वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

अरिस्टॉटल हा ग्रीक विद्वान म्हणतो स्वत:ला ओळखणे म्हणजे ज्ञानप्राप्तीची सुरुवात! स्वत:ला आरपार ओळखून, स्वत:ला स्वत:साठी स्वत:कडून नेमके काय पाहिजे आहे याचा निरंतर न थकता शोध घेणे म्हणजे यशाच्या अधिकाधिक जवळ जाणे थोर साहित्यिक विल्यम शेक्सपियर म्हणतो. इतरांपेक्षा स्वत:ला जास्त ओळखा! गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे, ज्याने स्वत:ला जेव्हा ओळखले तेव्हाच त्याने जग जिंकले. आपले सर्व संत महात्मे यांनीदेखील आपल्या श्‍लोक अभंगातून हेच सांगितले आहे. थोडक्यात यशस्वी, प्रसिद्ध, श्रीमंत, आदर्श होण्यासाठी स्वत:ला ओळखणे हे आजच्या काळात प्रचंड आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःला ओळखून आहे तसे स्वीकारतो तेव्हा आपण स्थिर होतो आणि जेव्हा आपण स्वत:ला स्वीकारून हवे तसे घडवतो तेव्हा आपण अजिंक्य होतो. स्वत:ला ओळखून स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवण्याची ही प्रक्रिया म्हणजेच पर्सनल ब्रँडिंग. व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वत:ची ओळख तयार करणं. स्वत:चा ब्रँड तयार करणं.

एक व्यावसायिक या नात्याने जोपर्यंत आपण आपला सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करत नाही, आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत नाही, तावून सुलाखून पैलू पाडत नाही आणि आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करत नाही; तोपर्यंत आपण स्वत: आणि आपला व्यवसायदेखील विशेष ओळखला जाणार नाही. हे माझे अभ्यासातून, स्वानुभवातून आणि निरीक्षणातून तयार झालेले मत आहे. आजच्या स्पर्धात्मक डिजिटल युगात आपला व्यवसाय फुलवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली आगळीवेगळी, ठळक, उठावदार, प्रभावी अशी जबरदस्त वैयक्तिक ओळख अर्थात आपला पर्सनल ब्रँड तयार करणे, तो अधिकाधिक समृद्ध करणे, स्थिरस्थावर करणे आणि कायम लोकप्रिय ठेवणे अत्यावश्यक ठरते. ही ओळख म्हणजे केवळ आपले नाव नसून, आपल्या विचारांचा, मूल्यांचा, भूमिकांचा, दृष्टिकोन, ध्येयधोरणे आणि विश्वासाचा एकत्रित प्रवाह असतो. एक चांगला वैयक्तिक ब्रँड म्हणजे असा अनुभव असतो जो लोकांच्या मनात आपला ठसा उमटवतो. त्यामुळे आपण ज्या व्यवसायात आहोत, त्यात लोकांना आपल्याशी जोडण्यास प्रवृत्त करतो.

या ओळखीला बळ देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी नेटवर्किंग हे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरते. नेटवर्किंग म्हणजे केवळ व्यावसायिक संपर्कांची यादी वाढवणे नाही, तर ती एक ऊर्जायुक्त अशी दीर्घ प्रक्रिया आहे. नेटवर्किंगच्या माध्यमातून आपला वैयक्तिक ब्रँड तयार करणे, त्याचा प्रभाव वाढवणे आणि त्यात सातत्य ठेवणे हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे. नेटवर्किंगमध्ये केवळ ओळखी वाढवणे हेच उद्दिष्ट नसून, परस्परांशी घनिष्ठ नाते तयार करणे महत्त्वाचे असते. नेटवर्किंग माध्यमातून व्यवसाय वाढवण्यासोबतच एकमेकांना प्रेरणा देणे, शिकणे, शिकवणे आणि यशासाठी परस्परांना सहकार्य करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. व्यवसायात एक विश्वासार्ह, अनुभवी, आणि सहकार्यशील व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण करणेही आपल्या यशाची किल्ली ठरते. मात्र आणि हे साध्य करायला नेटवर्किंग मात्र हवेच. वैयक्तिक ब्रँडिंग म्हणजे स्वत:सोबत झालेली घट्ट मैत्री तर नेटवर्किंग म्हणजे इतरांशी झालेली घट्ट मैत्री. थोडक्यात हा मैत्रीचा महोत्सव आणि विजयाचा आनंदोत्सव आहे. चला तर मग वैयक्तिक ब्रँडिंग व नेटवर्किंगचे परस्पर संबंध, त्यांचे फायदे, आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स बघूया.

लेखक- ब्रँडबाँड निलेश बी
(लेखक डिझायनर, कोच आणि ब्रँड सल्लागार असून त्यांनी ‘उद्योगऊर्जा’ या फोरमचे संस्थापक आहेत. त्यांनी ब्रँडिंग या विषयावर ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.)
संपर्क : 8879230443

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!