आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग
सर्वगुणसंपत्र कोणीच नसतो, पण प्रत्येकात काही गांगले गुण असतात. मोठ्या व्यक्तिमत्वांचे विचार आपण घ्यायचे असतात. आपले आदर्श निवडा, त्यांचे चांगले गुण आत्मसात करून स्वयंप्रेरित व्हा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. ‘मोठ्या यशासाठी आदर्श व प्रेरणा अत्यंत महत्वाची असते. त्यासाठी चांगले आदर्श निवडा व त्यांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळवून यशस्वी व्हा.’ एकदा व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह भारताच्या दौऱ्यावर आले होते. राजशिष्टाचाराप्रमाणे भारत सरकारच्या मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. एका मंत्रिमहोदयांशी त्यांच्या अनौपचारिक गप्पा चालू होत्या, त्यांनी मंत्र्याला विचारले, “तुम्ही काय करता?” मंत्री उत्तरले, “मी केंद्रात मंत्रिपदी आहे. देशाचा, माझ्या खात्याचा कारभार पाहतो, लोकांचे प्रश्न सोडवितो. समाजसेवा करतो.” त्यावर राष्ट्रपती म्हणाले, “ते सगळं ठीक आहे, पण तुमचा व्यवसाय काय आहे? तुमच्या पोटापाण्यासाठी काय काम करता? तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काग आहे? घर कसे चालवता? मी व्हिएतनामचा राष्ट्रपती आहे. पण तरीही मी शेती करतो. शेती हा आमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. त्यावरच माझं घर चालतं.” त्यावर आपले मंत्रीमहोदय ओशाळले. व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी त्यांना अचूक पकडले होते. मंत्री त्यांना म्हणाले, “आमच्याकडे राजकारण हाच धंदा, व्यवसाय आहे.” राष्ट्रपतींनी सांगितले, “राजकारण हे तर देशाची, समाजाची सेवा करण्याचं माध्यम आहे. ते उत्पन्नाचं साधन कसं होऊ शकतं?”
व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी भारतातील एक मोठी शोकांतिकाच जणू मांडली. दुर्दैवाने आपल्याकडे राजकारण हा धंदा झाला आहे. ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारूच शकत नाही. आजच्या घडीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत मिळून सुमारे एक कोटी लोकांचा धंदा काय आहे, तर राजकारण. मित्रांनो, आपल्याकडच्या आजच्या तरुणाईला ‘तुमचे आदर्श कोण आहेत?’ असे विचारले, तर बहुतेकांचे उत्तर काय येईल माहिती आहे? त्यांचे उत्तर येईल अमूक अमुक राजकारणी, त्याच्या पुढे गेले, तर हा फिल्मस्टार किवा ती अभिनेत्री.. म्हणजे हिरोईन, राजकारण, बॉलीवुड संपल्यावर येते क्रिकेट. तो क्रिकेटर मला आवडतो. बरं ही मंडळी लोकांना का आवडतात? त्यालाही कारण आहे ते म्हणजे या मंडळीभोवती असलेले प्रसिद्धीच वलय. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया रात्रंदिवस याच क्षेत्रांतील मंडळीचे चेहरे आपल्याला दाखवीत असतात. त्यातही त्यांच्या प्रत्यक्ष कामापेक्षा त्यांच्या कामाव्यतिरिक्तच्या गोष्टी, भानगडी जास्त दाखविल्या जातात. एखाद्याचे स्टाईलीश राहणीमान, एखाद्याचा राजप्रासादासारखा बंगला, एखाद्याला मिळणारा अमाप पैसा हे दाखविण्यावर सगळ्यांचा भर असतो. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारे हे चेहरेच कायम समोर दिसत असल्याने तरुणाईलाही हेच खरेखुरे हिरो वाटू लागतात. त्यांच्यासारखेच होणे म्हणजे यश असाच समज होतो. यात सगळ्यांची चूक आहे असेही नाही. कारण आपल्यापुढे इतर क्षेत्रांतील खरेखुरे आदर्श, हिरो समोर येतच नाहीत. एखादा मोठा शास्त्रज्ञ आपले संपूर्ण जीवन पणाला लावून एखादा शोध लावतो, ज्याने समस्त मानवजातीचे
