मराठी माणूस व व्यावसायिकता

मराठी माणूस व व्यावसायिकता

मराठी माणूस ‘सेल्फ स्टार्ट’ कमी आणि ‘धक्का स्टार्ट’ जास्त आहे.

त्याच्या अस्मितेला सतत फुंकर घालावी, तेव्हा तो पेटून उठतो.

आगे व्हा, काळाबरोबर बदला व व्यवसायामध्ये अटकेपार झेंडे रोवा,

मराठीत पूर्वी एक म्हण प्रचलित होती, ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’, परंतु आता शेतकरी हवालदिल आहे. कारण निसर्ग साथ देत नाही. कधी निसर्गाने साथ दिली, तर व्यापाऱ्यांकडून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. एकूणच शेतीव्यवसाय आतबट्ट्धाचा ठरत आहे. व्यापाराची तर मराठी माणसाला कायम भीती वाटते. म्हणूनच मराठी माणसाने जुनी म्हण उलटी केली. आता ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती’ असे म्हटले जाते. त्यामुळे जो तो नोकरीच्या मागे धावत सुटला आहे. परंतु आता संगणक क्रांती तसेच अन्य कारणांमुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात अपेक्षित पगार व स्थैर्य लाभत नाही. अशा वेळी मग एकच पर्याय राहतो, धंद्याचा.

धंदा व नोकरी यात फरक असतो. नोकरी म्हणजे आठ तासांचा धंदा व धंदा म्हणजे चोवीस तासांची नोकरी, चाकोरीबद्ध नोकरी करणारे कधीही धंद्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र ज्यांना चौकटीत जगणे पसंत नसते, ते नोकरीच्या चाकोरीत रमत नाहीत. तसे नोकरी म्हणजेही कोणत्याही भांडवलाशिवाय चालणारा आठ तासांचा धंदाच आहे.

आता व्यवसाय करायचा म्हटले, तर सगळ्यात मोठी गोष्टी आवश्यक असते, ती म्हणजे ‘बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा’ असा दृढनिश्चय असलेले कधीही व्यवसायात अपयशी होत नाहीत. कोणताही व्यवसाय करण्याआधी काळाची पावले ओळखायला शिकले पाहिजे. कारण जग झपाट्याने बदलत आहे.

खरे तर मराठी माणूस धाडसी आहे, शूरवीर आहे, पण मराठी माणूस कधी कीर्तन-प्रवचन ऐकून सुधारला नाही व तमाशा पाहून कधी बिघडलाही नाही. तो आपल्याच विश्वात दंग असतो, टाईमपास करण्यात पटाईत असतो. निवडणुका आल्यावर फुकट चहापाणी, वडापाव, धाब्यावर पार्टी मिळाली तर कोणाचाही जयजयकार करतो. त्यात त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. तो कधीही पायवाट सोडून चालणार नाही, नवीन वाट निर्माण करणार नाही. मुळात मराठी माणसाला स्वतःचा कधी राग येत नाही. पण जर कधी त्याला राग आला, तर तो प्रचंड भरारी घेतो. थेट अटकेपार झेंडे रोवून येतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील. मराठी माणूस सेल्फ स्टार्ट कमी आणि धक्का स्टार्ट जास्त आहे. त्याच्या अस्मितेला सतत फुंकर घालावी लागते, मग तो पेटून उठतो. परंतु त्यासाठी एक ‘जोर का झटका’ गरजेचा असतो.

मराठी माणूस व्यवसायात मागे पडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे त्याला छोट्या व्यवसायाची लाज वाटते. त्यामुळे बाहेरची मंडळी महाराष्ट्रात येतात, छोटे धंदे करून मोठे उद्योजक बनतात. आम्ही फक्त ‘मुंबई आमची’ असे म्हणण्यात धन्यता मानतो. मग बाहेरून आलेली ती मंडळीही म्हणतात, ‘मुंबई तुमची, पण भांडी घासा आमची.’ मुंबईत रोज छोटे छोटे व्यावसायिक दहा ते पंधरा कोटी रुपये कमवतात. कारण ते पडेल ते काम
करण्यास तयार असतात. आज मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर, दुधाला रिक्षा, टॅक्सी चालविणारे बांधकाम मजूर, फरशी बसविणारे, प्लंबर, फिटर, भाजीवाले, इलेक्ट्रिशियन अशा जवळपास सर्व क्षेत्रांत परप्रांतीय मंडळी आहेत. कारण अशी छोटी कामे करायला मराठी माणसाला लाज वाटते. व्यवसाय, धंदा म्हणजे आपण आरामात गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बसायचे, कामगारांना फक्त ऑर्डर सोडायच्या, महागड्या कारमध्ये फिरायचे, बे सहा करायच्या – असेच काहीसे चित्र मनात असते. गोल गोल फिरणारी खुचीं व गोलगोल साडी नेसणारी छोकरी एवढेच डोळ्यासमोर असते. पण वस्तुस्थिती अशी आहे, मराठी माणसाला ना ती खुर्ची मिळते, ना छोकरी.

