी बाई पाहण्यासाठी गेला आहे.” हे सगळे पाहिल्यावर मी मॅनेजरला विचारले, “आपला झाडू कुठे असतो?” त्याने दरवाजाच्या कोपऱ्याकडे बोट केले. मी तो झाडू घेतला आणि ऑफीस झाडायला सुरुवात केली. माझ्या या कृतीने कर्मचारी जरा हबकलेच. काही महिला कर्मचारी पुढे आल्या व मला म्हणाल्या “सर, तुम्ही कशाला झाडता?” मी म्हणालो, “मी झाडलं, म्हणून लोक मला झाडूवाला म्हणतील का? आणि म्हणाले, तरी मला काही फरक पडत नाही.” तेवढ्यात शिपाई आला व पुढे त्याने सगळी साफसफाई केली.
मला हा सगळा प्रकार बोचला होता. काही तरी केले पाहिजे, असे वाटत होते. आमच्या ऑफीसमध्ये एक प्रथा होती. आमच्यापैकी कोणाचाही वाढदिवस असला, तर आम्ही तो एकत्र साजरा करायचो. वाढदिवस असलेल्याला आम्ही सगळे बुके देऊन त्याला शुभेच्छा द्यायचो. मग सगळ्यांना कचोरी, जिलेबी, सामोसा असा नाष्टा द्यायचो. अशा कार्यक्रमात सगळा स्टाफ मला बोलण्याची विनंती करायचा. कारण दर आठवड्याला मोठमोठ्या मीटिंगमध्ये होणाऱ्या भाषणांची चर्चा असायची. माझे प्रेरणादायी बोलणे सगळ्यांना खूप आवडायचे. ऑफीसमधील स्टाफला त्याचा अनुभव घेता येत नसल्याने अशा प्रसंगी ते मला आवर्जून बोलायला लावायचे. झाडण्याचा प्रसंग घडल्यानंतर असाच एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मी बोलायला उभा राहिलो. आमच्या
ऑफीसमध्ये महिला कर्मचारी होत्या. काहींचे लग्न झालेले होते, काहींचे नव्हते. मी मुलींना विचारले, “तुमर्च धर रोज कोण झाडतं?” कुणी सांगितले की, ‘आई झाडते’, कुणी म्हणाले, ‘मी स्वतःच झाडते.’ मग मी म्हणालो, “तुमचं घर असल्याने तुम्ही ते झाडून घेता, तिथे तुम्हाला काही वाटत नाही. पण ऑफीस ऑफीस तुमचं आहे, असं तुम्हाला वाटत नसेल, म्हणून तुम्ही त्या दिवशी झाडून घेतलं नाही. तुम्ही शिपायाची वाट पाहत बसला. ही तुमची वृत्ती मला व पांडव सरांना अजिबात आवडलेली नाही.” मी पांडव सरांना तिथेच सांगितलं, “सर, उद्यापासून झाडूवाली बाई बंद करा. उद्यापासून स्टाफवरच ही जबाबदारी सोपवा. ज्यांना झाडायची लाज वाटत असेल, त्यांचा हिशोब करा व त्यांना मोकळं करा. कंपनीला त्यांची अजिबात गरज नाही. कोणाकोणाला घरी जायचं, ते लगेच सांगा.” मी असे म्हटल्यावर सगळेच चपापले. कोणालाही नोकरी सोडायची नव्हती. त्यावर पांडव सर म्हणाले, “घर जसं आपलं असतं, तसंच ऑफीसही आपलंच आहे, असे समजून काम कराल तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल.” हा प्रसंग सगळ्यांना खूप प्रेरणा देणारा ठरला. पांडव सरांनी त्यावेळी स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी सुट्टीच्या दिवशी घरातील सगळी कामं करतो. स्वतःचे कपडे धुतो, अगदी संडासही साफ करतो. आपण जिथे कुठे काम करत असू, त्याला आपलं समजा.”
अशा अनेक गोष्टी पांडव सरांकडून शिकायला मिळाल्या. सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्त्व मला त्यांच्यात दिसायचे. पुढे माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हॉटेल सुवर्णम प्राईडमधून गोरगरिबांसाठी अन्नछत्र सुरू केले. त्या कार्यक्रमास पांडव सर आवर्जून उपस्थित होते. माझ्याबद्दल, माझ्या परिवाराबद्दल ते भरभरून बोलले. दुर्दैवाने ते त्यांचे शेवटचे भाषण ठरले. काही दिवसांनी ते इहलोक सोडून गेले. माझ्या प्रस्तुत आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी त्यांचा हृद्य सत्कार करण्याचे माझ्या मनात होते. पण त्याआधीच त्यांना देवाज्ञा झाली. पांडव सर आमच्या कंपनीत त्यांच्या वयाच्या चौसष्टाव्या वर्षी रुजू झाले. सतरा वर्षे त्यांनी निरंतर सेवा दिली. वयाच्या एक्क्याऐंशिव्या वर्षीही आमच्या ऑफीसचे तीन मजले ते एका दमात चढायचे. तरुणालाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. असा अतिशय उत्तम सहकारी मला मिळाला, हे मी माझे भाग्यच समजतो.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