कल्याण होते. एखादी सामान्य कुटुंबातील व्यक्ती जिद्दीने आयपीएस, आयएएस अधिकारी होते. एखादा खेडेगावातला शेतकरी नवीन प्रयोग करून शेती फुलवून उत्कर्ष साधतो. एखादा समाजसेवक आपले आयुष्य समाजासाठी वेचतो. त्यांच्याकडे पाहायला, त्यांच्या संघर्षगाथेतून प्रेरणा घ्यायला आपले मन तयार होत नाही. असे का होते हा अनुत्तरित प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल, आदर्श हवेत, ते बरोबर आहे. पण ते निवडायचे कसे? याचे उत्तरही देतो. कसे असतं ना… माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. यातील प्रत्येकाचा आपल्यावर प्रभाव पडेल, असे नाही. दोन वर्षाच्या एखाद्या मुलाला विचारले, ‘तुला सर्वात जास्त कोण आवडते?’ तर तो उत्तर देतो, ‘आई’, कारण त्याचे जग तोपर्यंत आईपुरतेच सीमित असते. अजून थोडा मोठा सात-आठ वर्षांचा झाल्यावर त्याच्यासाठी आदर्श असतात त्याचे बाबा म्हणजे वडील, शाळेत जायला लागल्यावर त्याला शिक्षकांमध्ये आपले आदर्श दिसतात. पुढे पौगंडावस्थेतून तरुण होताना त्याचे आदर्श पुन्हा बदलतात. त्याला ग्लॅमरची भुरळ पडते. एखादा क्रिकेटर, सिनेकलाकार त्याचे आदर्श होतात. त्याला मोठेपणी त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. वयाची पंचविशी आल्यावर थोडा मॅच्युअर झाल्यावर त्याचे आदर्श पक्के होतात. पण अनेकांच्या बाबतीत ग्लॅमरची प्रभावळ असलेली व्यक्तिमत्त्वेच आदर्श राहतात. आपल्याकडे शास्त्रज्ञ, समाजसेवक, पर्यावरणप्रेमी, लेखक, अर्थतज्ज्ञ, संशोधक, उद्योजक या क्षेत्रांत अनेक असे महान आदर्श आहेत, ज्यांनी शून्यापासून सुरुवात करीत मोठी झेप घेतलेली असते. आपण अशा लोकांना आयडॉल बनविले पाहिजे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. एखाद्या व्यक्तिमत्त्वाबाबत आकर्षण असणे वेगळे आणि त्याला आपला आदर्श बनविणे वेगळे. आता आदर्श बनवायचा म्हणजे काय करायचे, असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर आपल्या आयडॉलमधील चांगले गुण शोधून ते आत्मसात करायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. मी याआधीही सांगितले की, सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो. पण प्रत्येकात काही चांगले गुण असतात. मोठ्या व्यक्तिमत्त्वांची विचारांची बैठक पक्की असते. त्यांचे विचार आपण घ्यायचे असतात. फक्त त्यांची प्रसिद्धी, त्यांच्याकडील पैसा पाहायचा नसतो. त्यांच्यात कोणते असे वेगळे गुण आहेत की, जे आपल्यात नाहीत हे शोधायला हवे. एकदा हा शोध घेतला की, मग आपण त्या आदर्शाकडील तो गुण घ्यायचा. त्यांच्या पदपथावर मार्गक्रमण करायचे. पहा तुम्हाला यश मिळते की नाही ते. नक्कीच मिळेल, कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे.
असं म्हणतात, Behind every success there is a 99% labour and 1% luck. परंतु दुर्दैवाने अधिक जण या वाक्याचा उलटा अर्थ घेतात. एक टक्का कष्ट आणि ९९ टक्के नशीब. माझा स्वतःचा विश्वास कष्टावर अधिक आहे. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची चरित्रे मी वाचली आहेत. अरुण शेवतेकर यांचे ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ हे पुस्तक मला प्रेरणा देणारे ठरले. या पुस्तकातील अब्राहम लिंकन, डॉ. अब्दुल कलाम, अभिनेते निळू फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, लता मंगेशकर, चित्रकार एम. एफ. हुसैन अशा अनेक दिग्गजांच्या कहाण्या प्रेरणादायी आहेत. त्यामुळे या व्यक्तिमत्त्वांनी मला नेहमीच प्रभावित केले. पण मला सर्वार्थाने खरीखुरी प्रेरणा मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज, रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी, टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नीतू मांडके या व्यक्तिमत्त्वांकडून. जादूई व्यक्तिमत्त्व म्हणजे काय असते, हे त्यांच्या जीवनकार्याकडे पाहून कळते. प्रत्येकाची एक स्वतंत्र अशी हातोटी आहे, हे सगळेच आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचले. किंबहुना त्यांच्या कार्यामुळे यश त्यांच्यामागे धावत गेले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