युवकांनी व पालकांनीही आताच्या काळात विचाराची दिशा बदलली, तरच त्यांची दशा बदलेल, रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, लग्नाच्या बाजारात किंमत नाही. अशा वेळी निराश झालेले तरुण गुन्हेगारीकडे वळायला किंवा वाममार्गाला लागायला वेळ लागत नाही. त्यासाठी पालकांनी मुलगा शाळेच्या इयत्ता सातवीत गेल्यापासूनच त्याला शाळेव्यतिरिक्त काही तरी काम केलेच पाहिजे, माची जाणीव करून द्यायला पाहिजे. किमान त्याच्या शिक्षणाचा तरी खर्च त्याने स्वकमाईतून केला पाहिजे असे त्याच्या मनावर बिंबविले पाहिजे. त्यामुळे त्याला त्या वयातच पैशाचे मोल कळेल व पुढे जाऊन त्याला कोणत्याही चांगल्या कामाची लाज वाटणार नाही.

कष्ट केल्याने शरीराचे काहीच नुकसान होत नाही. कष्ट, काम केले नाही, तर मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि पर्यायाने शारीरिक स्वास्थ्यही हरवते. मनाने व शरीराने मजबूत नसलेले तरुणच व्यसनाकडे आकर्षित होतात. एखादा नैराश्यात जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतो.

पन्नास-साठ वर्षापूर्वी शंभर-दोनशे एकर शेती असलेला शेतकऱ्याची तिसरी चौथी पिढी आज फक्त दोन-पाच एकर शेतीवर आली आहे. पिढीगणिक शेतीचे तुकडे होत आहेत. शेतीतून मिळणारे उत्पन्न घरप्रपंचाला पुरत नाही. मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. हे सर्व कर्ज अनुत्पादित असल्याने त्याची परतफेड वेळेत करता येत नाही. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी जमीन विकायची वेळ येते. हा सर्व मानसिक ताण असह्य करणारा असतो व यातूनच शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. परिस्थितीने गांजलेल्या अशा तरुणाईला विविध पक्षांचे नेते चहानाष्टा, जेवणावारी कार्यकर्ते बनवितात. निवडणुकीच्या वेळी दारू पाजून व्यसनाधीन बनवितात. पुढे हीच व्यसनाधीन तरुणाई गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. राजकीय मंडळी, शासन, प्रशासनाकडून खूप अपेक्षा बाळगण्याचे दिवसही आता संपले आहेत. अनेकांची सरकारे आली व गेली. शेतकऱ्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या जैसे थे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी मूलभूत समस्यांसाठीच झगडत आहे. या समस्येवर प्रत्येकाने आपापलेच उत्तर, उपाय शोधायला पाहिजे.

यासाठी शेतकऱ्यांनी, त्यांच्या मुलांनी विचारांची व कार्याची दिशा बदलली पाहिजे. तरच त्यांची दशा बदलेल. या पुढील काळात शेतीवर संपूर्णपणे अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. शेतीला पूरक उद्योग करणे गरजेचे आहे. उद्योग करताना आपल्या गरजा कमी करणे आवश्यक आहे. महागडे मोबाईल, महागडे कपडे, चैनीच्या वस्तूंचा काही काळापुरता त्याग करा. देखावा कमी करा. जग काय म्हणेल, याची चिंता करू नका. चंगळवादामुळे शहराजवळचे अनेक मोठे शेतकरी ‘गुंठा मंत्री’ झाले व कालांतराने अक्षरशः भिकेला लागले. याउलट व्यापारी वृत्तीची माणसे शेतकऱ्याकडून भाजीपाला, फळे, अन्नधान्य विकत घेऊन तो माल शहरात अक्षरशः रस्त्यावर विकून मोठी व श्रीमंत झाली. ते चारचाकीत ऐटीत फिरत असल्याचे पाहायला मिळते. ही सुबत्ता शेतकऱ्याच्या दारातही यायला हवी. तेव्हा स्वतःचा माल स्वतः थेट ग्राहकाला विकायला शिकले पाहिजे. पिकते ते विकायला शिका. शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दुवा असलेले दलाल खूप श्रीमंत होताना दिसतात. मग हेच काम पिकविणाऱ्यानेच केले, तर दलालाला मिळणारा नफा शेतकऱ्यांना स्वतःला नक्की मिळू शकतो. जोपर्यंत शेतकरी व त्यांची मुले व्यापार हातात घेणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांचे दिवस बदलणार नाहीत.
शहरातील ग्राहकवर्ग शेतकऱ्यांना मदत करायला तयार असतो. कारण तीसुद्धा शेतकऱ्यांचीच मुले असतात. नोकरी, व्यवसायानिमित्त गाव सोडून शहरात आलेली असतात. त्यांना आपल्या बापजाद्याने शेतात केलेल्या कहाची जाणीव असते. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे स्वागत करायला तयार असतात, फक्त शेतकऱ्यांनी विशेषतः युवा शेतकऱ्यांनी अशा ग्राहकांच्या दारात जाणे गरजेचे आहे.

यासाठी तरुणांना स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. राजकारणापासून दूर राहून चिकाटी, प्रामाणिकपणाने यशाच्या नवनवीन वाटा शोधाव्या लागतील, नवीन संधी, नवीन व्यवसाय याची माहिती घेऊन शून्यापासूनच सुरुवात करावी लागेल. कामाची लाज बाळगणे सोडून कोण काय म्हणेल याचा विचार बंद करायला पाहिजे. हाती घेतलेल्या कामातूनच आपले भविष्य उज्ज्वल होईल, हा विश्वास बाळगला पाहिजे.

आणखी एक गोष्ट प्रत्येकाने व्यवस्थित समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे काळानुरूप बदलले पाहिजे. जग झपाट्याने बदलत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी, ते अंगीकारण्यासाठी आपण सदैव सज्ज असले पाहिजे. १९९८ मध्ये कोडॅक ही फोटो पेपर बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी होती. फोटो पेपरचा जगातील उत्पादनाचा पंच्याऐंशी टक्के वाटा एकट्या कोडॅकचा होता. कंपनीत जवळपास एक लाख सत्तर हजार कर्मचारी होते. परंतु एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच डिजिटल क्रांती झाली. फोटो प्रिंटला मागणी घटली व या कंपनीचेही दिवाळे वाजले. सर्व कामगारांना घरी जावे लागले. एचएमटी घड्याळ, बजाज स्कूटर, डायनोरा टीव्ही, मर्फी रेडिओ, नोकिया मोबाईल, राजदूत जावा या मोटारसायकली, अँबेसिडर कार या सर्वांनी एककाळ खूप गाजवला. परंतु कालांतराने ते बाजारातून गायब झाले. याला कारण त्या कंपन्यांनी काळाची पावले ओळखून आवश्यक बदल केले नाहीत.

येणारा काळ असाच आमूलाग्र बदलांचा आहे. जाणकार म्हणतात की, येत्या काळात चौथी औद्योगिक क्रांती अपेक्षित आहे. डिजिटल तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग अवतरत आहे. ओला, उबेर या बड्या कंपन्यांकडे स्वतःची एकही कार नाही. पण केवळ डिजिटल तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर निर्मिती करून त्यांनी सर्वात मोठी टॅक्सी कंपनी म्हणून झेप घेतली आहे. Airbnb ही जगातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी असली, तरी तिच्या स्वतःच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. paytm, ola cabs, oyo rooms हे आधुनिक तंत्रज्ञानाने सेवा पुरवणारे गब्बर बनले आहेत. अमेरिकेत सध्या IBM Watson नावाचे सॉफ्टवेअर कायदेशीर सल्ला देण्याचे काम करते. ते इतके लोकप्रिय झाले आहे की, अमेरिकेत वकिलांना कामच राहिलेले नाही. कदाचित पुढील दशकभरात या देशातील सत्त्याण्णव टक्के वकील बेकार होतील. उरलेले तीन टक्के सुपर स्पेशालिस्ट असतील.

मला असे वाटते, ज्यांना स्वतःचे जग, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करायचे आहे, अशा मुलांनी आपल्या घरापासून किमान दोनशे-तीनशे किलोमीटर दूरवरील शहरात जाऊन छोटा मोठा धंदा केला पाहिजे. इतक्या लांब यासाठी की, तिथे तुम्हाला फारसे कोणी ओळखत नसते. त्यामुळे तुम्हाला कामाची लाज वाटणार नाही. लोक काय म्हणतील, या एकाच कारणाने आपण अनेकदा इच्छा असूनही आपल्या गावात छोटा धंदा करू शकत नाही. बिहारी लोकांचेही तसेच आहे. ते आपल्या गावी लाजतील, पण बाहेर गेल्यावर न लाजता छोटा धंदा करतील व मोठेही होतील. एकदा खूप पैसे कमवल्यानंतर गावातच मोठा धंदा करा. तुमचा आब व रुबाब नक्कीच वाढेल. परंतु त्यासाठी ‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच’ हे वाक्य रोज म्हणायला सुरुवात करा व यशस्वी व्हा!

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!